सतेज पाटील विधानपरिषदेत कॉंग्रेसचे गटनेते; बाळासाहेब थोरातांनी केली घोषणा

सतेज बंटी पाटील यांनी कोल्हापूर जिल्हयात पक्ष संघटना वाढीस चालना दिली आहे. 2010- 14 च्या आघाडी सरकारमध्ये त्यांनी राज्यमंत्री म्हणून काम पाहिले आहे. 2019 च्या महाविकास आघाडी सरकारमध्ये त्यांनी गृह राज्यमंत्री, ग्रामविकास, अन्न व औषध प्रशासन अशा विविध विभागांची जबाबदारी यशस्वीपणे पार पाडली आहे.

satej patil

मुंबईः राज्याचे माजी गृह राज्यमंत्री व विधान परिषद सदस्य सतेज बंटी पाटिल यांची काँग्रेसच्या विधान परिषद गटनेते पदी नियुक्ती करण्यात आली आहे. विधिमंडळ पक्षनेते बाळासाहेब थोरात यांनी त्यांची नियुक्ती केल्याचे गुरुवारी जाहीर केले. विधानपरिषदेच्या उपसभापती निलमताई गो-हे यांनी सभागृहात त्यांच्या निवडीची घोषणा केली

सतेज बंटी पाटील यांनी कोल्हापूर जिल्हयात पक्ष संघटना वाढीस चालना दिली आहे. 2010- 14 च्या आघाडी सरकारमध्ये त्यांनी राज्यमंत्री म्हणून काम पाहिले आहे. 2019 च्या महाविकास आघाडी सरकारमध्ये त्यांनी गृह राज्यमंत्री, ग्रामविकास, अन्न व औषध प्रशासन अशा विविध विभागांची जबाबदारी यशस्वीपणे पार पाडली आहे.

“काँग्रेस पक्षाने आजपर्यंत दिलेल्या जबाबदारीला न्याय देण्याचा आपण प्रयत्न केला आहे. आता पक्षाने गटनेतेपदाची जबाबदारी दिली आहे, या पदालाही न्याय देण्याचा प्रयत्न करू”. पक्षातील वरिष्ठ नेत्यांनी माझ्यावर विश्वास व्यक्त केला त्याबद्दल मी सर्व वरिष्ठांचे आभार व्यक्त करतो”, असे सतेज पाटील म्हणाले.

दरम्यान, तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या सांगण्यावरून एकनाथ शिंदे यांना झेड प्लस दर्जाची सुरक्षा पुरविण्यात आली नाही, असा आरोप सतेज पाटील यांच्यावर झाला होता. त्यावेळी ते गृह राज्यमंत्री होते. हा आरोप सतेज पाटील यांनी फेटाळून लावला होता. शंभुराज देसाई आणि मी गृह राज्यमंत्री होतो. पण एखाद्या व्यक्तीला संरक्षण द्यायचे की नाही, हा निर्णय आम्ही घेत नव्हतो. मुख्य सचिवांच्या नेतृत्वाखाली एक समिती असते, त्या समितीच्या माध्यमातून संबंधित व्यक्तीला धोका आहे का? याचे विश्लेषण केले जाते. धोका असल्यास एसआयटीकडून अहवाल दिला जातो. त्यानंतर संबंधित व्यक्तीला संरक्षण पुरवले जाते. मुख्यमंत्री किंवा गृहमंत्री यात हस्तक्षेप करत नाही. शिवाय, त्यावेळी शिवसेना पक्षप्रमुख आणि एकनाथ शिंदे हे एकत्र होतेच. त्यामुळे एकनाथ शिंदेंना संरक्षण पुरवू नका, अशी सूचना मुख्यमंत्र्यांकडून गेल्या असतील, असं मला वाटत नाही, असा खुलासा सतेज पाटील यांनी केला होता.