शिंदे गटातील आमदार-खासदारांसह अमृता फडणवीसांच्या सुरक्षेत वाढ, राज्य सरकारचा मोठा निर्णय

राज ठाकरे, उद्धव ठाकरेंच्या पत्नी रश्मी ठाकरे, मुलगा तेजस ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांचे सुपूत्र खासदार श्रीकांत शिंदे यांच्या वाय प्लस दर्जाची सुरक्षा कायम ठेवण्यात आली आहे.

eknath shinde devendra fadanvis
eknath shinde devendra fadanvis

मुंबई – राज्यात एकीकडे महाविकास आघाडीच्या (Mahavikas Aghadi) नेत्यांची सुरक्षा कपात करण्यात आलेली असताना राज्य सरकारने आता शिंदे गटातील ५१ आमदार आणि खासदारांच्या सुरक्षेत वाढ (Security Increases) केली आहे. एवढंच नव्हे तर, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस (Amruta Fadnavis) यांच्याही सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे.

हेही वाचा -मिलिंद नार्वेकरांच्या सुरक्षेत वाढ, आव्हाड वगळता अनेक माविआ नेत्यांच्या सुरक्षेत कपात

शिवसेनेतून शिंदे गटात गेलेल्या सर्व ४१ आमदारांच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे. तर, १० खासदारांची सुरक्षा वाढवण्यात आली आहे. तसंच, अमृता फडणवीस यांच्याही सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे. त्यांना आधी वाय प्लस दर्जाची सुरक्षा होती, परंतु आता त्यांना एक्स दर्जाची सुरक्षा मिळणार आहे. एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस आणि राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना दिलेली झेड प्लस दर्जाची सुरक्षा कायम ठेवण्यात आली आहे. तर, राज ठाकरे, उद्धव ठाकरेंच्या पत्नी रश्मी ठाकरे, मुलगा तेजस ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांचे सुपूत्र खासदार श्रीकांत शिंदे यांच्या वाय प्लस दर्जाची सुरक्षा कायम ठेवण्यात आली आहे.

हेही वाचा – ‘कुठलीही चौकशी सुडबुद्धीने, आकसापोटी…’; कॅगसंदर्भात मुख्यमंत्री शिंदेंचे स्पष्टीकरण

काही दिवसांपूर्वी मविआतील नेत्यांच्या सुरक्षेत कपात करण्यात आली होती. छगन भुजबळ, बाळासाहेब थोरात, नितीन राऊत, नाना पटोले, जयंत पाटील, सतेज पाटील, संजय राऊत, विजय वडेट्टीवार, धनंजय मुंडे, भास्कर जाधव, नवाब मलिक, विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवळ, सुनील केदार, खासदार डेलकर परिवार, वरुण सरदेसाई यांची सुरक्षा कमी करण्यात आली आहे. तर, काँग्रेसचे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण, पृथ्वीराज चव्हाण, उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे आणि शरद पवार यांची सुरक्षा कायम ठेवण्यात आली आहे.