घरमहाराष्ट्रकाँग्रेसकडून ‘भारत बचाओ -संविधान बचाओ’ रॅली

काँग्रेसकडून ‘भारत बचाओ -संविधान बचाओ’ रॅली

Subscribe

नागरिकत्व कायद्याच्या विरोधात आंदोलन

देशभरात सध्या नागरिकत्व दुरस्ती कायद्यावरुन वादळ उठलेले असतानाच महाराष्ट्र काँग्रेसने याविरोधात आता वेगळ्या पध्दतीने आंदोलन पुकारले आहे. येत्या २८ डिसेंबरला काँग्रेस स्थापना दिनाच्या निमित्ताने महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसने मुंबईत भारत बचाओ -संविधान बचाओ या फ्लॅग मार्चचे आयोजन केले आहे. तर मुंबई काँग्रेसकडून शांती मोर्चाचे आयोजन करत याविषयी आक्रमक पवित्रा धारण केला आहे. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी या फ्लॅग मार्चची घोषणा गुरुवारी मुंबईत पत्रकार परिषदेत केली.

या फ्लॅग मार्चची घोषणा करण्यासाठी गुरुवारी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसतर्फे पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. या पत्रकार परिषदेत बाळासाहेब थोरात यांनी वरील घोषणा केली असून मुंबईच्या ऑगस्ट क्रांती मैदान ते गिरगाव चौपाटीवरील लोकमान्य टिळक पुतळ्यापर्यंत फ्लॅग मार्च काढण्यात येणार आहे. लोकशाहीवादी धर्मनिरपेक्ष संघटना व कार्यकर्त्यांनी तसेच नागरिकांनी मोठ्या संख्येने या फ्लॅग मार्चमध्ये सहभागी व्हावे, असे आवाहन महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष व राज्याचे महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी यावेळी केले.

- Advertisement -

यावेळी बाळासाहेब थोरात म्हणाले की, २८ डिसेंबर १८८५ रोजी मुंबई येथे काँग्रेसची स्थापना झाली होती. काँग्रेसच्या पहिल्या अधिवेशनात धर्मभेद, वंशभेद, प्रांतभेद इ. भेदांवर मात करणारी अखिल भारतीय एक राष्ट्रीयता निर्माण करणे हे सूत्र ठरवण्यात आले. याच सूत्रावर काम करत काँग्रेसने स्वातंत्र्य चळवळ उभी केली, लोकमान्य टिळक, राष्ट्रपिता महात्मा गांधीजींच्या नेतृत्वाखाली अहिंसक मार्गाने देशाला स्वातंत्र्य मिळवून दिले. त्यानंतर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली देशाचे संविधान तयार झाले. या संविधानानुसार आपला देश चालतो आहे.

पण आज केंद्रातील भाजप सरकारच्या लोकशाहीविरोधी आणि संविधानविरोधी कार्यपद्धतीने देशात धार्मिक आणि सामाजिक फूट पाडण्याचा प्रयत्न करत आहे. देशाची लोकशाही, संविधान, व्यक्तीस्वातंत्र्य, राष्ट्रीय एकात्मता, बंधुभाव यावर केंद्र सरकारने आघात केला आहे. स्वातंत्र्यपूर्व काळात इंग्रजांनी या देशात फोडा आणि राज्य करा हे धोरण राबवले होते तीच परिस्थिती भाजपचे केंद्र सरकार पुन्हा निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहे. त्यामुळे पुन्हा एकदा भाजप सरकार विरोधात स्वातंत्र्यलढ्याप्रमाणे लढा उभारावा लागणार आहे. केंद्र सरकार सर्वसामान्यांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न करत आहे. याचा निषेध करण्यासाठी व तरूण, विद्यार्थी व जनतेचा आवाज बुलंद करण्यासाठी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या वतीने काँग्रेस स्थापना दिनी हा फ्लॅग मार्च काढणार असल्याचे त्यानी यावेळी जाहीर केले.

- Advertisement -

मुंबई काँग्रेसच्या सर्व नेत्यांची व पदाधिकार्‍यांची मुंबई काँग्रेस कार्यालयात बैठक झाली. त्यावेळीस हा निर्णय घेण्यात आल्याचे मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष एकनाथ गायकवाड म्हणाले की, शनिवार दि. २८ डिसेंबर २०१९ रोजी काँग्रेसचा स्थापना दिवस आहे. दरवर्षी प्रमाणे या वर्षी सुद्धा हा कार्यक्रम मुंबईतील तेजपाल हॉल येथे आयोजित करण्यात आलेला आहे. पण यावर्षी ऑल इंडिया काँग्रेस कमिटीच्या निर्देशानुसार तेजपाल हॉल ते गिरगाव चौपाटी, मुंबई येथील लोकमान्य टिळक यांच्या पुतळ्या पर्यंत शांती मार्च काढण्यात येणार आहे. त्या अगोदर सकाळी १० वाजता तेजपाल हॉल येथे ध्वजवंदनाचा कार्यक्रम होईल व प्रतिज्ञा घेण्यात येईल आणि त्यानंतर हा शांती मार्च काढण्यात येईल. संपूर्ण मुंबईमध्ये व देशामध्ये शांतीचा संदेश पोहचविणे हेच हा शांती मार्च काढण्यामागचे उद्दिष्ट असल्याचे एकनाथ गायकवाड यांनी सांगितले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -