काँग्रेसची वाताहत, खर्गेंना पत्र लिहित प्रदेशाध्यक्षांविरुद्ध बंडाचा झेंडा

Ashish Deshmukh Letter | सत्यजित तांबे यांच्या बंडखोरीने कॉग्रेसची नामुष्की झाली. यात प्रदेशाध्यक्ष म्हणून श्री. नाना पटोले हेच जबाबदार आहेत. पटोलेंच्या कार्यकाळात पक्षाला सातत्याने नाचक्कीचा सामना करावा लागत आहे. ते प्रदेशाध्यक्ष झाल्यापासून कॉग्रेसची दाणादाण उडत आहे.

nana patole and ashish deshmukh

मुंबई – गेल्या काही वर्षांपासून काँग्रेसची वाताहत झाली आहे. सुधीर तांबेंच्या निमित्ताने काँग्रेसमधील वादही चव्हाट्यावर आला. काँग्रेसमधील अनेक नेते भाजपाच्या वाटेवर असल्याचंही बोललं जात आहे. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्यामुळे राज्यात काँग्रेसची पिछाहाट झाली असल्याचा थेट आरोप काँग्रेसचे माजी आमदार डॉ.आशीष देशमुख यांनी केला आहे. यासंदर्भात त्यांनी काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांना पत्रच लिहिले आहे. काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष बदलण्याची मागणी त्यांनी पत्राद्वारे केली आहे.

आशीष देशमुख यांचं पत्र जसेच्या तसे

आपल्या नेतृत्वात कॉंग्रेस प्रगतीच्या अपेक्षेत आहे. एकेकाळी कॉग्रेस देशाचा एक प्रमुख पक्ष होता. खरे म्हणजे, कॉग्रेस हा नुसता राजकीय पक्ष नसून एक विचार आहे, एक चळवळ आहे. कॉंग्रेससारखी परंपरा इतर कोणत्याही पक्षात दिसत नाही. एक मोठा राजकीय पक्ष आज आपले अस्तित्व टिकवण्यासाठी धडपडतोय, अशी परिस्थिती मागील काही वर्षापासून उत्पन्न झाली आहे. आपला कॉग्रेस पक्ष इतर राज्यांप्रमाणे महाराष्ट्रातसुद्धा मागे पडला आहे. आपला पक्ष महाराष्ट्रात सकारात्मक कार्य करतांना दिसत नाही, ही वस्तूस्थिती आहे.

शेतकरी, कामगार, आदिवासी युवा वर्ग, महिला, शोषित, पिडीत, वंचित, मागासवर्गीय यांचे प्रश्न व्यवस्थित हाताळण्यासाठी तसेच संघटनात्मक कार्य करून ओबीसी, महिलांवरील अत्याचार आणि जनहितार्थ मुद्द्यांवर मार्ग काढण्यासाठी फेब्रुवारी २०२१ मध्ये श्री. नाना पटोले यांना मोठ्या विश्वासाने कॉंग्रेस श्रेष्ठींनी महाराष्ट्र प्रदेश कॉग्रेसच्या अध्यक्षपदाची धुरा सोपवली. पण तो विश्वास त्यांनी सपशेल फोल ठरवला. विदर्भ हा कॉंग्रेसचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो. प्रदेशाध्यक्षांच्या कार्यशिलीमुळे हा बालेकिल्ला आता कॉंग्रेसच्या हातातून निसटला आहे, हे सर्वश्रुत आहे.

