घरताज्या घडामोडीदुसरा मंत्रिमंडळ विस्तार १५ मेनंतर!

दुसरा मंत्रिमंडळ विस्तार १५ मेनंतर!

Subscribe

मुंबई । राज्यात राष्ट्रवादी काँग्रेसचा नवा अध्यक्ष कोण यावरून खलबतं सुरू असताना एकनाथ शिंदे-देवेंद्र फडणवीस सरकारच्या दुसर्‍या टप्प्यातील बहुप्रतीक्षित मंत्रिमंडळ विस्ताराचा मुहूर्त अखेर पक्का झाला आहे. 15 मेनंतर शिंदे गट आणि भाजपच्या आमदारांना या मंत्रिमंडळ विस्तारात मंत्रीपदाची संधी मिळेल. या मंत्रिमंडळ विस्ताराला नुकतेच मुंबई दौर्‍यावर येऊन गेलेले केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी हिरवा कंदील दाखविल्याची खात्रीलायक माहिती आपलं महानगरला विश्वसनीय सूत्रांनी दिली आहे. 15 मेआधी सर्वोच्च न्यायालयातील सत्तासंघर्षावरील निकालही अपेक्षित आहे. शिंदे सरकारच्या दुसर्‍या शपथविधी सोहळ्याच्या तयारीसाठी मंत्रालयीन पातळीवर गुप्तता ठेवण्यात येत आहे.

मागील दोन आठवड्यांपासून मुख्यमंत्री कार्यालयातील शांतता मंगळवारपासून मुख्यमंत्र्यांसह अधिकारी आणि कर्मचारी वर्गाने झटकली असल्याचे बुधवारी दिसून आले. मागील ९ महिन्यांपासून मंत्रीपदाकडे डोळे लावून बसलेल्या भाजप आणि शिंदे गटातील अस्वस्थ आमदारांची नाराजी यामुळे दूर होणार आहे. पहिल्या मंत्रिमंडळ विस्तारात स्थान न मिळालेल्या शिंदे गटातून बच्चू कडू, संजय शिरसाट, भरत गोगावले, प्रताप सरनाईक आणि यामिनी जाधव यांना आता संधी मिळण्याची दाट शक्यता आहे.

- Advertisement -

शिवसेनेत उभी फूट पडल्यानंतर 29 जून 2022 रोजी तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला होता. या राजीनाम्यामुळे महाविकास आघाडीचे सरकार कोसळले. त्यानंतर एकनाथ शिंदे यांनी आपल्या समर्थक आमदांसोबत भाजपशी युती करीत 30 जून रोजी मुख्यमंत्रीपदाची, तर देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. त्यानंतर तब्बल महिन्याहून अधिक काळ राज्याला मंत्रिमंडळ नव्हते. दोघेच जण सरकार चालवत असल्याची टीका अनेकदा विरोधकांकडून झाली होती. सर्वोच्च न्यायालयात सुरू असलेल्या सत्तासंघर्षावरील सुनावणीदरम्यान 40 दिवसांच्या प्रतीक्षेनंतर 9 ऑगस्ट 2022 रोजी शिंदे-फडणवीस सरकारचा पहिला मंत्रिमंडळ विस्तार झाला.

या मंत्रिमंडळ विस्तारात दोन्ही बाजूच्या जास्तीत जास्त आमदारांना संधी मिळेल असे वाटत होते. एकनाथ शिंदे यांच्यसोबत बंड करून आलेले,भाजपमधील बहुतांश आमदार या मंत्रीपदासाठी गुडघ्याला बाशिंग बांधून तयार होते. परंतु पहिल्या मंत्रिमंडळ विस्तारात शिंदे गट आणि भाजपकडून प्रत्येकी 9 आमदारांनाच संधी मिळाली होती. आता सत्तासंघर्षाचा निकाल काही आला तरी शिंदे सरकारवर त्याचा परिणाम होणार नसल्यानेच मंत्रिमंडळ विस्तार करण्याबाबत दोन्ही पक्षात एकमत झाले आहे.

- Advertisement -

यामध्ये शिंदे गटातून गुलाबराव पाटील, दादा भुसे, संदिपान भुमरे, उदय सामंत, अब्दुल सत्तार, शंभूराज देसाई, संजय राठोड, तानाजी सावंत, दीपक केसरकर आणि भाजपकडून राधाकृष्ण विखे-पाटील, सुधीर मुनगंटीवार, चंद्रकांत पाटील, विजयकुमार गावित, गिरीश महाजन, डॉ. सुरेश खाडे, रवींद्र चव्हाण, अतुल सावे, मंगल प्रभात लोढा अशा प्रत्येकी 9 आमदारांनाच मंत्रीपदाची लॉटरी लागली. तेव्हापासून मंत्रीपदाच्या आश्वासनावर दिवस ढकलत असलेल्या दोन्ही बाजूकडील आमदारांची अवस्थता आणि नाराजी दिवसागणिक वाढत चालली होती. ही नाराजी दुसर्‍या मंत्रिमंडळ विस्तारातून दूर होणार आहे.

काही दिवसांपूर्वी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कामावर भाजपश्रेष्ठी नाराज असल्याने दिल्लीत मुख्यमंत्री बदलाच्या हालचाली सुरू आहेत, अशा वावड्या उठल्या होत्या. त्याला सत्तासंघर्षाच्या निकालाचीही पार्श्वभूमी होती. त्यामुळे शिंदे गटात प्रचंड अस्वस्थता पसरली होती. त्यातच ३० एप्रिलला केंद्रीय गृहमंत्री अमित शहा मन की बात कार्यक्रमा-निमित्ताने मुंबई दौर्‍यावर आले होते. यावेळी अमित शहांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत बंद दाराआड चर्चा करीत मुख्यमंत्री बदलाच्या चर्चा फेटाळून लावल्या. मुख्यमंत्रीपदी एकनाथ शिंदेच कायम राहतील, हे सांगताना 2024 च्या विधानसभा निवडणुकाही तुमच्याच नेतृत्वाखाली लढवण्यात येतील, असेही शहांनी यावेळी सांगितल्याचे खात्रीलायकरित्या समजते. शहांनी शिंदे-फडणवीस सरकार स्थिर असल्याचा विश्वास दोघांनाही दिल्यामुळेच मंत्रिमंडळ विस्ताराचा मुहूर्त १५ मे नंतरचा असणार आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -