खासदार गोडसेंच्या घर, कार्यालयावर बंदोबस्त वाढवला

शिंदे गटात सामील होण्याच्या हालचालीमुळे खबरदारी

नाशिक : नाशिकचे खासदार हेमंत गोडसे यांच्या संपर्क कार्यालयावर शस्त्रधारी पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. गोडसे हे शिंदे गटासोबत जाणे हे निश्चित झाले आहे. त्यामुळे आमदारांनंतर नाशिकमधून शिवसेनेला हा दुसरा धक्का मानला जात आहे. त्यामुळे कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून नाशिक पोलिसांनी गोडसे यांच्या शहरातील संपर्क कार्यालयासह संसरी येथील निवासस्थानीही पोलिसांचा बंदोबस्त तैनात केला आहे.

लोकसभेत शिवसनेच्या १२ खासदारांनी वेगळा गट तयार केल्याची माहिती हेमंत गोडसे यांनी दिली. तसेच बंड करण्यामागील भुमिकाही त्यांनी सांगितली. आम्ही शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे विचार पुढे घेऊन चाललो आहोत. त्यामुळे शिवसेनेचा अ गट ब गट वगैरे काहीही नसून सर्व खासदारांनी एकत्र येऊन हा निर्णय घेतला असल्याचे त्यांनी सांगितले. आमचे गटनेते याआधी विनायक राऊत होते आता राहुल शेवाळे हे आमचे गटनेते असावेत, अशी विनंती आम्ही लोकसभा अध्यक्षांना केली आहे तसं पत्रही त्यांना दिले आहे. त्यावर लोकसभा अध्यक्षांचा निर्णय झाल्यावर पुढील निर्णय स्पष्ट करू असेही गोडसे यांनी सांगितले.दरम्यान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत रात्रीच्या जेवणासाठीही खासदार गोडसेंसह १२ खासदार उपस्थित होते. त्यामुळे आता आमदारांपाठोपाठ खासदारही फुटल्याने शिवसेनेला हा मोठा हादरा मानला जात आहे. यापूर्वी नाशिकचे आमदार सुहास कांदे आणि मालेगावचे आमदार दादा भुसे यांच्या बंडखोरीनंतर शिवसेनेच्यावतीने नाशिकमध्ये आंदोलन करण्यात आले होते. त्यामुळे दिल्लीतील राजकीय घडामोडींमुळे कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होउ नये याकरीता खासदार हेमंत गोडसे यांच्या नाशिक येथील जीपीओ जवळील संपर्क कार्यालय आणि संसरी येथील त्यांचे लक्ष्मी निवास या निवासस्थानी पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला आहे. त्याचप्रमाणे खासदारांच्या सुरक्षा व्यवस्थेतही वाढ करण्यात आली आहे.