School Reopen : उद्या शाळांची घंटा वाजणार, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे विद्यार्थी, शिक्षकांशी साधणार संवाद

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ‘माझे विद्यार्थी, माझी जबाबदारी’ हा कार्यक्रम दुपारी १२ वाजता घेणार

uddhav thackeray
ST Workers : "एसटी कर्मचाऱ्यांनो तुम्ही आमचेच' म्हणत मुख्यमंत्र्यांचे संपकरी एसटी कर्मचाऱ्यांना भावनिक आवाहन

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील सर्वच शाळा बंद होत्या अखेर कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्यामुळे तब्बल दीड वर्षानंतर शहरी आणि ग्रामीण भागात ज्या ठिकाणी कोरोनाचा प्रादुर्भाव कमी आहे तेथे शाळा सुरु करण्यात येत आहेत. सोमवारपासून राज्यात शाळा सुरु करण्याची परवानगी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिली आहे. सोमवारी मुख्यमंत्री राज्यातील विद्यार्थी, पालक, शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी यांना मार्गदर्शन करण्यासाठी ‘माझे विद्यार्थी, माझी जबाबदारी’ या कार्यक्रमांतर्गत दुपारी १२ वाजता संवाद साधणार आहेत. हा कार्यक्रम राज्यातील सर्व शाळांमध्ये विद्यार्थ्यांना दाखवण्यात यावा अशा सूचना देण्यात आल्या आहेत. तसेच शाळांमध्ये विद्यार्थ्यांचे स्वागत करुन फोटो सोशल मीडियावर पोस्ट करण्यास सांगितले आहेत.

राज्यातील बहुतांश शाळा सोमवारपासून सुरू होणार आहेत. यावेळी राज्यातील विद्यार्थी, पालक, शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी यांना मार्गदर्शन करण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ‘माझे विद्यार्थी, माझी जबाबदारी’ हा कार्यक्रम दुपारी १२ वाजता घेणार आहेत. हा कार्यक्रम सर्वांनी युट्युबवर पाहावा व विद्यार्थ्यांनाही दाखवावा, अशा सूचनाही शालेय शिक्षण विभागाकडून करण्यात आल्या आहेत.

तब्बल दीड वर्षांनंतर शहरी भागात इयत्ता ८ वी ते १२ तर ग्रामीण भागातही इयत्ता ५ वी ते १२ वीपर्यंतच्या शाळा सोमवारपासून सुरू होत आहेत. या पार्श्वभूमीवर राज्यातील शाळांची साफसफाई, त्यांचे निर्जंतुकीकरणाचे काम वेगाने सुरू आहे. मात्र, असे असले तरी अद्याप काही शाळांच्या सफाईचे काम पूर्ण झालेले नाही. त्यामुळे शाळा प्रशासनाकडून वेगाने काम करण्यात येत आहे. त्याचप्रमाणे राज्यातील शाळांनी शनिवारी पालकांच्या सभा घेऊन त्यांना मार्गदर्शन केले. यावेळी काही शाळांनी गणवेशाची सक्ती केल्याने पालक व मुख्याध्यापकांमध्ये वाद झाल्याचे दिसून आले. मात्र, असे असले तरी शालेय शिक्षण विभागाकडून शाळा सुरू करण्याची तयारी जोरात सुरू केली आहे.

शाळेतील मुलांना गणवेश व पाठ्यपुस्तके तातडीने पुरवण्याचे आदेश शालेय शिक्षण विभागाने जिल्हाधिकारी व शिक्षणाधिकार्‍यांना दिले आहेत. दीड वर्षांनंतर शाळा सुरू होणार असल्याने विद्यार्थ्यांच्या मानसिकतेचा विचार करून त्यांना हाताळण्यात यावे. शाळेमध्ये शैक्षणिक वातावरण निर्मिती होण्यासाठी शाळेत येणार्‍या प्रत्येक विद्यार्थ्याचे सोमवारी अनौपचारिक स्वागत करून शिक्षणोत्सव साजरा करण्यात यावे. त्याचप्रमाणे काही दिवस त्यांना अभ्यासाचा मानसिक तणाव देण्यात येऊ नये अशा सूचनाही शिक्षण विभागाकडून करण्यात आल्या आहेत. यामुळे काही शाळांकडून पहिल्या आठवड्यात वर्गात प्रत्यक्ष अभ्यास न घेण्याचा निर्णय घेतला आहे.