Homeमहाराष्ट्रमराठवाडाWalmik Karad : कराडवर उपचार करणाऱ्या डॉ. थोरातांबद्दल दमानियांचे सवाल; सुरेश धसांनी...

Walmik Karad : कराडवर उपचार करणाऱ्या डॉ. थोरातांबद्दल दमानियांचे सवाल; सुरेश धसांनी केली पाठराखण

Subscribe

बीड – संतोष देशमुख हत्याकांड प्रकरणामध्ये वाल्मिक कराड आणि त्याच्या गँगनंतर पोलीस आणि आता डॉक्टरांवरही गंभीर आरोप होत आहेत. वाल्मिक कराडला तीन दिवस हॉस्पिटलमध्ये ठेवण्यात आले होते. याकाळात डॉ. अशोक थोरात यांनी त्याच्यावर उपचार केल्याची माहिती आहे. विशेष म्हणजे डॉ. थोरात यांनीच सरपंच संतोष देशमुख यांचा पोस्टमॉर्टम रिपोर्ट दिला होता. त्यामुळे यांनी योग्य प्रकारे कारवाई केली की नाही, याबद्दल मनात शंका येते. जेवढे भ्रष्ठ लोक आहेत, ते काय पैशांसाठी काहीही करतील. असाही आरोप दमानिया यांनी केला आहे. तर दमानिया यांना खालच्या लोकांनी काही चुकीची माहिती दिली असेल. डॉ. थोरात यांनी आठ पानांचा योग्य पोस्टमॉर्टम रिपोर्ट दिला आहे. त्यावरुनच मी सभागृहात प्रश्न विचारले. असे आमदार सुरेश धस म्हणाले आहेत. एसआयटी योग्य प्रकारे काम करत आहे. फरार कृष्णा आंधळे यालाही लवकरात लवकर ताब्यात घ्यावे, अशी मागणी आमदार धस यांनी केली आहे.

डॉ. थोरातांवर दमानियांचे आरोप

डॉ. अशोक थोरात यांचे अंबेजोगाई येथे एक लक्झरी हॉटेल आहे. त्यासोबतच त्यांचे स्वतःचे हॉस्पिटल देखील आहे. शासकीय नोकरीत असताना ते स्वतःचे हॉस्पिटल कसे चालवू शकतात? असा सवालही दमानियांनी केला आहे. सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया म्हणाल्या, “धनंजय मुंडे आणि वाल्मिक कराडच्या कृपेने डॉ. थोरातांची बदली पुन्हा बीडमध्ये झाली. कालच त्यांच्या अंबेजोगाईतील एका मोठ्या लक्झरी हॉटेलबद्दल कळालं. ते बघून धक्काच बसला. ही व्यक्ती जर संतोष देशमुख यांच्या पोस्टमार्टम रिपोर्टची सगळी डिटेल्स देणार असेल, तर यांनी योग्य कारवाई केली की नाही, अशी शंका मनात येते. कारण हे जेवढे भ्रष्ट लोक आहेत ना, ते पैशांसाठी काय वाटेल ते करतात.” असा दावा दमानियांनी केला.

डॉ. थोरातांसारखी व्यक्ती कराडला आरामातच ठेवणार ना…

डॉ. थोरात यांचे अनेक राजकीय नेत्यांसोबत संबंध आहेत. त्यांनी लोकसभा आणि विधानसभा निवडणूक लढवण्याचीही तयारी केली होती. त्यांनी दोनवेळा व्हीआरएस (स्वेच्छा निवृत्ती) घेण्याची विनंती केली होती, मात्र त्यांच्यावर प्रलंबित असलेल्या आरोपांमुळे त्यांना व्हीआरएस सुद्धा मिळाली नाही. असेही दमानियांनी म्हटले आहे. वाल्मिक कराडला नुकताच बीड जिल्हा रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाला आहे. डॉ. थोरात सारखी व्यक्ती तिथे असेल तर कराडला आरामातच ठेवणार ना, असेही दमानियांनी म्हटले आहे.

अंजली दमानिया म्हणाल्या, “कराडला हॉस्पिटलमध्ये आणण्याची काहीही गरज नव्हती. पहिल्यांदा त्याला बेसिक तपासणी करुन पाठवून देण्यात आले होते. दुसऱ्यांदा पुन्हा रुग्णालयात आणले आणि अॅडमिट करुन घेतले. आम्ही ओरड केल्यानंतर त्याला तिथून हलवले.”

कराडला मदत करणाऱ्यांमध्ये पोलिसांचाही समावेश आहे, असा आरोप दमानियांनी केला आहे. त्या म्हणाल्या, “प्रशांत महाजन, राजेश पाटील आणि बारगळ या तीन पोलीस अधिकाऱ्यांवर गुन्हेगार म्हणून जोपर्यंत कारवाई होत नाही. डॉ. अशोक थोरात सारख्या डॉक्टरवर कारवाई होत नाही, तोपर्यंत प्रत्येक गुन्हेगार आपापल्या ठिकाणी कम्फर्टेबल असतो. गुन्हेगारांना कम्फर्टेबल करणारे धनंजय मुंडे आहेत, म्हणून परत आपण त्यांच्या राजीनामाची मागणी मुख्यमंत्री फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे करत आहोत.” असं अंजली दमानिया म्हणाल्या.

अजित पवारांना मुंडे-कराड संबंधाचे पुरावे देणार

वाल्मिक कराड आणि धनंजय मुंडे यांचे कसे संबंध आहेत. याचे पुरावे देण्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवारांकडे वेळ मागितला आहे. अजित पवार आणि माझे कधीही जमलेले नाही. आमच्यात 36चा आकडा आहे. मात्र तरीही मी त्यांच्याकडे भेटीसाठी वेळ मागितला आहे. पाहूया ते आता कधी वेळ देतात, असे ट्वीट अंजली दमानियांनी केले आहे.

हेही वाचा : Manoj Jarange : आम्ही दहशतवादी नाही, पंकजा मुंडेंच्या भेटीवर मनोज जरांगेंची प्रतिक्रिया