घरमहाराष्ट्रकोरोनाच्या दुसर्‍या लाटेमुळे ऑक्सिजनची मागणी चौपट, नव्या रूग्णसंख्येने टेन्शन वाढवले

कोरोनाच्या दुसर्‍या लाटेमुळे ऑक्सिजनची मागणी चौपट, नव्या रूग्णसंख्येने टेन्शन वाढवले

Subscribe

राज्यात कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत असून कोरोनाबाधितांचा आकडा देखील वाढता आहे. दरम्यान, कोरोनाचा कहर पाहता राज्यात कोरोनाची दुसरी लाट येण्याची शक्यता देखील वर्तवली जात आहे. त्यामुळे नव्याने नोंद होत असलेल्या कोरोना रुग्णांच्या संख्येने राज्यात चिंताजनक परिस्थिती निर्माण झाली आहे. अशा परिस्थितीत कोरोना बाधितांना आवश्यक असणाऱ्या ऑक्सिजनच्या मागणी अचानक वाढली असून ही मागणी साधारण चारपटीने वाढली असल्याचे सांगितले जात आहे. राज्यात कोरोनाबाधितांचा आकडा सातत्याने असाच वाढत राहिला आणि ऑक्सिजन पुरवठ्याची व्यवस्था कमी पडली, तर परिस्थिती हाताबाहेर जाऊ शकते, अशी चिंताजनक माहिती समोर आली आहे. याशिवाय रुग्णांना ऑक्सिजन प्राधान्याने द्या, असे राज्य सरकारचे आदेश काढल्यामुळे त्याचा परिणाम उद्योगांवर होत असल्याचेही दिसून येत आहे.

मागणीत ७०० मेट्रीक टनांपर्यंत वाढ

मिळालेल्या माहितीनुसार, राज्यात दररोज १२०० मेट्रीक टन ऑक्सिजन तयार होतो. त्यापैकी सामान्य परिस्थितीत वैद्यकीय क्षेत्रासाठी १५० ते २०० मेट्रीक टन ऑक्सिजन लागतो पण कोरोनाचे रुग्ण वाढल्यामुळे हीच मागणी दररोज ७०० मेट्रीक टनांपर्यंत वाढली असल्याचे समोर आले आहे. गेल्यावर्षी जेव्हा कोरोनाचे रुग्ण वाढले होते तेव्हा ही मागणी ६०० मेट्रीक टनांपर्यंत गेली होती त्यात वाढ झाल्याचे दिसून आले आहे. यासोबतच जर रुग्णसंख्या वाढली आणि रुग्णांना ऑक्सिजनची गरज पडू लागली तर परिस्थिती चिंताजनक होण्याची शक्यता असल्याचे जनआरोग्य योजनेचे आयुक्त डॉ. सुधाकर शिंदे यांनी सांगितले.

- Advertisement -

एका अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, राज्यात ऑक्सिजन बनवणारे केवळ चार ते पाच प्रमुख उत्पादक आहेत आणि ५० च्या आसपास बॉटलिंग प्लँट असून ते सगळे पूर्ण क्षमतेने चालू आहेत. स्टील प्लँट, केमिकल कंपन्या, फोर्जिंग प्लँट अशा अनेक ठिकाणी ऑक्सिजनची गरज असते. मात्र त्या ठिकाणी प्राधान्य न देता हॉस्पिटलसाठी ऑक्सिजन देणे सुरू झाले आहे. त्यामुळे या कंपन्यांना समस्या निर्माण होऊ शकतात. यासोबतच, राज्यात कोरोना बाधितांची संख्या अशीच वाढत राहिली तर सरकारला ऑक्सिजन मिळविणे देखील अशक्य होऊ शकते. राज्यात शेकडो रुग्णांना ऑक्सिजनची गरज भासत आहे. अनेक रुग्ण व्हेंटिलेटरवर आहेत. कोरोनाशिवायचे इतर आजारांचे रुग्णदेखील आहेतच. त्यामुळे या अशा परिस्थितीत नागरिकांनी नियमांचे पालन केले नाही, तर परिस्थिती हाताबाहेर जाण्याची शक्यता देखील वर्तवण्यात येत आहे.


Harshada Shinkarhttps://www.mymahanagar.com/author/sharshada/
गेल्या ५ वर्षांपासून प्रिंट आणि डिजिटल मीडिया क्षेत्राचा अनुभव. लाईफ स्टाईल, फॅशन, महिलांसंबधित विषयावर लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -