– प्रेमानंद बच्छाव
मुंबई : राज्यातील शालेय विद्यार्थ्यांना आता मध्यान्ह भोजनात व्हेजिटेबल पुलाव, मसाले भात, मटार पुलाव, अंडा पुलाव सोबतच गोड खिचडी, नाचणीचे सत्व मिळणार आहे. यापूर्वी दिल्या जाणार्या पोषण आहारासंदर्भात तक्रारी आल्यानंतर शालेय शिक्षण विभागाने आहार पद्धतीत सुधारणा करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार विद्यार्थ्यांच्या पोषण आहारात विविध 12 प्रकारच्या पाककृतींचा समावेश करण्यात आला आहे. केंद्र पुरस्कृत पंतप्रधान पोषण शक्ती निर्माण योजनेंतर्गत राज्यातील पात्र शाळांमधील इयत्ता पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना पोषण आहाराचा लाभ देण्यात येतो. या योजनेतंर्गत पहिली ते पाचवीच्या प्राथमिक वर्गातील विद्यार्थ्यांसाठी 450 उष्मांक आणि 12 ग्रॅम प्रथिनेयुक्त तसेच सहावी ते आठवीच्या उच्च प्राथमिक वर्गातील विद्यार्थ्यांसाठी 700 उष्मांक आणि 20 ग्रॅम प्रथिनेयुक्त आहार तसेच तांदळापासून बनविलेल्या पोषण आहाराचा लाभ विद्यार्थ्यांना देण्यात येत होता. (Maharashtra School Nutrition new 12 dishes added)
हेही वाचा : Rani Baug : राणी बागेतील नवीन मत्स्यालयासाठीची निविदा रद्द करण्याची मागणी, कारण काय?
तथापि, आता या आहारात बदल करून गेल्या वर्षी जून 2024 मध्ये विद्यार्थ्यांच्या पोषण आहारात विविधता आणण्यासाठी विद्यार्थ्यांना 3 संरचित आहार पद्धतीप्रमाणे म्हणजेच तांदूळ, डाळी/कडधान्यापासून तयार केलेला आहार, मोड आलेले कडधान्य आणि गोड पदार्थ म्हणून तांदळाची खीर आणि नाचणी सत्व यांचा समावेश करण्यात आला. परंतु, हा आहार देताना विविध अडचणी येत असल्यामुळे सदर पाककृतींमध्ये सुधारणा करण्यासाठी लोकप्रतिनिधी, केंद्रीय स्वयंपाकगृह प्रणालीद्वारे आहाराचा पुरवठा करणार्या नागरी भागातील संस्था, बचत गट, योजनेंतर्गत कार्यरत असणार्या स्वयंपाकी तथा मदतनीस यांच्या संघटनांची निवेदने राज्य सरकारला प्राप्त झाली होती. या मागण्यांचा विचार करून तसेच प्रतिदिन, प्रति विद्यार्थी आहार खर्चाची मर्यादा विचारात घेता, विद्यार्थ्यांच्या आहार पद्धतीत सुधारणा करण्याचा निर्णय घेण्यात आला. नव्या निर्णयानुसार विद्यार्थ्यांच्या पोषण आहारात व्हेजिटेबल पुलाव, सोयाबीन पुलाव, मसाले भात, मसुरी पुलाव, मटार पुलाव, मूग, शेवगा वरण भात, मूगडाळ खिचडी, मोड आलेल्या मटकीची उसळ, चवळी खिचडी, अंडा पुलाव, चणा पुलाव, गोड खिचडी आणि नाचणी सत्व अशा१२ प्रकारच्या पाककृतींच्या समावेश करण्यात आला आहे. विद्यार्थ्यांना देण्यात येणार्या आहारात वैविध्यता आणण्याच्या दृष्टीने हे पदार्थ वेगवेगळ्या दिवसासाठी निश्चित केले जाणार आहेत.
साखरेसाठी निधी नाही
नव्या पोषण आहारात अंडा पुलाव, गोड खिचडी, नाचणी सत्व हे पदार्थ पर्यायी स्वरुपात दिले जाणार आहेत. मात्र,गोड खिचडीसाठी लागणारी साखर लोकसहभागातून मिळवावी लागेल. त्यासाठी राज्य सरकारकडून कोणताही अतिरिक्त निधी उपलब्ध करून दिली जाणार नसल्याचे शालेय शिक्षण विभागाने आपल्या शासन निर्णयात म्हटले आहे.
सरकार सामान्य जनतेचे नाही : आदित्य ठाकरे
शाळांमध्ये विद्यार्थ्यांना अंडी आणि गोड पदार्थांसाठी लागणार्या साखरेसाठी दिला जाणारा निधी बंद केल्याने शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे यांनी महायुती सरकारवर टीका केली आहे. मध्यान्ह भोजन हे अनेक विद्यार्थ्यांसाठी पोषक तत्वे मिळणारे एकमेव साधन आहे. परंतु, सरकारने सत्ताधारी नेत्यांच्या साखर कारखान्यांना तब्बल 79 कोटींचा निधी दिला. तर दुसरीकडे शाळांमध्ये मध्यान्ह भोजनात दिली जाणारी तांदळाची खीर/नाचणी सत्व यासाठी लागणार्या साखरेचा 50 कोटींचा निधी रद्द केला. त्यामुळे पुन्हा एकदा या सरकारने हे सिद्ध केले आहे की हे सरकार फक्त हपापलेल्या राजकारण्याचे आहे. हे सरकार ईव्हीएममुळे निवडून आले असून हे सरकार सामान्य जनतेचे नाही. विशेषतः ज्यांना मतदान करता येत नाही अशा शाळकरी मुलांचे तर अजिबात नाही, अशी टीका आदित्य ठाकरे यांनी गुरुवारी एक्स या समाज माध्यमातून केली.