घरमहाराष्ट्रओमायक्रॉनमुळे मुंबईतील शाळा 15 डिसेंबरला उघडणार

ओमायक्रॉनमुळे मुंबईतील शाळा 15 डिसेंबरला उघडणार

Subscribe

राज्यातील परिस्थितीचा आढावा घेऊन स्थानिक प्रशासन घेणार निर्णय

‘ओमायक्रॉन’ या कोरोनाच्या नवीन विषाणूमुळे निर्माण होत असलेल्या दहशतीच्या परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर मुंबईतील इयत्ता 1 ली ते 7 वीच्या शाळा 1 डिसेंबरऐवजी 15 डिसेंबरपासून सुरू करण्याचा निर्णय पालिका आयुक्त इकबाल चहल यांनी घेतला आहे. मात्र, राज्यातील विविध ठिकाणी परिस्थितीचा आढावा घेऊन स्थानिक प्रशासन शाळा सुरू करण्याबाबत निर्णय घेणार आहे.

मुंबईसह राज्यात कोरोनाच्या दुसर्‍या लाटेचा यशस्वीपणे सामना करणारे आरोग्य विभाग तिसर्‍या लाटेचा सामना करण्यासाठी सज्ज आहे. मात्र, तिसर्‍या लाटेची मावळण्याची शक्यता दिसू लागल्याने राज्य सरकारने इयत्ता 1 ली ते 7 वीच्या शाळा 1 डिसेंबरपासून सुरू करण्याचा निर्णय जाहीर केला. त्याअनुषंगाने राज्यात पूर्व तयारी सुरू झाली होती. मात्र, कोरोनाचा नवीन प्रकार असलेल्या ‘ओमायक्रॉन’ या विषाणूने दक्षिण आफ्रिका व काही युरोपियन देशात डोके वर काढले. या विषाणूची बाधा झालेल्या रुग्णांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत आहे. दक्षिण आफ्रिका व युरोपियन देशांमधून भारतासह जगातील अन्य देशात हजारो नागरिक, पर्यटकांची काही दिवसांपासून ये-जा झाली असल्याने अवघे जग धास्तावले आहे. त्यामुळे राज्य सरकार व मुंबई महापालिका प्रशासन अलर्ट झाले आहे.

- Advertisement -

मात्र, राज्यातील आघाडी सरकारने इयत्ता 1 ली ते 7 वी पर्यंतच्या शाळा 1 डिसेंबरपासून सुरू करण्याचा निर्णय नुकताच जाहीर केला होता. त्यामुळे मुंबईसह राज्यातील सरकारी, पालिका, खासगी शाळांनी शाळा 1 डिसेंबरपासून सुरू करण्याबाबत जोरदार पूर्व तयारी सुरू केली होती. मात्र, आता कोरोनाच्या नवीन विषाणू असलेल्या ‘ओमायक्रॉन’ ने डोके वर काढल्याने मुंबई महापालिका प्रशासन, खासगी शैक्षणिक संस्था या कालपर्यंत संभ्रमावस्थेत होत्या. तसेच, विद्यार्थ्यांचे अद्याप लसीकरण झालेले नसताना शाळा सुरू होत असल्याने पालकही काहीसे चिंतातुर झाले होते. दरम्यान, मंगळवारी सकाळी मुंबई महापालिका आयुक्त इकबाल चहल यांनी, पालिका शिक्षण खात्याचे अधिकारी व वरिष्ठ अधिकारी यांची तातडीची बैठक घेतली. या बैठकीत, मुंबई महापालिका हद्दीतील इयत्ता 1 ली ते 7 वी च्या शाळा 1 डिसेंबर ऐवजी 15 डिसेंबरपासून सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला.

मुंबईत गेल्या 10 दिवसांत विदेशातून आलेल्या नागरिकांचा, पर्यटकांचा शोध घेण्यात येत आहे. आता 15 डिसेंबरला शाळा सुरू होणार असल्याने तोपर्यंत पालिका प्रशासन व आरोग्य यंत्रणेला कोरोनाच्या नवीन विषाणूचा प्रादुर्भाव मुंबईत सुरू झाला आहे की नाही याबाबत आढावा घेण्यास पुरेसा वेळ मिळणार आहे.

- Advertisement -

‘ओमायक्रॉन’च्या धोक्यामुळे 15 डिसेंबरपासून शाळा सुरू होणार
दक्षिण आफ्रिकेत ‘ओमायक्रॉन’ विषाणूचा प्रादुर्भाव वाढलेला आहे. तेथे ‘ओमायक्रॉन’ बाधित रुग्णांमध्ये 18 वर्षांखालील मुलांची संख्या जास्त प्रमाणात आहे. त्यामुळे मुलांची काळजी घेण्याच्या दृष्टीने आपण इयत्ता 1 ली ते 7 वी च्या शाळा 1 डिसेंबर ऐवजी 15 डिसेंबरपासून सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे, अशी माहिती मुंबई महापालिका आयुक्त इकबाल चहल यांनी दिली.

नागपूरमध्ये 10 डिसेंबरनंतर निर्णय होणार
कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटच्या पार्श्वभूमीवर नागपूर महापालिकेने पहिली ते सातवीपर्यंतच्या शाळा 10 डिसेंबरपर्यंत सुरू न करण्याचा निर्णय घेतला आहे. 10 तारखेनंतर आढावा घेऊन हा निर्णय घेतला जाणार असल्याची माहिती पालिका आयुक्तांनी दिली.

पुण्यात 15 डिसेंबरपासून शाळा सुरू
पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ आणि महापालिकेचे आयुक्त विक्रम कुमार यांच्यात झालेल्या बैठकीनंतर पुणे महापालिकेच्या हद्दीतील शाळा 15 डिसेंबरपासून सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. ओमायक्रॉन विषाणू संसर्गाच्या पार्श्वभूमीवर पुण्यात तीन दिवसांसाठी निर्बंध लागू करण्यात आलेले आहेत. त्यामुळे पुणे महापालिकेने शाळा 15 डिसेंबरपासून सुरू करण्याचा निर्णय घेतल्याची माहिती मोहोळ यांनी दिली.

औरंगाबादमध्ये शाळा सुरू करण्याबाबत संभ्रम
औरंगाबाद ग्रामीण भागातील शाळा 1 डिसेंबरपासून सुरू होणार आहेत. तर शहरातील शाळा सुरू करण्याबाबत अद्याप निर्णय झालेला नाही. 10 डिसेंबरपर्यंत परिस्थितीचा आढावा घेऊन शाळा सुरू करण्याबाबत हा निर्णय घेतला जाणार आहे, अशी माहिती पालिका उपायुक्त संतोष टेंगळे यांनी दिली.

सोलापूर शहरातील शाळा 1 डिसेंबरपासूनच
सोलापूर शहरातील प्राथमिक शाळा उद्यापासून सुरू होणार आहेत. प्रशासनातील अधिकार्‍यांनी पाठवलेल्या प्रस्तावावर पालिका आयुक्तांनी उशिरा निर्णय घेतला. शहरातील 368 शाळा 1 डिसेंबरपासून सुरू होणार आहेत. सकाळी 11 वाजता पहिली ते सातवीपर्यंतचे वर्ग सुरू होणार असल्याचे आदेश पालिका आयुक्त पी. शिवशंकर यांनी दिले आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -