सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ निवडणुकीचा लवकरच बिगूल

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या सिनेट सदस्यांचा कार्यकाळ ऑगस्ट 2022 मध्ये पूर्ण होणार

नाशिक : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या सिनेट सदस्यांचा कार्यकाळ ऑगस्ट 2022 मध्ये पूर्ण होत असताना आता सीनेटच्या निवडणुका या ओबीसी आरक्षणासह घ्यायच्या की आरक्षणाशिवाय याविषयी विद्यापीठामध्ये संभ्रमाचे वातावरण आहे. परंतु, आरक्षणाविषयी त्वरीत निर्णय घेवून येत्या जून किंवा जुलै महिन्यात या निवडणुका घ्याव्याच लागणार असल्याने लवकरच विद्यापीठाचे पडघम वाजणार आहेत.

पुणे, अहमदनगर आणि नाशिक अशा तीन जिल्ह्यांचे कार्यक्षेत्र असलेल्या पुणे विद्यापीठात पदवीधर, व्यवस्थापन प्रतिनिधी यांसह प्राध्यापक, प्राचार्य गटातील प्रतिनिधींची निवड करण्यासाठी निवडणूक घेतली जाते. नोव्हेंबर 2017 मध्ये झालेल्या या निवडणुकीत प्रगती पॅनल व एकता पॅनलमध्ये लढत रंगली होती. राज्यातील सर्वपक्षिय नेत्यांच्या नातेवाईकांनी बाजी मारल्यामुळे राज्याचे लक्ष या निवडणुकीकडे होते. यात प्रामुख्याने उपमुख्यमंत्री अजित पवार यांची पत्नी सुनेत्रा पवार, माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे चुलत बंधू प्रसेनजित फडणवीस, माजी विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांचे चुलत बंधू अनिल विखे पाटील या निवडणुकीत विजयी झाले होते.

पदवीधर गटासाठी 10 जागा तर व्यवस्थापन प्रतिनिधींना पाच जागांसाठी ही निवडणूक घेतली जाते. याव्यतिरीक्त प्राध्यापक प्रतिनिधी, प्राचार्य प्रतिनिधी आणि राज्यपाल नियुक्त 10 जागांवर सिनेट सदस्यांची निवड केली जाते. विद्यापीठाच्यादृष्टीने महत्व असलेल्या सिनेट सदस्यांची निवडणूक ही विद्यापीठाच्या कार्यक्षेत्रातील तिनही जिल्हांमध्ये साधारणत: एक लाख मतदार आहेत. मतदार नोंदणीस लवकरच सुरुवात होणार असल्याने निवडणुकीचे पडघम वाजतील. विशेष म्हणजे यंदा युवा सेनेने स्वतंत्ररित्या पॅनल निर्मितीची तयारी सुरु केल्याने निवडणुकीची प्रक्रिया लवकरच घोषित होण्याची शक्यता आहे.

2017 च्या निवडणुकीतील विजयी उमेदवार

-पदवीधर गट : अनिल विखेपाटील, संतोष ढोरे, तानाजी वाघ, अभिषेक बोके, प्रसेनजित फडणवीस (खुला प्रवर्ग) दादासाहेब शिनलकर (ओबीसी), बागेश्री मंठाळकर (महिला राखीव), विश्वनाथ पाडवी (एसटी), शशिकांत तिकोटे (एससी), विजय सोनवणे (एनटी)

-व्यवस्थापन प्रतिनिधी : सुनेत्रा पवार (बिनविरोध), सोमनाथ पाटील, श्यामकांत देशमुख, संदीप कदम, राजेंद्र विखे-पाटील

-प्राचार्य गट : केटीएचएम महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.व्ही. बी. गायकवाड व

-प्राध्यापक प्रतिनिधी : नंदू पवार (नाशिक)