Homeमहाराष्ट्रमराठवाडाManoj Jarange : संतोष देशमुखांच्या कुटुंबियांनी घेतली मनोज जरांगेंची भेट; मुख्यमंत्र्यांकडे केली...

Manoj Jarange : संतोष देशमुखांच्या कुटुंबियांनी घेतली मनोज जरांगेंची भेट; मुख्यमंत्र्यांकडे केली ही मागणी

Subscribe

अंतरवाली सराटी (जालना) – मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे यांनी पुन्हा एकदा आरक्षणासाठी आंदोलन सुरु केले आहे. यावेळी त्यांच्यासोबत मराठा समाजातील बांधवही सामूहिक उपोषण करत आहेत. मराठा समाजाला सरसकट कुणबी जात प्रमाणपत्र देऊन ओबीसीमधून आरक्षणाच्या मागणीवर मनोज जरांगे आग्रही आहेत, यासाठी त्यांनी उपोषण सुरु केले आहे. आज उपोषणाच्या चौथ्या दिवशी त्यांची प्रकृती खालावली आहे. आज बीड जिल्ह्यातील सरपंच दिवंगत संतोष देशमुख यांच्या कुटुंबियांनी मनोज जरांगे यांची भेट घेतली. यावेळी दिवंगत संतोष देशमुख यांच्या पत्नी अश्विनी देशमुख या मनोज जरांगेंची अवस्था पाहून भावूक झाल्या. संतोष देशमुख यांच्या आई शारदाबाई यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लवकरात लवकर निर्णय घेऊन मराठा आरक्षण द्यावे आणि संतोष देशमुखांच्या मारेकऱ्यांना फाशी द्यावी, अशी मागणी केली.

अश्विनी देशमुख म्हणाल्या की, आज मी पहिल्यांदा घराबाहेर पडले. मनोज जरांगे यांच्या भेटीसाठी घराबाहेर पडले. दुःखाचा डोंगर कोसळणं काय असतं, याची जाणीव मला आहे. तशी वेळ कोणावरही येऊ नये. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी लवकरात लवकर न्याय द्यावा. शासनाने न्याय मागण्या मान्य करायला एवढा उशिर का केला? असाही सवाल त्यांनी केला. यावेळी संतोष देशमुख यांच्या आई, मुलगी वैभवी आणि पत्नी अश्विनी यांनी मनोज जरांगे पाटील यांची भेट घेऊन त्यांची विचारपूस केली.

संतोष देशमुखांना मारलं त्यांना फाशी द्या – शारदाबाई देशमुख

संतोष देशमुख यांच्या आई शारदाबाई यांनी देखील आज मनोज जरांगे पाटील यांची भेट घेतली. यावेळी त्या म्हणाल्या की, मुख्यमंत्र्यांनी पटकन आरक्षण द्यावं, मी जरांगे पाटलांना विनंती केली की उपोषणाला बसू नका, तुम्हीच बसले तर आम्हाला कोण आहे. मला न्याय पाहिजे, ज्यांनी संतोष देशमुखांना मारलं, त्या आरोपींना फाशी द्यावी, अशी मागणी त्यांनी केली. तसेच त्या म्हणाल्या की, आम्हाला संरक्षण पाहिजे. लवकरात लवकर निर्णय झाला पाहिजे, नाहीतर आमची सुद्धा सहनशक्ती संपली आहे. वेळेला पण काही मर्यादा असते. राज्य सरकारने यामध्ये लक्ष घालावं आणि त्यांना पटकन फाशी द्यावी, म्हणजे माझ्या जीवाला समाधान वाटेल, असं संतोष देशमुख यांच्या आई शारदाबाई यांनी म्हटलं आहे.

दोन उपोषणकर्त्यांची प्रकृती बिघडली 

आज मनोज जरांगे यांच्या सामूहिक उपोषणातील दोघांची प्रकृती बिघडली. त्यांना हॉस्पिटलमध्ये हलवण्यात आले आहे. तर मनोज जरांगे यांचीही प्रकृती बिघडली होती, डॉक्टरांच्या पथकाने त्यांची तपासणी केली.

हेही वाचा : Dhananjay Munde : अंजली दमानियांचे ऑफस ऑफ प्रॉफिटचे आरोप धनंजय मुंडेंनी टोलवले; म्हणाले…