Sunday, March 16, 2025
27 C
Mumbai
Homeमहाराष्ट्रSantosh Deshmukh Murder : पोलीस अधिकारी महाजन, राजेश पाटील यांच्यावर कारवाई करा; आंदोलनाची सूत्रे जरांगे पाटलांच्या हाती

Santosh Deshmukh Murder : पोलीस अधिकारी महाजन, राजेश पाटील यांच्यावर कारवाई करा; आंदोलनाची सूत्रे जरांगे पाटलांच्या हाती

Subscribe

मस्साजोग (बीड) – सरपंच संतोष देशमुख हत्याकांड प्रकरणातील आरोपींना प्रत्यक्ष अप्रत्यक्ष मदत करणाऱ्यांवर कारवाईसाठी गावकरी आक्रमक झाले आहेत. संतोष देशमुख यांच्या हत्येला 68 दिवस झाल्यानंतरही आरोपी कृष्ण आंधळे फरार आहे. त्याचा शोध एसआयटी, सीआयडी आणि बीड पोलिसांना लावता आलेला नाही. तर दुसरीकडे भाजप आमदार सुरेश धस यांनी गुप्तपणे धनंजय मुंडे यांची भेट घेतली आहे. यामुळे गावकऱ्यांमध्ये संतप्त भावना आहे. केज पोलीस ठाण्याचे प्रशांत महाजन, राजेश पाटील यांना बडतर्फ करुन त्यांच्यावरही गुन्हे दाखल करण्यात यावे. राजेश पाटील यांना 9 डिसेंबर 2024 रोजी संतोष देशमुख यांना कोण आणि कुठे घेऊन गेले याची सर्व माहिती होती. त्यांनाही मुख्य आरोपी केले पाहिजे यासाठी गावकऱ्यांनी आंदोलनाचा इशारा दिला आहे.

संतोष देशमुख हत्याकांडाला भाजप आमदार सुरेश धस यांनी आक्रमकपणे मांडले आहे. जिल्ह्याजिल्ह्यात त्यांच्या नेतृत्वात आक्रोश मोर्चे काढण्यात आले. यावेळी त्यांनी केलेली भाषणे ही संतोष देशमुख कुटुंबियांच्या न्यायासाठी ते भांडत असल्याचे दाखवणारी होती. सत्ताधारी पक्षाचे आमदार असूनही महायुतीचा प्रमुख घटकपक्ष असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) नेते आणि मंत्री धनंजय मुंडे यांच्याविरोधात त्यांनी एल्गार पुकारला होता. मात्र ज्यांच्यावर हत्याकांड प्रकरणात गंभीर आरोप केले त्यां धनंजय मुंडेंची आमदार धस यांनी गुप्त भेट घेतली. साडेचार तास दोघांमध्ये चर्चा झाली. एकदा नाही तर दोन वेळा ते धनंजय मुंडे यांना भेटले. यामुळे त्यांच्या भूमिकेबद्दल आता मस्साजोग ग्रामस्थांना शंका आहे. त्यामुळे आज (सोमवार) रात्री मस्साजोग ग्रामस्थांची महत्त्वाची बैठक झाली. यामध्ये तपास यंत्रणा आणि सरकारला आरोपींना पकडण्यासाठी 25 फेब्रुवारीपर्यंतची मुदत देण्यात आली आहे. त्यानंतर मस्साजोगचे ग्रामस्थ सामुहिक अन्नत्याग आंदोलन करण्याच्या तयारीत आहे, असे स्वरुपानंद देशमुख यांनी सांगितले.

मनोज जरांगेच्या नेतृत्वात यापुढील आंदोलन 

स्वरुपानंद देशमुख म्हणाले की, संतोष देशमुख हत्याकांडाचा मुद्दा मराठा आरक्षण आंदोलनक मनोज जरांगे यांनी उपस्थित केला, त्यानंतर पोलिसांनी तक्रार दाखल करुन घेतली आणि आरोपींची धरपकड सुरु झाली. मनोज जरांगे पाटील यांनी पुढाकार घेतल्यामुळेच मस्साजोगच्या ग्रामस्थांना न्याय मिळाला आहे. यापुढेही जरांगे पाटील यांच्या नेतृत्त्वात आंदोलन केले जाईल. अवादा कंपनीच्या खंडणी प्रकरणातून हे हत्याकांड झाले आहे. अवादा कंपनी प्रशासनानेही यापुढे प्रत्यक्ष मैदानात उतरून आरोपींविरोधात बोलायला पाहिजे, यासाठी कंपनीच्या अधिकाऱ्यांची भेट घेणार असल्याचेही स्वरुपानंद देशमुख यांनी सांगितले.

काय आहे ग्रामस्थांची मागणी

केज पोलीस ठाण्याचे प्रशांत महाजन, पोलीस निरीक्षक राजेश पाटील यांना बडतर्फ करुन त्यांच्यावर मुख्य आरोपी म्हणून गुन्हा दाखल करण्यात यावा.

वाशी पोलीस ठाण्याचे पीआयला आरोपी करण्यात यावे.

ज्येष्ठ सरकारी वकील उज्ज्वल निकम यांची संतोष देशमुख खटल्यात नियुक्ती करण्यात यावी.

देशमुख हत्याकांड प्रकरण फास्टट्रॅक कोर्टात चालवावे.

वरील सर्व मागण्यांचा विचार झाला नाही तर 25 फेब्रुवारीपासून ग्रामस्थांचे अन्नत्याग आंदोलन

हेही वाचा : Beed : संतोष देशमुखांच्या न्यायासाठी मस्साजोगचे ग्रामस्थ आक्रमक, 25 फेब्रुवारीपर्यंतचा इशारा दिला