सत्यजित तांबे यांच्या बंडखोरीने कॉग्रेसची नामुष्की झाली. यात प्रदेशाध्यक्ष म्हणून श्री. नाना पटोले हेच जबाबदार आहेत. पटोलेंच्या कार्यकाळात पक्षाला सातत्याने नाचक्कीचा सामना करावा लागत आहे. ते प्रदेशाध्यक्ष झाल्यापासून कॉग्रेसची दाणादाण उडत आहे. फेब्रुवारी २०२१ मध्ये अध्यक्षपदाची जबाबदारी स्वीकारल्यानंतर कॉग्रेस पुढच्या काळात महाराष्ट्रात एक नंबरचा पक्ष ठरेल यासाठी आम्ही कामकाज करू, असे त्यांनी ठासून सांगितले होते. ते प्रदेशाध्यक्ष झाल्यापासून कॉग्रेसची वाताहत सुरु झाली आहे. डिसेंबर २०२१ मध्ये विधान परिषदेसाठी नागपूरच्या जागेवरून कॉग्रेस उमेदवार रवींद्र भोयर होते. पण मतदानाच्या काही तास आधी नाट्यमय घडामोडी झाल्या, अचानक अपक्ष उमेदवार मंगेश देशमुख यांना उमेदवारी दिली. त्यामुळे भाजपच्या बावनकुळे यांचा जबरदस्त विजय झाला. जून २०२२ मध्ये विधान परिषद निवडणूकीत चंद्रकांत हांडोरे हे नंबर एक चे उमेदवार होते. पण भाई जगताप यांना जास्त मते मिळाली. त्यामुळे चंद्रकांत हांडोरे यांचा पराभव झाला. हांडोरे यांना निवडून आणण्याचे हायकमांडचे आदेश होते. तरीही या आदेशाच्या विरोधात निकाल लागला. ४ जुलै २०२२ ला शिंदे फडणवीस सरकारची बहुमत ‘चाचणी परीक्षा होती. यावेळी विरोधकांची एकजूट महत्वाची होती. पण कॉंग्रेसचे तब्बल १० आमदार या बहुमत चाचणीत गैरहजर राहिले. यामुळे सरकारचे बहुमत मोठ्या प्रमाणात वाढले. पक्षादेश असतांनासुद्धा अनेकांनी पक्ष विरोधी काम केलं. या तीनही प्रकरणांची चौकशी करण्याचे आश्वासन प्रदेशाध्यक्ष श्री. नाना पटोले यांनी दिले होते, त्यासाठी हायकमांडकडे अहवाल पाठवणार असल्याचे दावे त्यांनी केले. पण आजपर्यंत कोणावरही कारवाई झाली नाही किंवा कोणालाही जबाबदार ठरविण्यात आले नाही.

सर्व बाजूंनी कॉग्रेस सपशेल तोंडघाशी पडली आहे. सत्ता गेल्यानंतरसुद्धा महाविकास आघाडी एकसंघ आहे, हे चित्र खोटे ठरले आहे. जर भाजपने पाठींबा दिलेले सत्यजित तांबेसारखे अपक्ष उमेदवार पाचही जागेवर निवडून आले तर विधान परिषदेच्या सभापती पदाचा तिढा तयार होईल. महाराष्ट्रात बेबंदशाही आहे, असे म्हणायलाही आता काही अर्थ उरलेला नाही. राज्यात पक्ष पहिल्या क्रमांकावरून चौथ्या क्रमांकावर घसरला आहे. शिंदे गटामुळे पक्ष पाचव्या क्रमांकावरही जाईल. पक्षात शिस्त नाही. मुळात पक्षाच्या विचारधारेवरही नेत्यांच्या मनात आदर नाही. एकीकडे राहुल गांधी भारत जोडायला निघाले आहेत, पण स्थानिक कॉग्रेस नेत्यांना मात्र पक्षापेक्षा स्वतःच्या सत्तेची पडलेली आहे. अशा कॉग्रेस विरोधी घटना घडत असतांना प्रदेश कॉग्रेस अध्यक्षांमध्ये कारवाई करण्याची धमक उरलेली नाही. तसे केल्यास पक्षात कोण उरेल, अशी भीती त्यांच्या मनात आहे.

