Homeताज्या घडामोडीWalmik Karad : वाल्मिक कराडच्या संपत्तीवर टाच येणार; धनंजय मुंडे जगमित्र कार्यालयात

Walmik Karad : वाल्मिक कराडच्या संपत्तीवर टाच येणार; धनंजय मुंडे जगमित्र कार्यालयात

Subscribe

बीड – मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्येतील आरोपी वाल्मिक कराड याच्यावर मकोकानंतर दुसरी मोठी कारवाई करण्याची तयारी सुरु झाली आहे. वाल्मिक कराडच्या विरोधात एसआयटी, सीआयडीने फास आवळण्यास सुरुवात केली आहे. वाल्मिक कराडच्या मालकीच्या जंगम मालमत्ता जप्त करण्यात याव्यात अशी मागणी करणारा अर्ज विशेष तपास पथकाने दाखल केला आहे. तर दुसरीकडे राज्याचे अन्न व नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण मंत्री धनंजय मुंडे परळीतील जगमित्र कार्यालयात दाखल झाले आहेत. जंगम मालमत्ता जप्तीसाठी एसआयटीने अर्ज केला आहे, मात्र कराडची स्थावर मालमत्ता मोठ्या प्रमाणात आहे, त्यावर काय कारवाई करणार असा सवाल विरोधकांकडून विचारला जात आहे.

कराडच्या मालमत्तांवर येणार टाच 

वाल्मिक कराडने हजारो कोटींची संपत्ती जमवल्याचा आरोपी होत आहे. त्या अनुषंगाने तपास यंत्रणांकडून महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यातील कराडच्या मालमत्तेची सर्व माहिती एकत्र केली जात आहे. वाल्मिक कराडवर फास आवळण्यासाठी त्याच्या मालमत्ता जप्तीची कारवाई आता केली जात आहे. त्याच्या सर्व मालमत्तांची माहिती मिळवण्याचे काम सुरु आहे. ज्या मालमत्तांची माहिती समोर आली आहे, त्या जप्त केल्या जात असल्याची माहिती आहे.

वाल्मिक कराड आणि त्यांच्या कुटुंबियांच्या नावावर बीड जिल्ह्यात विविध ठिकाणी शेकडो एकर जमीन असल्याची माहिती आहे. त्याची दुसरी पत्नी म्हटल्या जाणाऱ्या ज्योती जाधवच्या नावावरही बीडमध्ये शेत जमिनी आहेत. वाल्मिक कराड तुरुंगात गेल्यानंतर आता त्याच्या नावावरील मालमत्तांचे हस्तांतरण करण्यास सुरुवात झाल्याचा आरोप भाजप आमदार सुरेश धस यांनी केला आहे. वालमिक कराड आणि मंत्री धनंजय मुंडे हे जगमित्र सहकारी साखर कारखान्यावर संचालक आहेत. आता वाल्मिक कराडच्या  जागेवर धनंजय मुंडे यांचा भाऊ अजय मुंडे याची वर्णी लावली जात असल्याची माहिती आहे. धनंजय मुंडे आज जगमित्रच्या परळी कार्यालयात गेले आहेत.

बीडशिवाय पुणे, पिंपरी चिंचवडमध्ये मालमत्ता 

बीडशिवाय पुणे, पिंपरी-चिंचवड येथील अलिशान सोसायट्यांमध्ये पत्नीच्या नावावर फ्लॅट असल्याचंही समोर आलं आहे. याशिवाय हडपसरमध्ये एका व्यावसायिक इमारतीत एक संपूर्ण फ्लोअर वाल्मिक कराडच्या ड्रायव्हरच्या नावावर असल्याचा आरोप आमदार सुरेश धस यांना आरोप केला होता. या सर्व मालमत्ता जप्त केल्या जाणार असल्याची माहिती आहे.

वाल्मिक कराड रुग्णालयात

संतोष देशमुख हत्या आणि अवादा एनर्जी कंपनी खंडणी प्रकरणी वाल्मिक कराडला अटक करण्यात आली आहे. मात्र गेल्या काही दिवसांपासून तो पोटदुखीच्या आजारमुळे बीड जिल्हा रुग्णालयात आयसीयूमध्ये आहे. त्याचा आज सीटीस्कॅन करण्यात आला आहे. ल्मिक कराड याच्यावर पोटदुखीचे उपचार सुरु आहेत. तपासणी करणाऱ्या डॉक्टरच्या सल्ल्यानुसार उपचाराची पुढील दिशा ठरणार आहे, अशी माहिती प्रभारी जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर एस.बी.राऊत यांनी दिली.

हेही वाचा : Manoj Jarange : फडणवीसांवर आम्हाला विश्वास, मराठा समाजाविषयी राग की प्रेम त्यांनी दाखवून द्यावे; जरांगेंचा पु्न्हा एल्गार