सौदी अरेबिया सरकारचा भारतीयांसाठी मोठा निर्णय; व्हिसासाठी आता ‘या’ गोष्टीची गरज नाही

saudi arabia announced indians no need to police clearance certificate for visa

सौदी अरेबिया सरकारने भारतीयांसाठी एक मोठा निर्णय घेतला आहे. भारतीयांना आता सौदी अरेबियात जाण्यासाठी व्हिसा अप्लाय करताना पोलीस क्लिअरन्स सर्टिफिकेटची गरज लागणार नाही. नवी दिल्लीतील सौदी अरेबिया दूतावासाने याबाबत एक अधिकृत निवेदन जाहीर केले आहे. या निवेदनानुसार, कोणत्याही व्यक्तीला सौदी अरेबियाला जाण्यासाठी व्हिसा मिळवताना पोलीस क्लिअरन्स सर्टिफिकेट सादर करणे बंधनकारक नसेल. सौदी अरेबियाच्या दूतावासाने याबाबत एक ट्विट करत देखील माहिती दिली आहे.

या ट्विटमधील निवेदनात म्हटले की, सौदी अरेबिया आणि भारत यांच्यातील मजबूत संबंध आणि धोरणात्मक भागीदारी लक्षात घेत सरकारने भारतीय नागरिकांना पोलीस क्लिअरन्स सर्टिफिकेट जमा करण्यापासून सूट देण्याचा निर्णय घेतला आहे. त्याचवेळी निवेदनात सौदी अरेबियामध्ये शांततेत राहणाऱ्या 20 लाखांहून अधिक भारतीय नागरिकांच्या योगदानाचेही दूतावासाने कौतुक केले आहे.

सौदीच्या निर्णयाचे भारताकडून स्वागत

सौदी अरेबियातील भारतीय दूतावासाने या निर्णयाबद्दल सौदी सरकारचे आभार मानले आहेत. सौदी अरेबिया सरकारच्या या निर्णयामुळे राज्यात राहणार्‍या 20 लाखांहून अधिक भारतीय लोकांना दिलासा मिळणार असल्याचे भारताकडून सांगण्यात आले.

कोणत्याही देशाचा व्हिसा मिळणे सोपे काम नाही. त्यासाठी अनेक प्रकारची कागदपत्रे सादर करावी लागतात. त्यानंतर तपास केला जातो आणि सर्व कायदेशीर प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर व्हिसा दिला जातो. अशा परिस्थितीत पोलीस क्लिअरन्स सर्टिफिकेट हाही याच प्रक्रियेचा एक भाग आहे. त्यामुळे लोकांचा वेळही वाया जातो. मात्र कडक नियमांमुळे ते जमा करणे बंधनकारक होते. मात्र आता सौदी सरकारच्या या निर्णयामुळे लोकांना मोठा दिलासा मिळणार आहे.

भारत आणि सौदी अरेबिया यांच्यातील संबंध गेल्या काही वर्षात अधिक घट्ट होत आहेत, विशेषत: मोहम्मद बिन सलमान सौदी अरेबियाचे क्राउन प्रिन्स झाल्यानंतर सौदी अरेबियाचा कल भारताकडे वाढताना दिसत आहे. विशेष म्हणजे दोन्ही देशांमधील भागीदारी केवळ ऊर्जा क्षेत्रातच नाही तर आरोग्य आणि संरक्षण यांसारख्या क्षेत्रातही वाढतेय. कोरोनाच्या काळातही भारत आणि सौदी अरेबियाचे नेतृत्व एकमेकांच्या संपर्कात होते. सप्टेंबर महिन्यात भारताचे परराष्ट्र मंत्री एस.जयशंकर हे देखील सौदी अरेबियाच्या दौऱ्यावर पोहोचले होते, जिथे दोन्ही देशांमधील संबंध अधिक दृढ करण्यावर चर्चा झाली होती.


युजर्सचा पर्सनल डेटा वापरणाऱ्या कंपन्यांना ठोठावला जाणार आता 500 कोटींपर्यंतचा दंड