शाळकरी मुलीची बलात्कार करून हत्या; कुटुंबाच्या वादातून घेतला क्रूर बदला

तलासरीत राहणारी आपली दहा वर्षांची मुलगी १ मार्चला सकाळी नऊ वाजता शाळेत जाण्यासाठी घरातून निघून गेली होती. पण, ती रात्री उशिरा परत न आल्याने तिच्या पालकांनी तलासरी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन तलासरी पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले असता त्यामुलीच्या शेजारी राहणारा रमेश दुबळा (४६) हा बेपत्ता मुलीला मोटारसायकलवरून घेऊन गेल्याचे दिसून आले. त्यानंतर पोलिसांनी अवघ्या दोन तासात रमेश दुबळाला शोधून ताब्यात घेतले.

Sexual abuse
प्रातिनिधिक छायाचित्र

वसईः दहा वर्षीय शाळकरी मुलीचे अपहरण केल्यानंतर तिच्यावर बलात्कार करून तिची हत्या करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार पालघर जिल्ह्यातील तलासरी परिसरात घडला आहे. शेजारी राहणाऱ्या कुटुंबियांशी असलेल्या वादातून सूडापोटी आरोपीने हे कृत्य केल्याची माहिती आहे. याप्रकरणी नराधमाला अटक करण्यात आली आहे.

तलासरीत राहणारी आपली दहा वर्षांची मुलगी १ मार्चला सकाळी नऊ वाजता शाळेत जाण्यासाठी घरातून निघून गेली होती. पण, ती रात्री उशिरा परत न आल्याने तिच्या पालकांनी तलासरी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन तलासरी पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले असता त्या मुलीच्या शेजारी राहणारा रमेश दुबळा (४६) हा बेपत्ता मुलीला मोटारसायकलवरून घेऊन गेल्याचे दिसून आले. त्यानंतर पोलिसांनी अवघ्या दोन तासात रमेश दुबळाला शोधून ताब्यात घेतले.

रमेशच्या अटकेनंतर अतिशय अमानवी प्रकार उजेडात आला. रमेश दुबळा या नराधमाचा त्याच्या शेजारी राहणाऱ्या कुटुंबाशी वाद होता. त्यातूनच सूड घेण्यासाठी रमेश त्या घरातील दहा वर्षीय मुलीला फूस लावून मोटारसायकलवरून घेऊन गेला होता. तलासरीला लागूनच असलेल्या गुजरात राज्याच्या हद्दीत गेल्यानंतर त्याने एका शाळेच्या परिसरात तिच्यावर बलात्कार केला. त्यानंतर तिची गळा दाबून हत्या केली, अशी कबुली त्याने पोलिसांकडे दिली आहे.
रमेशने दिलेल्या माहितीवरून पोलिसांनी घटनास्थळावरून मुलीचा मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी पाठवून दिला आहे. शवविच्छेदन अहवाल आल्यानंतर अधिक माहितीवर प्रकाश पडणार आहे.

या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. पीडित मुलीच्या कुटुंबावर शोककळा पसरली आहे. शाळकरी मुलीची अमानुष हत्या झाल्याने हळहळ व्यक्त होत आहे.  आरोपीला कठोरात कठोर शिक्षा ठोठवावी, अशी मागणी होत आहे. पोलीस याप्रकरणाचा अधिक तपास करत आहेत. या गुन्ह्यात अजून कोणी रमेशच्या सोबत आहे का?. त्याला कोणी मदत केली आहे का?. याचा पोलीस तपास करत आहेत. मात्र कुटुंबाशी असलेल्या वादातून हे कृत्य घडल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.