एसटी कर्मचाऱ्यांची संक्रांत गोड होणार, शासनाकडून 300 कोटींचा निधी उपलब्ध

एसटी कर्मचाऱ्यांचा पगार आजच होणार आहे. 300 कोटी निधी राज्य सरकारने परिवहन महामंडळाला दिला आहे. एसटी कर्मचाऱ्यांचा दरमहा पगार व्यवस्थित व्हावा म्हणून हा निधी देण्यात आला आहे

मुंबईः राज्यातील एसटी कर्मचाऱ्यांसाठी मोठी बातमी समोर येत आहे. राज्य सरकारने एसटी कर्मचाऱ्यांची संक्रांत गोड करण्यासाठी 300 कोटींचा निधी दिला आहे. त्यामुळे एसटी कर्मचाऱ्यांचा पगार आजच होणार आहे. 300 कोटी निधी राज्य सरकारने परिवहन महामंडळाला दिला आहे. एसटी कर्मचाऱ्यांचा दरमहा पगार व्यवस्थित व्हावा म्हणून हा निधी देण्यात आला आहे.

महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळातील कर्मचाऱ्याचे नोव्हेंबर २०२२ वेतन अदा करण्यासाठी निधी उपलब्ध करावा, अशी मागणी महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक यांनी पत्रान्वये शासनाकडे केली आहे. त्या अनुषंगाने महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या कर्मचाऱ्यांच्या नोव्हेंबर २०२२ च्या वेतनासाठी निधी वितरित करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती. महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या कर्मचाऱ्यांच्या नोव्हेंबर २०२२ च्या वर्ष २०२२-२३ साठी गृह परिवहन विभागाच्या २०६४१ ००१८- ३३ अर्थसहाय्य लेखाशीर्षाखाली केलेल्या तरतुदीमधून ३०० कोटी रुपये रक्कम रोखीने प्रदान करण्यास मान्यता देण्यात येत आहेत.

सदर ३०० कोटी हा खर्च वर्ष २०२२-२३ या आर्थिक वर्षामध्ये उपलब्ध असलेल्या तरतुदीमधून भागविण्यात यावा, यासाठी परिवहन आयुक्त, महाराष्ट्र राज्य, मुंबई यांना प्राधिकृत करण्यात येत आहे. सदर निधीची रक्कम महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळास अदा करावी, असेही शासन आदेशात म्हटले आहे.

खरं तर जानेवारी महिना अर्धा संपण्याच्या मार्गावर असातनाच अद्यापही एसटी कर्मचाऱ्यांचा पगार प्रलंबित आहे. पगार न मिळाल्यामुळे एसटी कर्मचारीही आक्रमक झालेत. त्यामुळे सरकारनं 300 कोटींचा निधी देत कर्मचाऱ्यांना काहीसा दिलासा देण्याचा प्रयत्न केलाय. एसटी कर्मचाऱ्यांना 12 तारीख उलटून गेल्यानंतरही अद्याप वेतन मिळालेले नाही, असा आरोप महाराष्ट्र एसटी कामगार संघटनेचा आहे. विशेष म्हणजे तत्पूर्वी राज्य सरकारनं न्यायालयात एसटी कर्मचाऱ्यांचा 7 तारखेपर्यंत पगार देऊ, असे सांगितले होते. त्यावर आता काँग्रेसच्या एसटी कर्मचारी संघटनेचे सरचिटणीस श्रीरंग बरगे नाराजी व्यक्त केली आहे. राज्य सरकार न्यायालयाचा अवमान करत असून, शिंदे-फडणवीस सरकार कामगार विरोधी भूमिका घेत असल्याचंही श्रीरंग बरगे म्हणालेत.

रयत क्रांती संघटनेचे अध्यक्ष सदाभाऊ खोत यांनीसुद्धा शासन निर्णयाचं स्वागत केलं आहे. निश्चितच राज्य सरकारच्या निर्णयाचं मी स्वागत करतो. एसटी कर्मचाऱ्यांच्या कायमस्वरूपी मागण्यांचा विचार करून न्याय मिळणं अत्यंत गरजेचं आहे. गोपीचंद पडळकर आणि मी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांची भेट घेऊन एसटी कर्मचाऱ्यांच्या मागण्या पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करीत आहोत. एसटी हे महाराष्ट्राचं वैभव आहे, ते तेवढ्याच डौलानं आणि सन्मानानं ठेवलं पाहिजे. जनतेच्या सेवेत राहिली पाहिजे. त्यानुसार सरकारसमोर एसटी कर्मचाऱ्यांचा काही मागण्या ठेवून त्यातून मार्ग काढण्याचा प्रयत्न करत राहू, असंही सदाभाऊ खोत म्हणालेत.


हेही वाचाः पाकळ्या मिटून घेण्याचं हे नवं ऑपरेशन कमळ म्हणावं का? – दिलीप वळसे पाटील