Monday, May 10, 2021
27 C
Mumbai
घर ताज्या घडामोडी वीर सावरकरांनी 'हे' शब्द मराठीला दिले

वीर सावरकरांनी ‘हे’ शब्द मराठीला दिले

आताच्या आधुनिक काळात जगताना आपण अनेकदा असे शब्द वापरत असतो त्याचे मराठी अर्थ अनेकदा आपल्याला ठाऊक नसतात. स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी देखील मराठी भाषा संमृद्धीसाठी आपले मोलाचे योगदान दिले आहे.

Related Story

- Advertisement -

मराठी भाषा दिनानिमित्त महाराष्ट्रभर वेगवेगळ्या पद्धतीने मराठी भाषेचा गौरव केला जात आहे. ज्ञानपीठ पुरस्कारप्राप्त प्रसिद्ध मराठी कवी विष्णू वामन शिरवाडकर यांचा जन्मदिवस हा ‘मराठी भाषा गौरव दिन’ म्हणून साजरा केला जातो. मराठी भाषा समृद्ध करण्यासाठी आजपर्यंत अनेकांनी आपले योगदान दिले आहे. आताच्या आधुनिक काळात जगताना आपण बोलीभाषेत अनेकदा असे शब्द वापरत असतो त्याचे मराठी अर्थ आपल्याला ठाऊक नसतात. स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी देखील मराठी भाषा संमृद्धीसाठी आपले मोलाचे योगदान दिले आहे.

सावरकरांनी मराठी भाषेला दिलेले शब्द

आपण बोलीभाषेत असे अनेक शब्द वापरतो मात्र त्याचा शोध कोणी लावला किंवा ते कसे वापरात आले हे आपल्याला ठाऊक नसते. मराठी भाषेत दिनांक, क्रमांक, बोलपट, वेशभूषा, दिग्दर्शक, चित्रपट, मध्यंतर, उपस्थित, प्रतिवृत्त, नगरपालिका, महापालिका, महापौर, पर्यवेक्षक, विश्वस्त, गणसंख्या, स्तंभ असे अनेक शब्द सावरकरांनी मराठी भाषेला प्रदान केले आहेत. मराठी भाषेची गोडी आणि सौंदर्य वाढवणारे असे अनेक शब्द सावरकरांनी सांगितले आहेत, ते आपण बोलीभाषेत सर्रास वापरत असतो. हवा, जमीन, वकील, गरीब, सराफ, मसाला, हलवा, गुलकंद, बर्फी, अत्तर, तवा, हे शब्द मराठी नाहीत, ते अरबी आणि फारशी भाषेतून आले आहेत. कवी, निबंधकार, जीवनदर्शन घडविणारा नाटककार, राजकीय व सामाजिक पार्श्वभूमीवर आधारित कादंब-यांचा लेखक म्हणून स्वातंत्र्यवीर सावरकरांनी मराठी भाषा समृद्ध केली आहे. एक कवी म्हणून त्यांनी अनेक काव्य रचली स्वदेशी फटका हे त्यांच पहिले काव्य त्यांनी वयाच्या अकराव्या वर्षी लिहीले.

अंदमानच्या भिंतीवर काट्याकुट्यांनी रचले महाकाव्य

- Advertisement -

सावरकरांनी काळ्यापाण्याची शिक्षा भोगत असताना त्यांनी आपले मराठी भाषेतील योगदान अजरामर केले. अंदमानच्या काळ्या कोठडीत काळ्यापाण्याची शिक्षा भोगताना कोठडीच्या भिंतींवर काटय़ाकुटय़ांनी महाकाव्य लिहिणारा हा जगातील एकमेव महाकवी म्हणावा लागेल. सावरकरांच्या लिखाणातील शब्दलालित्य, भावोत्कटता, विलक्षण मार्दव ही त्यांच्या काव्याची वैशिष्ट्य आहेत. एक साहित्यिक म्हणून योगदान देताना सावरकरांनी १० हजारांपेक्षा जास्त पाने मराठी भाषेत तर १५०० हून जास्त पाने इंग्रजी भाषेत लिहिली आहेत. त्यांच्या सागरा प्राण तळमळला, हे हिंदू नृसिंहा प्रभो शिवाजी राजा, जयोस्तुते जयोस्तुते, तानाजीचा पोवाडा ह्या कविता प्रचंड लोकप्रिय आहेत. याशिवाय काळेपाणी, मोपल्यांचे बंड, माझी जन्मठेप, शत्रूच्या शिबिरात, अथांग ही त्यांची साहित्य संपदा अजरामर आहेत.

सामनातून सावरकरांचा ‘भाषाप्रभू’ असा उल्लेख

मराठी भाषा दिनानिमित्त सावरकरांच्या योगदानाची दखल माध्यमांकडून घेतल्याचे दिसत आहे. शिवसेनेचे मुखपत्र असलेला सामना वर्तमान पत्रात सावरकरांचा ‘भाषाप्रभू’ असा उल्लेख केला आहे. यावेळी सामनाचे संपादक संजय राऊत यांनी ‘सावरकरांची आत्मकथा ‘माझी जन्मठेप’ हा ग्रंथ महाराष्ट्रातील घराघरांत कधीच पोहचा आहे’, असे म्हटले आहे. यासोबतच वीर सावरकर हा फक्त चर्चेचा विषय नाही, तर कृतीचा आणि जगण्याचा विषय आहे. वीर सावरकर हे त्याग, तत्व, तेज आणि संघर्षाच्या बाबतीत सगळ्यांनाच पुरून उरेल आणि हयातभर त्यांचे स्थान अढळ राहिल’, अशा शब्दात त्यांनी मराठी दिनानिमित्त ‘वीर सावरकरांचे स्मरण करूया’ असे म्हटले आहे.

- Advertisement -