वाढत्या महागाईमुळे खिशाला बसणार कात्री; दुध, मिठ, गॅस यांसारख्या जीवनावश्यक वस्तूंची दरवाढ

नाशिक : जगभरात दोन वर्षांपूर्वी करोना महामारीचे संकटामुळे जगभराची अर्थव्यवस्था ढासाळली आहे. जवळपास दोन वर्षांनंतर आता कुठे सर्व पुर्व पदावर येण्यास सुरुवात झाली होती. परंतु देशभरात वाढत्या महागाईमुळे सामान्यांच्या जीवनमानात याचा खूप मोठा फरक पडतो आहे.सरकारने घरगुती गॅस सिलेंडरच्या दरात जवळपास ५० रूपये तर व्यावसायिक गॅस सिलेंडरच्या दरात ३५० रुपयांची वाढ १ मार्च पासून केली आहे. तर गेल्या काही महिन्यांपासून पेट्रोल आणि डिझेलच्या दरात जरी वाढ करण्यात आली नसली तरी दररोजच्या वापरातील जीवनावश्यक वस्तू, अन्नधान्य तसेच भाजीपाल्याच्या किमती दिवसेंदिवस वाढत असल्याने या दरवाढीचा फटका महिन्याभराच्या घर खर्चाच्या बजेटवर पडत असल्याने गृहिणींचा अंदाज चुकत आहे.

करोना काळात अनेकांच्या नोकर्‍या गेल्या तर काहींचे व्यवसाय बंद पडले होते. परंतु सध्या ज्यांना नोकर्‍या मिळाल्या किंवा नव्याने आपले व्यवसाय सुरू करत आहेत त्यांना तुटपुंज्या उत्पन्नावर आपला आणि कुटुंबाचा उदरनिर्वाह करावा लागत आहे. अगोदरच पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती वाढलेल्या असून सर्वसामान्यांनी गाड्या वापरायच्या की नाही असाच सवाल नागरिकांना पडलेला असताना, वाढत्या महागाईने गृहिणींना घर चालवणे अडचणीचे झाले असून त्यातच आता घरगुती गॅस सिलेंडरची दरवाढ करण्यात आली आहे. दरवाढी अगोदर व्यावसायिक गॅस सिलेंडर १८५० रूपयांचे होते मार्च महिन्यात तेच सिलेंडर २२०० रूपयांचे झाले आहे. व्यावसायिक गॅस सिलेंडरच्या दरवाढीमुळे हॉटेल व्यावसायिक देखील खाद्य पदार्थांमध्ये ५ ते १० रूपयांनी वाढ करण्याच्या विचारात आहे.

“घरगुती गॅस सिलिंडर दरवाढ”

मार्च -२०१९ – ७०१.५०
मार्च -२०२०- ८०५.५०
मार्च -२०२१- ८९९.५०
मार्च -२०२२- १०५६.५०
मार्च -२०२३- ११०६.५०

सध्याच्या परिस्थितीमध्ये कोणतेही कुटुंब महागाईच्या झळांपासून वाचलेले नाही. कुटुंबाच्या एका महिन्याचा जीवनावश्यक वस्तूंवरचा खर्च हा तीन ते चार हजार रूपयांनी वाढला आहे. घर खर्च वाढत असले तरी ही महिन्याचे उत्पन्न वाढत नाही. दररोज लागणारे मीठ आणि दुध यांसारख्या जीवनावश्यक वस्तूंचे दर आवाक्याबाहेर गेले आहेत. : सोनाली महाजन, गृहिणी

गॅस दरवाढी विरोधात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने वेळोवेळी आंदोलने केलेली आहे. सर्वसामान्य कुटुंबाला वेळोवेळी होणारी गॅस दरवाढ परवडत नाही याचा फटका मोदी सरकारला 2024 मध्ये नक्कीच बसेल मोदी सरकारने सर्वसामान्य जनतेचा विचार केला पाहिजे.: अविदा बिभीषण शेळके, गृहिणी 

गॅस दरवाढीनेे केटरींग, खानावळ, हॉटेल सारखे व्यवसाय करणार्‍या सर्वांनाच आपल्या खाद्यपदार्थांचे दर नाईलाजाने वाढवावे लागणार असून ह्याचा बोजा दुर्दैवाने ग्राहकांवर पडणार आहे. आता लग्नसराई सुरू होणार आहे, त्यात ही महागाई अधिक प्रमाणात जाणवणार आहे. माझ्याकडे आधीच बुक झालेल्या लग्नाच्या तारखांच्या ग्राहकांना आता पुन्हा एकदा फोन करून दर वाढवून देण्याचे सांगावे लागणार सल्याने आता सरकारी निर्णयामुळे केटरर्स व ग्राहक यांच्यात पुन्हा एकदा तणाव निर्माण होणार आहे. हे दर आता कमी होण्याची गरज आहे. : योगेश कापसे, केटरिंग व्यावसायिक 

आवक कमी आणि जावक जास्त झालेली आहे. वाढत्या लोकसंख्येमुळे पण ही दरवाढ होत आहे. लोकसंख्ये बरोबर जर रोजगार वाढला तर महागाई कमी होईल बेरोजगारी कमी होईल. सरकारी कर्मचार्‍यांना महागाई भत्ता मिळतो तसा खाजगी नोकरदारांना देखील मिळावा. गॅस दरवाढी बद्दल बोलायचे म्हटले तर प्रत्येकाच्या उत्पन्ना नुसार लोकांना गॅसची सबसिडी वाढवून मिळावी. : कामिनी साळुंखे, गृहिणी