Friday, September 17, 2021
27 C
Mumbai
घर महाराष्ट्र सीईटी परीक्षांचे वेळापत्रक जाहीर , १५ सप्टेंबर ते १० ऑक्टोबर दरम्यान होणार...

सीईटी परीक्षांचे वेळापत्रक जाहीर , १५ सप्टेंबर ते १० ऑक्टोबर दरम्यान होणार परीक्षा

Related Story

- Advertisement -

बारावीचा निकाल जाहीर होऊन बराच कालावधी लोटला तरी सीईटी परीक्षेचे वेळापत्रक जाहीर करण्यात येत नव्हते. परीक्षेबाबत विद्यार्थी व पालकांकडून सीईटी सेलकडे वारंवार विचारणा होऊनही समाधानकारक उत्तर मिळत नसल्याने त्यांच्यामध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले होते. मात्र, अखेर उच्च व तंत्र शिक्षणमंत्री उदय सामंत यांनी मंगळवारी सीईटी परीक्षेचे वेळापत्रक जाहीर करत विद्यार्थ्यांना दिलासा दिला. शैक्षणिक वर्ष 2021-22 साठी 15 सप्टेंबर ते 10 ऑक्टोबरदरम्यान परीक्षा घेण्यात येणार असल्याचे त्यांनी जाहीर केले. सर्व अभ्यासक्रमांच्या परीक्षांसाठी ८ लाख ५५ हजार ८७९ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली असून, परीक्षेसाठी २२६ केंद्रे निश्चित करण्यात आली आहेत.

सीईटी परीक्षेला मोठ्या प्रमाणात विद्यार्थी नोंदणी करतात. या पार्श्वभूमीवर परीक्षांसाठी प्रती दिवस ५० हजार संगणक उपलब्ध केले आहेत. त्यातील २५ हजार संगणक अभ्यासक्रमनिहाय विद्यार्थ्यांच्या संख्या व विद्यार्थ्यांनी दिलेल्या विकल्पानुसार निश्चित करण्यात येतील. ही प्रवेश परीक्षा राज्य शासनाने कोविड-१९ बाबत जाहीर केलेल्या सूचनांच्या नियमांचे पालन करून राबविण्यात येणार आहे. ८६ टक्के विद्यार्थ्यांना प्रथम विकल्पानुसार परीक्षा केंद्र मिळणार आहेत व १४ टक्के विद्यार्थ्यांना उर्वरित विकल्पानुसार परीक्षा केंद्र उपलब्ध करून देण्यात येणार आहे.

- Advertisement -

प्रवेशाची नोंदणी प्रक्रिया अभ्यासक्रमनिहाय सप्टेंबरच्या शेवटच्या आठवड्यात सुरू करण्यात येईल व अभ्यासक्रमनिहाय प्रवेश प्रक्रिया १५ ऑक्टोबरनंतर सुरू करण्यात येईल, असेही सामंत यांनी सांगितले. राज्य सीईटी कक्षाच्या www.mahacet.org या अधिकृत संकेतस्थळावर तपशीलवार वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. परीक्षेचा निकाल 20 ऑक्टोबरपर्यंत जाहीर करण्यात येणार असून शैक्षणिक वर्ष 2021-22 नोव्हेंबरपासून सुरू होईल. हे शैक्षणिक वर्ष सुरू करताना राज्यातील त्यावेळेची कोरोनाची परिस्थिती पाहून ऑनलाईन सुरू करायचे की ऑफलाईन याबाबत निर्णय घेण्यात येईल.

परीक्षेसाठी लोकलमध्ये मुभा
परीक्षार्थी विद्यार्थ्यांना परीक्षेच्या दिवशी मुंबईमध्ये लोकल प्रवासाची मुभा देण्यात येणार आहे. तरी परीक्षार्थी विद्यार्थ्यांनी लोकल ट्रेन तिकिटासाठी परीक्षेचे प्रवेशपत्र सोबत ठेवावे, असेही उदय सामंत यांनी सांगितले.

- Advertisement -

परदेशी शिक्षणासाठी जाणार्‍या विद्यार्थ्यांसाठी महत्वाचा निर्णय
खुल्या प्रवर्गातील गुणवंत मुलामुलींना परदेशातील नामांकित विद्यापीठामध्ये शिक्षण घेण्यासाठी ‘गुणवंत मुलामुलींना परदेशात उच्च शिक्षणासाठी शिष्यवृत्ती मंजूर करणे’ या योजनेच्या लाभासाठी विद्यार्थ्यांची व त्यांच्या पालकांची वार्षिक उत्पन्न मर्यादा शैक्षणिक वर्ष 2021-22 पासून 8 लाख रुपये इतकी करण्याचा निर्णय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली शासनाने घेतला आहे, असेही सामंत यांनी सांगितले.

सीईटी परीक्षेचे वेळापत्रक
– 15 सप्टेंबर : मास्टर ऑफ कॉम्प्युटर अ‍ॅप्लिकेशन, मास्टर हॉटेल मॅनेजमेंट अ‍ॅण्ड केटरिंग टेक्नॉलॉजी, मास्टर ऑफ आर्किटेक्चर, मास्टर ऑफ फिजिकल एज्युकेशन, बॅचलर ऑफ आर्ट्स, बॅचलर ऑफ सायन्स, बॅचलर ऑफ एज्युकेशन
– 16 ,17 व 18 सप्टेंबर : मास्टर ऑफ फिजिकल एज्युकेशन, मास्टर ऑफ बिझनेस अ‍ॅडमिनीस्ट्रेशन अँड मॅनेजमेंट स्टडी
– 20 सप्टेंबर ते 1 ऑक्टोबर : बॅचलर ऑफ इंजिनिअरिंग / टेक्नॉलाजी, बॅचलर ऑफ फार्मसी, अ‍ॅग्रीकल्चर अँड लाईड कोर्स
– 3 ऑक्टोबर : बॅचलर ऑफ हॉटेल मॅनेजमेंट केटरिंग टेक्नॉलॉजी, मास्टर ऑफ एज्युकेशन, बॅचलर ऑफ एज्युकेशन अँड मास्टर ऑफ एज्युकेशन, बॅचलर ऑफ लॉ (5 वर्ष), बॅचलर ऑफ फिजिकल एज्युकेशन
– 4,5,6 आणि 7 ऑक्टोबर : बॅचलर ऑफ फिजिकल एज्युकेशन
– 4 व 5 ऑक्टोबर : बॅचलर ऑफ लॉ-(3 वर्षे )
– 6 व 7 ऑक्टोबर : बॅचलर ऑफ एज्युकेशन जनरल अँड स्पेशल
– 9 व 10 ऑक्टोबर : बॅचलर ऑफ फाईन आर्ट

- Advertisement -