मुंबई : लोकसभा निवडणुकीतील पराभवानंतर महायुतीने विधानसभा निवडणुकीत दमदार पुनरागमन केले. विधानसभा निवडणूक जिंकण्यासाठी 145 चा आकडा गाठणे आवश्यक असते, मात्र महायुतीने 236 पर्यंत मजल मारली. मात्र या विजयावर महाविकास आघाडीकडून संशय व्यक्त होताना दिसत आहे. ईव्हीएम हॅक, चुकीच्या पद्धतीने मतमोजणी अशा प्रकारचे आरोप होत आहेत. याप्रकरणी आता प्रसिद्ध वकील असीम सरोदे यांनी या निकालाविरोधात न्यायालयात दाद मागण्याचा निर्णय घेतला आहे. (Sarode to file appeal in court against Maharashtra assembly election results)
माध्यमांशी संवाद साधताना असीम सरोदे म्हणाले की, आपण जेव्हा मतदान करतो. ही प्रक्रिया तेव्हा पूर्ण होते, जेव्हा आपण दिलेलं मत ज्याला दिलं आहे, त्याच्यापर्यंत पोहचतं. पण सध्याच्या निवडणूक प्रक्रियेत आपण कोणाला मतदान करतो आणि ते कोणाला जातं, याबाबत लोकांच्या मनात शंका आहे. याबाबत न्यायालय कायदेशीर बाबी तपासू शकते. पण यात काही तांत्रिक बाजूदेखील आहेत. याशिवाय या गोष्टी सिद्ध होऊ शकत नाही. कारण राज्यात कुठलीही लाट नसताना बहुमत मिळालयं, ज्याने शंकांना वाट करून दिली आहे. त्यामुळे अनेकांनी कालच्या निकालाबाबत न्यायालयात जायचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे आम्ही न्यायालयात निवडणूक याचिका दाखल करणार आहोत, अशी माहिती सरोदे यांनी दिली.
हेही वाचा – Maharashtra Politics : मुख्यमंत्रीपदी कोण? राष्ट्रवादीच्या तीन नेत्यांच्या वेगवेगळ्या भूमिका
कालच्या निकालात अनेक दिग्गज उमेदवार पराभूत झाले, तेही तुमच्यासोबत आहेत का? असा प्रश्न विचारला असता असीम सरोदे म्हणाले की, अनेक पराभूत उमेदवारांनी मला संपर्क केला आहे. ते या निकालाला न्यायालयात आव्हान देणार आहेत. प्रत्येक उमेदवार त्याच्या मतदारसंघातील परिस्थिती काय होती? तसेच कोणकोणत्या प्रकारचे आक्षेप घेण्यात आले? ते पाहून आम्ही स्वतंत्र याचिका दाखल करणार आहोत. कारण निवडणुकीतील संपूर्ण प्रक्रियाच संशयास्पद आहे, असे सर्वसामान्य माणूसही बोलत आहे. त्यामुळे यासंदर्भात न्यायालयात दाद मागितलीच पाहिजे, अशी भूमिका सरोदे यांनी मांडली.
न्यायालयात यंत्रणा शुद्धीकरण करू शकतो
दरम्यान, असीम सरोदे म्हणाले की, मोकळ्या आणि प्रामाणिक वातावरणात निवडणुका झाल्या नसतील, अशा निवडणुकांना न्यायालयात आव्हान दिलेच पाहिजे. काँग्रेस, शरद पवार गट आणि ठाकरे गटाच्या उमेदवारांसह पराभूत अपक्ष उमेदवारांनीही माझ्याशी संपर्क साधला आहे. अनेक उमेदवारांचा पाचशे आणि एक हजार मतांनी पराभव झाला आहे. त्यांनी मतमोजणीवर आक्षेप घेत, व्हीव्हीपॅटसोबत मत पडताळणी करण्याची मागणी केली होती. पण त्यांची मागणी फेटाळण्यात आली. मतदान केंद्रावरचे निवडणूक अधिकारी जर एखाद्या राजकीय पक्षाच्या दबावाखाली येत असतील तर हे सर्व न्यायालयात मांडले पाहिजे. आपल्या देशात लोकशाही आहे. त्यामुळे न्यायालयात जाऊन आपण यंत्रणा शुद्धीकरण करू शकतो, असेही असीम सरोदे म्हणाले.
हेही वाचा – Legislative Council seat vacant : निवडणूक जिंकली, आता विधान परिषदेच्या 6 जागांवर कोणाला संधी?