पुणे – वाल्मिक कराड सीआयडीला शरण आल्यानंतर त्याच्या संबंधीचे एक ना अनेक खुलासे होऊ लागले. वाल्मिक कराडला आज हत्येच्या गुन्ह्यात आरोपी करण्यात आले आहे. तर त्याच्यावर मकोकानुसारही कारवाई केली आहे. वाल्मिक कराडने दहशतीच्या माध्यमातून कोट्यवधींची माया जमवली असल्याचा आरोप आमदार सुरशे धस यांनी केला आहे. खंडणी, दहशतीतून जमवलेली माया वाल्मिक कराडने वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या लोकांच्या नावाने गुंतवल्याचे आता उघड होत आहे. पुण्यातील प्राइम लोकेशनवर संतोष देशमुख हत्याकांडातील मास्टरमाईंड म्हटला जाणारा वाल्मिक कराडने ऑफिस स्पेस विकत घेतल्याचा दावा केला जात आहे. फर्ग्युसन रस्त्यावर एका महिलेच्या नावाने वाल्मिक कराडने फ्लॅट खरेदी केले आहेत. ही महिला कोण आहे, या दोघांचा संबंध काय आहे, याचीही चर्चा आता सुरु झाली आहे.
वाल्मिक कराड याचे पुण्यात फ्लॅट आहेत. पुण्यातच वाल्मिक कराड सीआयडीला शरण आला. वाल्मिक कराड पुण्यात कोणाकडे राहात होता, याचाही शोध घेतला पाहिजे, अशी मागणी खासदार बजरंग सोनवणे यांनी केली आहे. त्यामुळे वाल्मिक कराड आणि पुणे कनेक्शन नेमकं काय आहे, याची चौकशी करा, अशी मागणी आमदार सुरेश धस यांनी केली आहे. आता पुण्यातील फर्ग्युसन रस्त्यावर असलेल्या इमारतीची कागदपत्रे समोर आली आहेत. यानुसार वाल्मिक कराड याने ज्योती जाधव या महिलेच्या नावाने दोन ऑफिस स्पेस खरेदी केली आहेत.
प्राईम लोकशनवरील दोन ऑफिसेसची खरेदी
पुण्यातील प्राईम लोकेशन असलेल्या फर्ग्युसन रस्त्यावर कुशल वॉल स्ट्रिट येथे निर्माणाधीन इमारतीमध्ये वाल्मिक कराडने गुंतवणूक केली आहे. वाल्मिक कराडने ज्योती जाधव या महिलेच्या नावाने 610 सी अपार्टमेंट खरेदी केले आहे. 45.71 चौरस मीटर एवढा कार्पेट एरिया या ऑफिसचा आहे. यामध्ये पार्किंग एरिया देखील आहे. या इमारतीत 611 बी ऑफिस देखील ज्योती जाधव याच महिलेच्या नावाने खरेदी केले आहे. या दोघांचा संबंध काय असा प्रश्न आता उपस्थित केला जात आहे.
ईडी चौकशी होणार का?
वाल्मिक कराड बेपत्ता होता, तेव्हा त्याच्या पत्नीसह ज्योती जाधव या महिलेचीही एसआयटीने चौकशी केली होती. आमदार सुरेश धस यांनी भाषणात म्हटले की, ज्योती जाधव ही वाल्मिक कराडची दुसरी पत्नी आहे. या दाव्यात काय तथ्य आहे, हे देखील तपासातून समोर येण्याची शक्यता आहे. या मालमत्ता समोर आल्यानंतर आता वाल्मिक कराडची ईडी चौकशी होणार का, असाही सवाल विरोधक करत आहेत.