बावनकुळेंच्या वक्तव्यात दम नाही, त्यांना अधिकार कोणी दिला?, वादग्रस्त वक्तव्यावरून शिरसाटांचे खडेबोल

Sanjay Shirsat,

भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर एक वादग्रस्त वक्तव्य केलं आहे. या वक्तव्यानंतर भाजप आणि शिंदे गटात नव्या वादाला तोंड फुटलं आहे. आगामी विधानसभा निवडणुकीसाठी शिंदे गटाला फक्त ४८ जागा देण्याचे वक्तव्य बावनकुळे यांनी केले आहे. त्यावर शिंदे गटाचे नेते आणि आमदार संजय शिरसाट यांनी प्रतिक्रिया देत चंद्रशेखर बावनकुळे यांना खडेबोल सुनावले आहे.

आमदार संजय शिरसाट यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी ते म्हणाले की, बावनकुळेंच्या वक्तव्यात काहीही दम नाही. बावनकुळे यांना एवढे कोणी अधिकार दिलेले नाहीत. कोणी दिले त्यांना अधिकार?, अशाप्रकारे वक्तव्य केल्याने युतीमध्ये बेबनाव येते, याची जाणीव त्यांनी ठेवली पाहिजे, असं आमदार संजय शिरसाट म्हणाले.

फक्त ४८ जागा लढवण्यासाठी, आम्ही काही मूर्ख आहोत का? याच्यासाठी वरिष्ठ पातळीवर बैठक होईल आणि तिथे काय तो निर्णय घेतला जाईल. त्यामुळे त्यांना तो निर्णय जाहीर करु द्यावा. बावनकुळे यांना अधिकार कोणी दिला? बावनकुळे यांनी अतिउत्साहाच्या भरात असं विधान केलंय, असं म्हणत शिरसाट यांनी बावनकुळे यांच्यावर टीका केली.

नेमकं काय म्हणाले चंद्रशेखर बावनकुळे?

भाजपकडून निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मतदारसंघात जोरदार काम करण्यात येत आहेत. कार्यशाळा, पदाधिकाऱ्यांचे मेळावे घेण्यात येत आहे. मतदारसंघ मजबूत करण्याचे भाजपचे उद्दिष्ट आहे. भाजपने २४० जागांवर लढण्याचे नियोजन केले आहे. तर उरलेल्या ४८ जागा शिंदेंकडे जाण्याची शक्यता आहे. सध्या जागा वाटपाबाबत चर्चा झाली नसताना बावनकुळेंनी वक्तव्य केलं आहे. भाजप २४० जागा लढवणार तर शिंदे गटाकडे ५० हून अधिक जागा लढवण्यासाठी नेते नाहीत, असं वक्तव्य चंद्रशेखर बावनकुळे यांनी केलं.


हेही वाचा : शिंदे गटाला विधानसभेच्या ४८ जागा मिळतील, चंद्रशेखर बावनकुळेंचं वादग्रस्त वक्तव्य