आज राज्यात होणार शिक्षणोत्सव, दीड वर्षांनंतर वाजणार शाळांची घंटा

विद्यार्थ्यांना शाळेची गोडी लागावी यासाठी पहिल्या आठवड्यात वर्गात प्रत्यक्ष अभ्यास नाही

Admission to school without certificate What is the meaning of this decision and what is its significance for the students

कोरोनाचा प्रादुर्भाव ओसरत असल्याने राज्य सरकारने ग्रामीण भागात इयत्ता पाचवी ते बारावी आणि शहरी भागामध्ये इयत्ता आठवी ते बारावीपर्यंतचे वर्ग ४ ऑक्टोबरपासून सुरू करण्याचा निर्णय घेतला. दीड वर्षांनंतर शाळांचा श्रीगणेशा होणार असल्याने ४ ऑक्टोबरला करण्याच्या सूचना शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी दिल्या आहेत. त्यानुसार सोमवारी शाळेत येणार्‍या विद्यार्थ्यांचे जय्यत स्वागत करण्याची तयारी शाळांनी केली आहे. सोशल डिस्टन्सिंग राखता यावे यासाठी विद्यार्थ्यांना टप्प्याटप्यात बोलावण्यात येणार असून, काही शाळांनी तीन तासांचे नियोजन केले आहे. विद्यार्थ्यांना शाळेची गोडी लागावी यासाठी पहिल्या आठवड्यात वर्गात प्रत्यक्ष अभ्यास होणार नाही.

तब्बल दीड वर्षांनंतर शहरी भागात इयत्ता ८ वी ते १२ तर, ग्रामीण भागातही इयत्ता ५ वी ते १२ वीपर्यंतच्या शाळा सोमवारपासून सुरू होत आहेत. या पार्श्वभूमीवर राज्यातील शाळांची साफसफाई, त्यांचे निर्जंतुकीकरणाचे काम वेगाने सुरू आहे. मात्र, असे असले तरी अद्याप काही शाळांच्या सफाईचे काम पूर्ण झालेले नाही. त्यामुळे शाळा प्रशासनाकडून वेगाने काम करण्यात येत आहे. त्याचप्रमाणे राज्यातील शाळांनी शनिवारी पालकांच्या सभा घेऊन त्यांना मार्गदर्शन केले. यावेळी काही शाळांनी गणवेशाची सक्ती केल्याने पालक व मुख्याध्यापकांमध्ये वाद झाल्याचे दिसून आले. मात्र, असे असले तरी शालेय शिक्षण विभागाकडून शाळा सुरू करण्याची तयारी जोरात सुरू केली आहे. शाळेतील मुलांना गणवेश व पाठ्यपुस्तके तातडीने पुरवण्याचे आदेश शालेय शिक्षण विभागाने जिल्हाधिकारी व शिक्षणाधिकार्‍यांना दिले आहेत. दीड वर्षांनंतर शाळा सुरू होणार असल्याने विद्यार्थ्यांच्या मानसिकतेचा विचार करून त्यांना हाताळण्यात यावे. शाळेमध्ये शैक्षणिक वातावरण निर्मिती होण्यासाठी शाळेत येणार्‍या प्रत्येक विद्यार्थ्याचे सोमवारी अनौपचारिक स्वागत करून शिक्षणोत्सव साजरा करण्यात यावे. त्याचप्रमाणे काही दिवस त्यांना अभ्यासाचा मानसिक तणाव देण्यात येऊ नये अशा सूचनाही शिक्षण विभागाकडून करण्यात आल्या आहेत. यामुळे काही शाळांकडून पहिल्या आठवड्यात वर्गात प्रत्यक्ष अभ्यास न घेण्याचा निर्णय घेतला आहे.

शाळा सुरू होणार असल्याने सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचार्‍यांना कोविड प्रतिबंधक लसीकरण प्रथम प्राधान्याने करून घ्यावे. ज्या शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचार्‍यांचे लसीकरण झाले नाही त्यांना लसीकरणासाठी प्रवृत्त करण्यात यावे. तसेच ग्रामीण भागातील पहिली ते चौथी व शहरी भागातील इयत्ता पहिली ते सातवी च्या शाळा सुरू होईपर्यंत वर्गातील विद्यार्थ्यांना शिक्षकांनी ऑनलाईन शिक्षण देऊन आवश्यकतेनुसार विद्यार्थ्यांच्या घरी भेटी देऊन त्यांना शैक्षणिक मार्गदर्शन करावे, अशा सूचनाही शालेय शिक्षण विभागाकडून राज्यातील सर्व शाळामंधील शिक्षक, मुख्याध्यापक व शिक्षणाधिकारी व जिल्हाधिकार्‍यांना दिल्या आहेत.

मुंबईतील ४१ शाळांमध्ये वर्ग सुरू होणार नाही

मुंबई महापालिकेनेही शाळा सुरू करण्याची तयारी पूर्ण केली आहे. मात्र, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ४१ शाळांमध्ये क्वारंटाईन सेंटर सुरू करण्यात आले होते. या सेंटरमधील रुग्णांना इतरत्र हलवण्याची प्रक्रिया सुरू आहे. मात्र, अद्याप ही प्रक्रिया पूर्ण न झाल्याने या ४१ शाळांमधील वर्ग सुरू होणार नसल्याची माहिती पालिकेच्या शिक्षण विभागाकडून देण्यात आली.

मुख्यमंत्र्यांचा विद्यार्थी, माझी जबाबदारी

राज्यातील बहुतांश शाळा सोमवारपासून सुरू होणार आहेत. यावेळी राज्यातील विद्यार्थी, पालक, शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी यांना मार्गदर्शन करण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विद्यार्थी, माझी जबाबदारी कार्यक्रम दुपारी १२ वाजता घेणार आहेत. हा कार्यक्रम सर्वांनी युट्युबवर पाहावा व विद्यार्थ्यांनाही दाखवावा, अशा सूचनाही शालेय शिक्षण विभागाकडून करण्यात आल्या आहेत.

दुकानांमध्ये पालकांची लगबग

शाळा सुरू होणार असल्याने काही ठिकाणी शालेय साहित्य खरेदी करण्यासाठी पालकांची लगबग दिसून आली. खोडरबर, शॉर्पनर, स्कूल बॅग, कंपास पेटी, पाऊच, पेन, पेन्सिल, वह्या, स्टिकर, बुककव्हर आदी शालेय साहित्य खरेदी करण्यासाठी मुलेही पालकांसोबत शाळेत आल्याचे दिसून येत होते.