घरमहाराष्ट्रजेंडर गॅप मिटविण्यासाठी शाळांची ‘परेड’

जेंडर गॅप मिटविण्यासाठी शाळांची ‘परेड’

Subscribe

राज्यात मुलींच्या जन्मदरात झालेली घट कमी करण्यासाठी आणि जेंडर गॅपचा प्रश्न सोडविण्यासाठी येत्या काळात राज्यातील शाळांची नवी परेड भरणार आहे. यासाठी विशेष मोहीम सुरु करण्याच्या सूचना शालेय शिक्षण विभागाने दिल्या असून त्यानुसार ‘बेटी बचाओ, बेटी पढाओ’ या उपक्रमासाठी शाळांना नवी धावपळ करावी लागणार आहे. त्यानुसारच्या सूचाना शिक्षण संचालकांना देण्यात आल्या असून शाळा आता यासाठी काय करते हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.

बेटी बचाओ, बेटी पढाओसाठी करावी लागणार धावपळ

राज्यात मुलींच्या जन्मदरात घट असलेल्या राज्यांमध्ये महाराष्ट्र पाचव्या स्थानावर असल्याची माहिती दस्तुरखुद्द आरोग्यमंत्र्यांनी दिली होती. हा प्रश्न सोडविण्यासाठी राज्य सरकारचे विविध प्रयत्न सुरु झाले असून या प्रयत्नांचा एक भाग म्हणून आता शिक्षण विभागाला यासाठी नवा उपक्रम सुरु करावा लागणार आहे. या निर्णयानुसार शाळांतून बेटी बचाओ, बेटी पढाओची जनजागृती होण्यासाठी उपक्रम राबविण्याच्या सूचना शिक्षण विभागाकडून राज्यातील विभागीय शिक्षण संचालकांना देण्यात आल्या आहेत. शिक्षण विभाग केवळ सूचनांवरच थांबला नाही तर याचसोबत शाळांनी या संदर्भात काय कार्यवाही केली याचा अहवालही शाळांना शिक्षण संचलनायाला सादर करावयाचा असल्याने येत्या काळांत शाळांची नवी परीक्षा सुरु होणार हे आता नक्की झाले आहे.

- Advertisement -

सर्व शिक्षा अभियानांतर्गत शाळांत बेटी बचाओ बेटी पढाओ उपक्रम राबवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. ३ मे २०१७ रोजी कोअर समितीच्या बैठकीत ज्या जिल्ह्यांमध्ये जेंडर गॅप राष्ट्रीय निदेशांकापेक्षा जास्त आहे अशा जिल्ह्यात ही योजना राबविण्याच्या सूचना दिल्या आहेत. मुलींचा जन्मदर वाढविण्यासाठी हे योजना केंद्राकडून सुरु करण्यात आली मात्र अद्याप त्यात काहीच सुधारणा दिसून आली नसल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे आता शाळांतूनही यासंबंधी अधिक जनजागृती करण्यासाठी शिक्षण संचालनालयाने ही योजना अधिक प्रभावीपणे राबविण्यासाठी हे आदेश दिले असल्याचे कळते आहे.

राज्य सरकारची ही योजना नक्कीच चांगली आहे. मात्र ही योजना राबवायची कशी हे एक कोडं आहे. तर घोषवाक्य तयार करून बोर्ड लावण्यासाठी कला शिक्षकच शाळेत नसतील तर विद्यार्थी कोणाचे मार्गदर्शन घ्यायचे, हा सर्वात मोठा प्रश्न आमच्यासमोर आहे

– प्रशांत रेडीज, सचिव मुख्याध्यापक संघटना

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -