समृद्धी महामार्गाच्या दुसऱ्या टप्प्याचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते लोकार्पण, शिर्डी ते भरवीर 80km मार्ग सुरु

 

शिर्डी : हिंदुह्रदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्गाच्या शिर्डी ते भरवीर ता. इगतपुरी या ८० किलोमीटर लांबीच्या दुसऱ्या टप्प्याचे लोकार्पण आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याहस्ते झाले. या महामार्गामुळे नाशिक ते शिर्डी हे अंतर जलदरित्या कापता येणे शक्य होणार आहे.

समृद्धी महामार्गावर ७ मोठे पूल, १८ छोटे पूल, वाहनांसाठी ३० भुयारी मार्ग, हलक्या वाहनांसाठी २३ भुयारी मार्ग, ३ पथकर प्लाझावरील तीन इंटरचेंज, ५६ टोल बूथ, ६ वे ब्रिज आदी सुविधांचा समावेश आहे. पॅकेज क्र ११,१२ आणि १३ चे इगतपुरी तालुक्यामधील भरवीर पर्यंतचे काम पूर्ण झाले असून दुसऱ्या टप्प्याचा खर्च ३२०० कोटी रुपये एवढा असून लांबी ८० कि मी आहे. या टप्याच्या उद्‌घाटनानंतर ७०१ कि.मी पैकी आता एकूण ६०० कि.मी लांबीचा समृध्दी महामार्ग वाहतुकीसाठी खुला झाला आहे.

या दुसऱ्या टप्यात सिन्नर येथील गोंदे इंटरचेंज येथून नाशिक, अहमदनगर, पुणे व त्या भागातील इतर गावांसाठी या महामार्गाचा उपयोग होईल. भरवीर इंटरचेजपासून घोटी (ता. इगतपुरी) हे अंदाजे 17 कि.मी अंतरावर आहे. या इंटरचेंजपासून नाशिक, ठाणे, मुंबई येथून शिर्डी येथे जाणाऱ्या भाविकांचा प्रवास जलद होईल. तसेच भरवीर ह्या इंटरचेजपासून एस.एम.बी.टी रुग्णालय अत्यंत जवळ (500 मीटर अंतरावर) आहे. शिर्डीपासून ह्या रुग्णालयापर्यंत एक तासाच्या आत पोहचता येईल. याशिवाय शिर्डी, अहमदनगर व सिन्नर परिसरातील शेतकऱ्यांच्या शेतीमालाच्या वाहतुकीसाठी मुंबई महानगर प्रदेशात येण्यासाठी कमी कालावधी लागेल.

या टप्यात अहमदनगर जिल्हयातील कोपरगाव तालुक्यातील एकूण ७ गावातून लांबी ११.१४१ कि.मी. नाशिक जिल्हयातील एकूण ६८.०३६ कि.मी. लांबी पैकी सिन्नर तालुक्यातील एकूण २६ गावातून ६०.९६९ कि.मी. व इगतपूरी तालुक्यातील ०५ गावातील ७.०६७ कि.मी लांबीचा समावेश आहे.

त्यामध्ये पॅकेज – ११अंतर्गत कोकमठाण, ता. कोपरगाव, जि. अहमदनगर, पॅकेज – १२ अंतर्गत गोदे ता. सिन्नर, जि. नाशिक व पॅकेज- १३अंतर्गत एस.एम.बी.टी. मेडिकल कॉलेज, भरवीर, ता. इगतपूरी, जि. नाशिक या इंटरचेंजचा समावेश आहे.

विदर्भ, मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्रासह राज्यातील २४ जिल्ह्यांच्या विकासासाठी गेमचेंजर ठरणाऱ्या हिंदू हृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्गाच्या नागपूर ते शिर्डी या ५२० किलोमीटर लांबीच्या पहिल्या टप्प्याचे लोकार्पण माननीय पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ११ डिसेंबर २० २२ रोजी केले होते. हा महामार्ग खुला झाल्यानंतर नागपूर ते शिर्डी अंतर १० तासांऐवजी फक्त पाच तासातच कापणे शक्य झाले आहे. पाच महिन्यांत लाखो वाहनधारकांनी समृध्दी महामार्गाचा वापर केला आहे.