सरपंचपदाच्या बोलीची चौकशी करावी – हसन मुश्रीफ

राज्यातील १४ हजाराहून अधिक गावात ग्रामपंचायत निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. स्थानिक पातळीवर निवडणूक बिनविरोध पार पडावी म्हणून प्रयत्न सुरू असताना सरपंचपदासाठी बोली लागल्याच्या घटना समोर येऊ लागल्या आहेत.

Sarpanch Election should be investigated - Hasan Mushrif

ग्रामपंचायत निवडणुकीत सरपंचपदासाठी बोली लागल्याच्या घटना समोर आल्या आहेत. अशा पध्दतीने सरपंचपदासाठी बोली लागणे लोकशाहीसाठी घातक असून या घटनांची चौकशी करण्यात यावी,अशी मागणी ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी राज्य निवडणूक आयोगाकडे केली आहे.

राज्यातील १४ हजाराहून अधिक गावात ग्रामपंचायत निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. स्थानिक पातळीवर निवडणूक बिनविरोध पार पडावी म्हणून प्रयत्न सुरू असताना सरपंचपदासाठी बोली लागल्याच्या घटना समोर येऊ लागल्या आहेत. या पार्श्वभूमीवर हसन मुश्रीफ यांनी मंगळवारी राज्य निवडणूक आयोगाला पत्र लिहून चौकशीची मागणी केली आहे.

ग्रामपंचायत निवडणुकीनंतर सरपंचपदाची निवडणूक बिनविरोध पार पडल्यावर निधी देणे ही वेगळी बाब आहे. मात्र, सरपंचपदासाठी लाखो रुपयांची बोली लागणे योग्य नाही. हा चुकीचा पायंडा आहे. यामुळे धनशक्तीच्या जोरावर पदे मिळवली जातील. चांगले आणि गरीब कार्यकर्ते निवडणुकीत निवडून येऊ शकणार नाही, असे मुश्रीफ यांनी सांगितले.

नाशिक जिल्ह्यातील उमराणे (ता. देवळा) ग्रामपंचायतीच्या सरपंचपदासाठी झालेल्या बोलीचा व्हिडीओ सध्या व्हायरल झाला आहे. येथे प्रशांत देवरे यांच्या नेतृत्वाखालील पॅनलने २ कोटी ५ लाख रुपयांची बोली लावल्याचे समोर आले. बोलीची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर ग्रामपंचायत निवडणूक बिनविरोध होणार असल्याचे जाहीर करण्यात आले.


हेही वाचा – सतेज पाटील दहशत पसरवत आहेत – रविकिरण इंगवले