‘ती’ गाडी बाळासाहेब थोरातांची नव्हती, तर..; सत्यजित तांबेंनी केला खुलासा

satyajeet tambe

नाशिक पदवीधर मतदारसंघात अपक्ष उमेदवार सत्यजित तांबे यांचा मोठ्या संख्येने विजय झाला आहे. तांबेंच्या समर्थकांनी आणि कार्यकर्त्यांनी एकच जल्लोष केला. परंतु सत्यजित तांबे ज्या गाडीतून बसून आले ती गाडी काँग्रेसचे वरिष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांची असल्याचं सांगितलं जात होतं. त्यामुळे या निवडणुकीवरुन झालेल्या राजकीय उलथापालथीनंतर थोरात प्रत्यक्ष या निवडणूकीत दिसले नाहीत. परंतु ही गाडी त्यांची असल्याचं सांगितल्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आलं. दरम्यान, ती गाडी बाळासाहेब थोरात यांची नव्हती, असा खुलासा सत्यजित तांबे यांनी केला.

सत्यजित तांबे यांनी नाशिकमध्ये पत्रकार परिषद घेत प्रसार माध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी ते म्हणाले की,
ती गाडी बाळासाहेब थोरात यांची नसून ती माझ्या वडिलांची गाडी आहे. माझे वडील दहा वर्ष ती गाडी वापरत आहेत. त्याच गाडीतून मी मतमोजणीच्या केंद्रावर गेलो. कृपया करून याची शहानिशा करवी, अशी विनंती सत्यजित ताबेंनी केली.

दरम्यान, MH 17 BX 567 या क्रमांकाच्या गाडीवर उभे राहून सत्यजित तांबे यांनी कार्यकर्त्यांसोबत जल्लोष केला होता. त्यांनी याच गाडीचा वापर निवडणुकीच्या प्रचारातही केला होता आणि घवघवीत विजयही मिळवला.

ही निवडणूक मला कॉंग्रेस पक्षातूनच लढवायची होती

ही निवडणूक मला कॉंग्रेस पक्षातूनच लढवायची होती. मी राष्ट्रीय कॉंग्रेसमधूनच उमेदवारी अर्ज भरला आहे. मात्र ए बी फार्म कॉंग्रेस पक्षाचा भरला नसल्याने गोंधळ झाला. मला पाठिंबा द्यावा यासाठी मी संजय राऊत यांच्याशी बोललो. अजित पवार यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. शरद पवार, सुप्रिया सुळे यांच्याशी संपर्क केला. आदित्य ठाकरे यांच्याशी बोललो. कॉंग्रेसमधील नेत्यांशी बोललो. मला महाविकास आघाडीचा उमेदवार म्हणूनच निवडणूक लढवायची होती. तरीही महाविकास आघाडीने दुसरा उमेदवार जाहिर केला.

तरीही निवडणुकीत मला सर्वच पक्षाच्या कार्यकर्त्यांनी मदत केली. ठाकरे गट, कॉंग्रेस, राष्ट्रवादी कॉंग्रेस, मनसे, आरपीआय गट अशा सर्वांनीच मला मदत केली. भाजपने तर स्थानिक पातळीवर निर्णय घेण्यास सांगितले. त्यानुसार मला स्थानिक पातळीवर भाजपने मदत केली. आमची निष्ठी व आमचे काम बघूनच सर्व पक्षांनी मला मदत केली. त्यामुळे मी सर्वांचे आभार मानतो. ही माझी शेवटची पत्रकार परिषद असणार आहे. मी याविषयावर पुन्हा कधीही बोलणार नाही. कारण मला काम करायचे आहे. मी काम करणारा कार्यकर्ता आहे, असे डॉ. सत्यजित तांबे यांनी सांगितले.


हेही वाचा : थोरात आणि वडिलांशी चर्चा करूनच निवडणुकीचा अंतिम निर्णय; सत्यजित तांबेंकडून पटोलेंचा