विधान परिषदेसाठी कोल्हापुरात रंगणार हाय व्होल्टेज लढत; सतेज पाटील-महाडिक आमनेसामने

Amal Mahadik and Satej Patil

राज्यातील विधान परिषदेच्या सहा जागांसाठी निवडणुकीची रणधुमाळी सुरु झाली असून कोल्हापुरात हाय व्होल्टेज लढत रंगणार आहे. महाविकास आघाडीकडून गृहराज्यमंत्री सतेज पाटील गुरुवारी उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. तर त्यांच्यासमोर भाजपकडून महादेवराव महाडिक यांचे पुत्र अमल महाडिक रिंगणात उतरणार आहेत. यामुळे कोल्हापुरात हाय व्होल्टेज लढत रंगणार आहे.

विधान परिषदेसाठी महाविकास आघाडीच्या नेत्यांच्या उपस्थितीत गृहराज्यमंत्री आणि कोल्हापूरचे पालकमंत्री सतेज पाटील आज कोल्हापूर स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातून उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. यावेळी ग्राम विकास मंत्री हसन मुश्रीफ उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत, खासदार संजय मंडलिक उपस्थित असणार आहेत. उमेदवारी अअर्ज दाखल केल्यानंतर जिल्हा परिषदेतील महाविकास आघाडीच्या सदस्यांचा मेळावा होणार आहे.

तथापि, २०१४ च्या निवडणुकीच्या इतिहासाची पुनरावृत्ती करण्याचा निर्धार महाडिक समर्थकांनी केला आहे. तर ‘आमचं ठरलंय विधान परिषद उरलंय’ या ट्रेंडच्या माध्यमातून मंत्री पाटील यांचे कार्यकर्ते विजयाचा दावा करत आहेत

कोल्हापुरात कोणाची ताकद जास्त?

कोल्हापूर स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघात ४२१ मतदार आहेत. यापैकी पाच जणांचा मृत्यू झाल्याने ४१६ मतदार मतदानासाठी पात्र आहेत. ४१६ मतदारांपैकी भाजपकडे सध्या कोरे आणि आवाडे गटाला एकत्र केल्यास १६० मतं आहेत. तर महाविकास आघाडीकडे जवळपास २५० मतं आहेत. त्यामुळे भाजपला विजयासाठी ५० ते ६० मतांची गोळाबेरीज करावी लागणार आहे. एकंदरीत कोल्हापूर स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातील मतदारांची ताकद पाहता महाविकास आघाडीचं पारडं जड आहे.