सप्तश्रुंगी गड : चैतन्यमय वातावरणात नवरात्रोत्सवारंभ

सप्तश्रृंग गड : लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेले महाराष्ट्रातील साडेतीन शक्तीपीठापैकी आद्यस्वयंभू शक्तीपीठ असलेल्या श्री सप्तशृंग निवासिनी देवीचा नवरात्रोत्सव अतिशय आनंदात व भक्तिमय वातावरणात प्रारंभ झाला असून, पहाटेपासून विविध धार्मिक पूजा-अर्चा यांसह महावस्त्र व अलंकाराची ट्रस्टच्या मुख्य कार्यालयात अलंकारांचे पूजन अध्यक्ष वर्धन पी. देसाई यांच्या हस्ते करून ढोल-ताशाच्या गजरात सवाद्य मिरवणूक काढण्यात आली. चोख सुरक्षा व्यवस्था व सेवा-सुविधेच्या माध्यमातून देवस्थान कर्मचारी व प्रशासकीय विभागातील अधिकारी व कर्मचारी यात्राोत्सव यशस्वीतेसाठी कार्यरत आहेत. यात्रा सुरळीत पार पडण्यासाठी स्वयंसेवी संघटनांचाही सहभाग आहे.

घटस्थापनेची मुख्य महापूजा प्रमुख जिल्हा न्यायाधीश श्रीचंद दौलतराम जगमलानी यांच्या हस्ते सपत्नीक करण्यात आली. यावेळी विश्वस्त संस्थेचे अध्यक्ष तथा जिल्हा व सत्र न्यायाधीश श्री. वर्धन पी. देसाई, पालकमंत्री दादा भुसे, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे कुटुंबीय, विश्वस्त बंडू कापसे, विश्वस्त अ‍ॅड. ललित निकम, विश्वस्त मनज्योत पाटील, विश्वस्त प्रशांत देवरे, विश्वस्त भूषणराज तळेकर, राजशिष्टाचार अधिकारी नितीन आरोटे, व्यवस्थापक सुदर्शन दहातोंडे, कार्यकारी अधिकारी भगवान नेरकर, कार्यालयीन अधीक्षक प्रकाश जोशी, इस्टेट कस्टोडियन प्रकाश पगार, जनसंपर्क अधिकारी भिकन वाबळे, सुरक्षा विभाग प्रमुख यशवंत देशमुख उपस्थित होते.

पहिल्या माळेला सुरुवात होताच सुमारे ६० हजार भाविकांनी भगवतीचे दर्शन घेतले. तर, ९ ते १० हजार भाविकांनी प्रसादालयात मोफत महाप्रसादाचा लाभ घेतला. यात्रोत्सवादरम्यान २ वेळचे मोफत अन्नदान (महाप्रसाद) सुविधा सुरू असून येणार्‍या भाविकांसाठी २४ तास मंदिर दर्शनासाठी खुले करण्यात आलेले आहे. सप्तशृंगगड परिसरात भाविकांची गैरसोय टाळण्यासाठी उद्घोषण कक्ष सुरू आहे.

सुरक्षेसाठी उपाययोजना 

  • सुरक्षितेच्या दृष्टीने २५६ सीसीटीव्ही कॅमेरे कार्यरत आहेत.
  • १७० सुरक्षारक्षक, आपत्ती व्यवस्थापन प्रक्रियेतील स्वयंसेवक तसेच महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळाचे १० व इतर ३ असे १३ बंदुकधारी सुरक्षारक्षक, राज्य पोलीस, राज्य गृहरक्षक दल, कर्मचारी व अधिकारी वर्ग लक्ष ठेवून आहेत
  • ऐनवेळी उदभवणार्‍या आपत्तीसाठी २४ तास अग्निशमन सुविधा व प्रथोमपचार केंद्र कार्यान्वित करण्यात आलेले आहे.
  • न्यासाच्या वतीने सर्व भाविकांसाठी अल्पदरात निवास व्यवस्था असून अखंड विजपुरवठ्यासाठी राज्य विद्युत महामंडळ व न्यासाच्या ५ जनरेटरची व्यवस्था करण्यात आली आहे.
  • संस्थानमार्फत संपूर्ण गड परिसर स्वच्छतेसाठी ५० कर्मचारी नेमणूक करण्यात आली आहे.
  • उत्सवाप्रसंगी भाविकांसाठी आपत्कालीन परिस्थितीत टोल फ्री क्रमांक कार्यान्वित
  • मेटल डिटेक्टर, हँड मेटल डिटेक्टरद्वारे तपासणीनंतरच भाविकांना मंदिरात दर्शनासाठी सोडले जात आहे.
  • २६ सप्टेंबर ते ५ ऑगस्ट, तसेच ८ व ९ ऑगस्ट या कालावधीत नांदुरी गड पायथा ते गड यांदरम्यानची खासगी वाहतूक पूर्णपणे बंद
  • भाविकांसाठी राज्य परिवहन महामंडळाच्या बसेस तैनात करण्यात आल्या आहेत.
  • सप्तशृंग गडापासून एक किलो मीटर अंतरावर तात्पुरते बसस्थानक उभारण्यात आले आहे.