एकनाथ शिंदेंच्या हत्येचा कट? सुहास कांदेंच्या आरोपानंतर तत्कालीन गृह राज्यमंत्री म्हणाले…

आता हा आरोप तत्कालीन गृहराज्यमंत्री सतेज पाटील यांनी फेटाळून लावला आहे. माध्यमांशी बोलताना त्यांनी याबाबत खुलासा केला.

Satej Patil

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांच्या हत्येचा कट रचला गेला होता, अशी धक्कादायक माहिती आज सकाळपासून चर्चेत आहे. महाराष्ट्राचे तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या सांगण्यावरूनच एकनाथ शिंदे यांची झेड प्लस दर्जाची सुरक्षा नाकारण्यात आली होती, असा गंभीर आरोप आमदार सुहास कांदे (Rebel MLA Suhas Kande) यांनी केला होता. मात्र आता हा आरोप तत्कालीन गृहराज्यमंत्री सतेज पाटील (Satej Patil) यांनी फेटाळून लावला आहे. माध्यमांशी बोलताना त्यांनी याबाबत खुलासा केला.

हेही वाचा – तेव्हा शिंदेंना सुरक्षा पुरवू नका, असं ठाकरेंनी सांगितलं होतं; सुहास कांदेंचा मोठा गौप्यस्फोट

तत्कालीन गृहराज्यमंत्री सतेज पाटील म्हणाले की, शंभुराजे देसाई असो वा मी, एखाद्या व्यक्तीला संरक्षण देण्याबाबतचा निर्णय आम्ही घेत नाही. मुख्य सचिवांच्या अंतर्गत ही समिती असते. संबंधित व्यक्तीला धोका आहे का याचं विश्लेषण केलं जातं. धोका असल्यास एसआयटीकडून अहवाल मागवला जातो. त्यानंतरच संबंधित व्यक्तीला संरक्षण दिलं जातं. तसेच, यामध्ये मुख्यमंत्री अथवा गृहमंत्री कोणताही हस्तक्षेप करत नाहीत. मुख्य सचिवांच्या अंतर्गत ही समिती असल्याने धोक्याचं विश्लेषण झाल्यानंतर त्यांना योग्य वाटेल, अशा व्यक्तींनाच संरक्षण पुरवलं जातं.

हेही वाचा – सुहास कांदेंची नक्कीच भेट घेईन; बंडखोर आमदाराच्या आव्हानाला आदित्य ठाकरेंचे प्रत्युत्तर

पुढे ते म्हणाले की, मुख्य सचिवांअंतर्गत समिती काम करत असल्याने एकनाथ शिंदेंना संरक्षण पुरवू नका, अशी सूचना मुख्यमंत्र्यांकडून गेल्या असतील असं मला वाटत नाही. कारण त्यावेळी एकनाथ शिंदे हे उद्धव ठाकरे यांच्यासोबत होते. म्हणून, त्यांना सुरक्षा देऊ नका म्हणण्याचा प्रश्चन उद्भवत नाही. याउलट ते गडचिरोलीचे पालकमंत्री असल्याने त्यांना वाढीव सुरक्षा पुरवली जाते. पोलीस खातंदेखील त्यांची विशेष काळजी घेतं.