Homeक्राइमSantosh Deshmukh Murder Case : बीडमध्ये आरोपींची बडदास्त, बालाजी तांदळेने केली ब्लँकेट...

Santosh Deshmukh Murder Case : बीडमध्ये आरोपींची बडदास्त, बालाजी तांदळेने केली ब्लँकेट खरेदी

Subscribe

बीड – मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्याकांडातील आरोपीची बालाजी तांदळे हा वारंवार तुरुंगात जाऊन भेट घेत असल्याचा आरोप धनंजय देशमुख करत आहेत. आता एक सीसीटीव्ही फुटज समोर आले आहे, त्यामुळे धनंजय देशमुखांच्या दाव्याला बळ मिळत आहे. संतोष देशमुख हत्याकांडाचा तपास हा सुरु असताना वाल्मिक कराडचा सहकारी आणि कोरेगावचा सरपंच बालाजी तांदळे याचा एक सीसीटीव्ही फुटेज समोर आले आहे. बालाजी तांदळे एका दुकानातून ब्लँकेटची खरेदी करत आहे. हेच ब्लँकेट पोलिस कोठडीत असलेल्या संतोष देशमुखांच्या मारेकऱ्यापर्यंत पोहचवण्यात आल्याचा आरोप धनंजय देशमुख यांनी केला आहे.

आरोपींसाठी ब्लँकेट खरेदी 

संतोष देशमुख हत्येचा तपास एसआयटी आणि सीआयडी करत आहे. या तपासादरम्यान धनंजय देशमुख सीआयडी अधिकाऱ्यांच्या भेटीला गेले होते. त्यावेळी बालाजी तांदळेने त्यांना धमकावल्याचा आरोप त्यांनी केला होता. आता तोच तांदळेआरोपींसाठी ब्लँकेट खरेदी करत असल्याचे समोर आले आहे. या सीसीटीव्ही फुटेज मध्ये बालाजी तांदळे आरोपींसाठी ब्लँकेट खरेदी करताना दिसतो आहे. बालाजी तांदळे याने सीआयडी ऑफिसर असल्याची बतावणी करत बीड शहर पोलीस ठाण्यात वाल्मीक कराडला भेटण्यासाठी प्रवेश केला होता. यावेळी तो वाल्मीक कराड याला भेटला देखील, असा आरोप धनंजय देशमुख यांनी केला होता. तर यावेळी बालाजी तांदळे याने सुदर्शन घुलेचा फोटो दाखवून धमकावल्याची तक्रार देखील धनंजय देशमुख यांनी केली होती.

बालाजी तांदळे हा संतोष देशमुख हत्येतील मारेकऱ्यांची कोठडीत बडदास्त ठेवत असल्याचा आरोप होत आहे. याच तांदळेने आरोपी विष्णू चाटेला न्यायालयाच्या आवारात पाण्याच्या बॉटल्स दिल्या होत्या. आता विष्णू चाटे, सुदर्शन घुले, जयराम चाटे, महेश केदार यांना गेवराईच्या पोलीस कोठडीत ठेवले होते. त्यादरम्यान त्यांना लागणारे साहित्य बालाजी तांदळेने एका दुकानातून खरेदी केले. याचाच हा सीसीटीव्ही समोर आलाय. आणि हे पोलीस कोठडीत असलेले आरोपी साठीच ब्लँकेट घेतले होते, असा आरोप धनंजय देशमुख यांनी केला आहे. हे सीसीटीव्ही फुटेज सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. त्यामुळे आता बालाजी तांदळे याला पोलीस चौकशीसाठी ताब्यात घेणार का, हे पाहावे लागेल. कोठडीतील आरोपींना ब्लँकेट पुरवल्याची बाब सिद्ध झाल्यास बालाजी तांदळे याच्या अडचणी वाढू शकतात.

मुंबईत आक्रोश मोर्चा 

दरम्यान, आज मुंबईमध्ये आक्रोश मोर्चा काढण्यात आला होता. यावेळी वाल्मिक कराडसह सर्व आरोपींना आर्थर रोड तुरुंगात ठेवण्याची मागणी विविध संस्था संघटनेच्या नेत्यांनी केली. अंजली दमानिया यांनीही वाल्मिक कराडला पोटदुखी आणि स्लिप अॅप्नियासाठी आयसीयूमध्ये ठेवण्याची काय गरज. त्याला आर्थर रोड तुरुंगात टाका, अशी मागणी केली आहे.

हेही वाचा : Walmik Karad : वाल्मिक कराडच्या संपत्तीवर टाच येणार; धनंजय मुंडे जगमित्र कार्यालयात