Saturday, March 15, 2025
27 C
Mumbai
Homeमहाराष्ट्रDada Khindkar : तरुणाला बेल्ट, काठी अन् पाइपने बेदम मारहाण; धनंजय देशमुखांचा साडू दादा खिंडकर पोलिसांना शरण

Dada Khindkar : तरुणाला बेल्ट, काठी अन् पाइपने बेदम मारहाण; धनंजय देशमुखांचा साडू दादा खिंडकर पोलिसांना शरण

Subscribe

बीड : बीडमधील एक-एक मारहाणीचे व्हिडिओ समोर येत आहेत. सरपंच संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख यांच्या साडूने एकाला बेदम मारहाण केली होती. याचा व्हिडिओ व्हायरल झाला होता. आता धनंजय देशमुख यांचा साडू बीड पोलिसांना शरण गेला आहे. त्यानंतर त्याला पिंपळनेर पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले आहे.

धनंजय देशमुख यांच्या साडूचे नाव दादा खिंडकर आहे. खिंडकर हा बीडमधील बाभुळवाडी गावाचा सरपंच आहे. खिंडकरच्या टोळीने एका युवकाला पाईप, काठ्या आणि बेल्टने मारहाण केली होती. याप्रकरणी खिंडकर विरोधात पिंपळनेर पोलीस ठाण्यात कलम 307, अपहरण, कट रचणे यासह विविध कलमांतर्गत गुन्हे दाखल केले होते. आरोपींमध्ये दादा खिंडकरसह इतरांचा समावेश आहे. व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर खिंडकर पोलीस अधीक्षक कार्यालयात पोलिसांना शरण आला आहे.

संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणी अनेक ठिकाणी आंदोलने आणि सभा घेण्यात आल्या होत्या. त्यात धनंजय देशमुखांसह प्रत्येक ठिकाणी दादा खिंडकर सक्रिय होता. धनंजय देशमुखांनी मस्साजोगमध्ये टाकीवर चढून आंदोलन केले होते. त्यावेळीही दादा खिंडकरने सुद्धा टाकीवर चढून आंदोलन केले होते. व्हिडिओ व्हायरल झाल्यावर एकीकडे आंदोलन करायची दुसरीकडे मारहाण करायची, असे म्हणत एकच संताप व्यक्त करण्यात येत होता.

नेमकं घडलेले काय?

संबंधित व्हिडिओत मारहाण झालेल्या युवकाचे नाव ओंकार सातपुते आहे. तो बाभुळवाडी गावातीलच रहिवाशी आहे. मारहाण करणारा प्रमुख व्यक्ती हा दादा खिंडकर आहे. दादा खिंडकरसह मारहाण करणारा दुसरा व्यक्ती नाना म्हणून आवाज देत आहेत, तो पोलीस कर्मचारी आहे. ओंकार सातपुतेने खिंडकर गँग विरुद्ध पोलिसांत तक्रार दिली होती. त्यामुळे सात जणांनी मिळून सातपुतेचे अपहरण करत शेतात नेऊन त्याला मारहाण केली होती. सदर घटना दोन ते तीन महिन्यांपूर्वीची आहे. खिंडकरविरोधात बीड आणि पिंपळनेर पोलिसांत 307, 395, 353 यांसारखे अनेक गंभीर गुन्हे दाखल आहेत. फिर्यादीवर मारहाण करून दमदाटी करून गुन्हे मागे घ्यायला लावल्याचेही काही प्रकार याने घडवले आहेत.

हेही वाचा : सातत्याने मारहाणीचे व्हिडिओ का समोर येत आहेत? जरांगे-पाटलांनी सांगितले राजकारण