ज्या कॉग्रेसची पाळेमुळे शहरांपासून तर ग्रामीण भागांपर्यंत रोवली गेली होती त्या पक्षाकडे कार्यकर्तेच उरले नाहीत. म्हणजेच पक्षाचा कणा उरलेला नाही. पक्षांतर्गत गटबाजी हा मोठा प्रश्न राज्यातील कॉग्रेससमोर उभा ठाकला आहे. संघटनेची घडी विस्कळीत झालेली आहे. आज संघटनेमध्ये चैतन्य निर्माण करण्याची गरज आहे. चैतन्य निर्मितीसाठी श्री. राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेला सर्वत्र प्रचंड प्रतिसाद मिळाला. तरुण वर्गाची गर्दी बघता एका नव्या वर्गाला कॉग्रेस जवळची वाटत आहे. कॉग्रेसपासून दुरावलेली माणसे जोडण्याचे काम श्री. राहुल गांधी करीत आहेत. परंतु, हा प्रतिसाद मतांमध्ये परिवर्तीत करण्यासाठी ठोस रणनीती प्रदेशाध्यक्षना कितपत जमेल, ही शंका आहे.

महाराष्ट्रात कॉग्रेस पक्ष आजच्या घडीला सक्षम नेतृत्व नसणारा पक्ष म्हणून दिसत आहे. विविध निवडणुकीमध्ये सतत होणारे पराभव असण्याचे कारण म्हणजे पक्षाची असलेली दयनीय अवस्था आहे. या पक्षात नेते उरले आहेत परंतु कार्यकर्ते नाहीत. राज्यात या पक्षाचा चेहरा गेल्या अनेक वर्षापासून बदलला नाही. गेली अनेक वर्षे त्याच त्या नेत्यांची नावे समोर येत आहेत. तळागाळातील कार्यकर्ते यामुळेच पुढे जाऊ शकले नाहीत, ही वस्तूस्थिती आहे. नवे चेहरे क्वचितच दिसत आहेत. परिणामी राजकीय करिअरसाठी कॉग्रेस विचारसरणीचे लोक इतर पक्षांमध्ये जात आहेत. त्यामुळे शिवसेना, भाजपा, राष्ट्रवादी कॉग्रेस असे अनेक पक्ष राज्यात प्रभावशाली होत आहेत. श्री. राहुल गांधी यांची यात्रा आणि इतर माध्यमांतून तसेच कॉंग्रेसाध्यक्ष म्हणून आपल्या मदतीने कॉग्रेस पक्षाची पुनर्बाधणी होत असेल तर ती चांगली गोष्ट आहे. परंतु, महाराष्ट्राचे काय, हा प्रश्न तसाच कायम राहतो.

महाराष्ट्रातील कॉग्रेसचे भविष्य हे महाराष्ट्रातील लोकांच्या हातात आहे. कॉग्रेसला निर्णायक भूमिका घ्यावी लागणार आहे. त्यासाठी मजबूत नेते आणि कार्यकर्त्यांचं नेटवर्क तयार करावे लागणार आहे. नेते व कार्यकर्ते पुन्हा नक्कीच जुळतील पण त्यासाठी राष्ट्रीय स्तरावरील शिर्षत्व नेतृत्व आणि कार्यकर्त्यामधील दुवा म्हणजेच महाराष्ट्र प्रदेशातील नेतृत्व हे सक्षम असणे गरजेचे आहे. म्हणूनच महाराष्ट्रात कॉग्रेसची स्थिति सुधारण्यासाठी महाराष्ट्र प्रदेश कॉंग्रेस कमिटीचा अध्यक्ष तात्काल बदलण्याची नितांत गरज आहे. प्रदेशाध्यक्ष असा असावा, जो महाराष्ट्राच्या गावा-गावांत फिरून जनतेचे प्रश्न उचलून त्यांस वाचा फोडेल आणि कॉग्रेसची स्थिति मजबूत करेल. कॉग्रेसच्या उज्ज्वल भवितव्यासाठी या पत्राची गंभीर दाखल घ्यावी, अशी नम्र विनंती मी आपणांस करीत आहे.

राज्यात नुकतेच शिवसेनेत झालेले बंड गाजले. याबाबत अद्यापही सर्वोच्च न्यायालयात आणि निवडणूक आयोगाकडे प्रकरण प्रलंबित आहे. त्यातच, काँग्रेसमध्येही आता फुटीचे वातावरण निर्माण झाले आहे. महाराष्ट्र काँग्रेसमधील वाद आता दिल्लीदरबारी गेल्याने नाना पटोलेंवर खरंच कारवाई होते का हे पाहावं लागेल.