ठाकरे म्हणजे शिवसेना…; मग राज आणि जयदेव ठाकरेंची का नाही?, संजय शिरसाटांचा सवाल

Sanjay Shirsat,

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पक्षाला शिवसेना हे नाव आणि धनुष्यबाण हे चिन्ह देण्याचा निर्णय केंद्रीय निवडणूक आयोगाने काल घेतला. या निर्णयामुळे ठाकरे गटाला मोठा धक्का बसला आहे. उद्धव ठाकरेंनी आयोगानं दिलेला निर्णय मान्य नसल्याचं सांगत देशात लोकशाही शिल्लक नसल्याचा घणाघात त्यांनी केला. दरम्यान, ठाकरे म्हणजे शिवसेना.., मग राज आणि जयदेव ठाकरेंची का नाही?, असा सवाल शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट यांनी उपस्थित केला.

संजय शिरसाट यांनी एका वृत्तवाहिनीशी संवाद साधला. त्यावेळी ते म्हणाले की, ठाकरे म्हणजे शिवसेना नाही. बाळासाहेबांनी स्वत: असं कधीच म्हटलं नाही. ते नेहमी म्हणायचे शिवसेना माझी नाही. शिवसैनिक आहेत म्हणून मी शिवसेनाप्रमुख आहे. शिवसेना काही खासगी मालमत्ता नाही. त्यामुळे ठाकरे म्हणजे शिवसेना असा समज निर्माण करण्यात आला आहे. असं असेल तर मग शिवसेना राज ठाकरे आणि जयदेव ठाकरे यांची का नाही, असं संजय शिरसाट म्हणाले.

उद्धव ठाकरेंनी घेतलेले निर्णय कसे चुकीचे आणि अन्यायकारक होते, याचा पाढाच संजय शिरसाट यांनी वाचला. राज्यात महाविकास आघाडीचे सरकार त्यावेळी स्थापन झाले असले तरी शिवसेनेला सत्तेत काहीच स्थान नव्हते. राष्ट्रवादी काँग्रेस सरकार चालवत होतं. मग अशा सत्तेतलं मुख्यमंत्रीपद काय कामाचं?, अशानं तुम्ही पक्ष वाढवणार होतात का?, असंही शिरसाट म्हणाले.


हेही वाचा : ठाकरे गटाला पुन्हा मोठा धक्का; कसबा पेठ, चिंचवड निवडणुकीपर्यंतच वापरता येणार मशाल