घरमहाराष्ट्रनाशिकलाडक्या बाप्पाला द्या घरीच निरोप

लाडक्या बाप्पाला द्या घरीच निरोप

Subscribe

‘संवर्धन’ संस्थेचे पर्यावरणपूरक विसर्जनाचे आवाहन; हेल्पलाईन आणि स्वयंसेवकाच्या माध्यमातून जनजागृती

नाशिक : दरवर्षी नाशिकमध्ये असणारी विसर्जनाची धूम यावर्षी मात्र कोरोना संकटामुळे बघायला मिळणार नाहीये. ताशांची तर्री आणि ढोलचा गजर निनादत असतानाच लाडका बाप्पा आणि गोदावरीच्या संरक्षणासाठी झटणारे स्वयंसेवक यंदा मात्र मोजक्याच ठिकाणी आणि कमी संख्येने दिसतील. याला कारणही तसंच आहे.. कोविडच्या पार्श्वभूमीवर संसर्गाचा धोका टाळण्यासाठी यंदा प्रबोधनावर भर देण्यात आला असून त्यासाठी ‘संवर्धन’ या संस्थेने प्रत्येक स्वयंसेवकाला केवळ जनजागृती आणि पर्यावरणपूरक विसर्जनावर भर देण्याचे आवाहन केले आहे.
कोरोना संकटकाळात धोका ओळखून संवर्धन संस्थेने विशेष पुढाकार घेत हेल्पलाईनच्या जनजागृती सुरू केली आहे. घरच्याघरी गणेश विसर्जन करण्यासाठी विक्रमी पुढाकार घ्यावा यासाठी संस्था प्रयत्नशील आहे. प्रत्यक्ष विसर्जन स्थळावर उभे राहिल्यास गर्दी आणि महामारीचा धोका असल्याने यावर्षी संवर्धनाच्या स्वयंसेवकांनी आपल्या परिसरातील लोकांचे घरगुती विसर्जनासाठी प्रबोधन करण्यास सुरुवात केली आहे. परिणामी, आपल्या परिसरातील मूर्ती संकलनासाठी हे कार्यकर्ते सक्रिय आहेत. यंदा मूर्ती संकलनाचे हे ११ वे वर्ष असून फक्त सोशल मीडिया, फोन आणि संवादाच्या माध्यमातून प्रबोधन केले जात आहे. ज्या ठिकाणी मूर्तीदान स्वीकारले जाणार आहेत, अशा नाशिक जिल्ह्यातील नेमून दिलेल्या काही ठराविक विसर्जन स्थळांची माहिती या स्वयंसेवकांकडून दिली जात आहे.

अमोनियम कार्बाईड (सोडा) वापरून करा घरीच बाप्पांचे विसर्जन

या व्यतिरिक्त जिथे मूर्ती संकलन शक्य नाही, अशा ठिकाणच्या रहिवाशांनी घरगुती विसर्जन करावे, असे सांगितले जाईल. त्यासाठी अमोनियम कार्बाईड म्हणजेच सोडा वापरून विसर्जन करण्याचे प्रबोधन करीत आहेत. सोडा वापरून शाडूच्या किंवा पीओपीच्या मूर्ती विसर्जित केल्यास यापासून तयार झालेल्या पाण्याचा झाडांसाठी चांगला उपयोग केला जाऊ शकतो. ही गोष्टी लोकांना माहीत करून देण्यासाठी यावर्षी विद्यार्थी काम करत आहेत.

- Advertisement -

दहा वर्षांपासून प्रेरणादायी धडपड…

गेल्या दहा वर्षांपासून संवर्धनतर्फे मूर्ती संकलनाचे काम केले जाते. यात जास्तीत जास्त संख्येने विद्यार्थी स्वयंसेवक म्हणून सहभाग घेतात. गेल्या काही वर्षांपासून ‘एक मूर्ती, एक झाड’ हा उपक्रम राबविला जात आहे. यामध्ये प्रत्येक मूर्ती दान केल्यानंतर तिच्या बदल्यात एक रोप संबंधित परिवाराला दिले जाते. यामुळे गोदावरी आणि पर्यावरण या दोघांचं ‘संवर्धन’ होतं. यामागची खरी भावना आपला बाप्पा कायम आपल्यासोबत असावा अशी असते, गेल्या वर्षी साधारण ६ हजार रोपांचे वाटप करण्यात आले होते. महिला आणि लहान मुलांचा विशेष प्रतिसाद या उपक्रमाला पहायला मिळाला. या वर्षी आरोग्याच्या दृष्टिकोनातून सगळ्यांसाठी महत्वाचा आणि सोयीचा पर्याय म्हणजे घरच्या घरीच बाप्पाचं विसर्जन हा निवडण्यात आला आणि त्यासाठी जोरदार प्रबोधन सुरू झाले. संवर्धनाच्या स्वयंसेवकांनी या वर्षी आपला बाप्पा घरीच विसर्जन करण्याचा संकल्प घेतलेला आहे. ज्यांना विसर्जन ठिकाणी मूर्ती दान करायच्या असतील, त्यांनी संपर्क करण्याचे आवाहन करण्यात येत आहे. यासाठी ९३४००६१७८४, ८०८७१८७८४१ हे संपर्क क्रमांक आहेत. याशिवाय फेसबुक पेजवरूनही संपर्क करता येऊ शकतो.

Saiprasad Patil
Saiprasad Patilhttps://www.mymahanagar.com/author/sppatil/
गेल्या १३ वर्षांपासून नाशिकमध्ये पत्रकारितेचा अनुभव. सांस्कृतिक, क्रीडा, शैक्षणिक, गुन्हेगारी यासह विविध विषयांवर लिखाण. आंतरराष्ट्रीय, राष्ट्रीय, राज्य आणि स्थानिक स्तरावरील घडामोडींवर लेखन. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -