बीड – मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्याकांडातील मास्टरमाईंड म्हणून ज्याचे नाव घेतले जाते त्या वाल्मिक कराडवर बीड जिल्हा रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाला आहे. त्यानंतर वाल्मिक कराडची रवानगी पुन्हा बीड जिल्हा कारागृहात होणार आहे. कराड सध्या न्यायालयीन कोठडीत आहे. बुधवारी मध्यरात्री त्याला पोटात त्रास जाणवत असल्यामुळे जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. येथे त्याच्यावर आयसीयूमध्ये उपचार करण्यात आले. तीन दिवसांच्या उपचारानंतर त्याला डिस्चार्ज देण्यात आला आहे. दरम्यान, त्याच्या आजारपणाबद्दल आमदार सुरेश धस, सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया आणि संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय यांनीही शंका उपस्थित केली होती.
आज मुंबईमध्ये संतोष देशमुख यांच्या हत्येच्या निषेधार्थ आक्रोश मोर्चा काढण्यात आला होता. यावेळी वाल्मिक कराडसह सर्व आरोपींना आर्थर रोड तुरुंगात ठेवण्याची मागणी विविध संस्था संघटनेच्या नेत्यांनी केली. अंजली दमानिया यांनीही वाल्मिक कराडला पोटदुखी आणि स्लिप अॅप्नियासाठी आयसीयूमध्ये ठेवण्याची काय गरज? त्याला आर्थर रोड तुरुंगात टाका, अशी मागणी केली होती.
आर्थर रोड तुरुंगात टाका – दमानिया
खंडणी मागताना, संतोष देशमुख यांची हत्या करताना हा बरा होता आणि आता तुरुंगात याला कोणतं आजारपण आलं. वाल्मिक कराडची ही थेरं सुरु आहेत. त्याच्यासह हत्याकांडातील सर्व आरोपींना मुंबईतील आर्थर रोड तुरुंगात टाकण्याची मागणी दमानियांनी केली होती. तर धनंजय देशमुख यांनी वाल्मिक कराडचा सहकारी कोरेगावचा सरपंच बालाजी तांदळेवर गंभीर आरोप केले आहेत. तांदळे हा संतोष देशमुखांच्या मारेकऱ्यांना कारागृहात भेटायला जातो. त्यांना काय हवं नको ते पाहात आहे. तांदळेचा एक सीसीटीव्ही फुटेज समोर आला आहे. यात तो एका दुकानातून ब्लँकेट खरेदी करताना दिसतो. हेच ब्लँकेट तुरुंगातील आरोपीला देण्यात आल्याचा आरोप करण्यात आला आहे.
कराडवरील उचाराचंची माहिती सार्वजनिक करा, जरांगे पाटलांसह दमानियांची मागणी
मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे यांनीही शनिवारी सकाळी वाल्मिक कराडच्या आयसीयूमधील उपचारांवरुन जिल्हा शल्यचिकित्सक यांना काही प्रश्न केले होते. कराडवर नेमके काय उपचार सुरु आहेत, त्यांच्यावर सुरु असलेल्या उपचारांची माहिती सार्वजनिक केली पाहिजे. त्याचा सीटी स्कॅन करण्यात आला. त्यात काय आढळून आले हे, सार्वजनिक करा. अन्यथा तुमचीही चौकशी केली जाईल. त्याच्यावर उपचार करणाऱ्या सर्व डॉक्टरांची चौकशी होईल असा इशारा जरांगे पाटील यांनी दिला होता. रुग्णालयातील उपचाराच्या निमित्ताने त्याला पळवून लावण्याचा प्रयत्न सुरु आहे का? अशीही शंका जरांगे पाटील यांनी टीव्ही 9 मराठीसोबत बोलतना व्यक्त केली होती.
अंजली दमानिया यांनीही कराडवर सुरु असलेल्या उपचारांची माहिती देण्याची मागणी केली होती. यानंतर शनिवारी रात्री 11 वाजताच्या दरम्यान त्याला डिस्चार्ज देण्यात आला आहे.