घरमहाराष्ट्रअकरावीच्या दुसर्‍या फेरीत ६९ हजार विद्यार्थ्यांची निवड

अकरावीच्या दुसर्‍या फेरीत ६९ हजार विद्यार्थ्यांची निवड

Subscribe

अद्यापही १ लाख विद्यार्थी प्रवेशापासून लांब

अकारावी प्रवेशाची दुसरी यादी शुक्रवारी सकाळी जाहीर झाली. त्यानुसार १ लाख ६२ हजार ५०७ विद्यार्थ्यांपैकी केवळ ६९ हजार ६९१ विद्यार्थ्यांना दुसर्‍या यादीमध्ये प्रवेशाची संधी मिळाली आहे, तर तब्बल १ लाख विद्यार्थी अद्यापही प्रवेशापासून लांब आहेत. पहिल्या यादीच्या तुलनेत दुसर्‍या यादीत नामवंत महाविद्यालयांच्या कटऑफमध्ये किंचितच फरक झाला असून १ ते २ टक्क्यांनी कटऑफमध्ये घसरण झाली आहे.

सलग सुट्ट्या येत असल्याने अकरावी प्रवेशाच्या दुसर्‍या यादीबाबत पालक व विद्यार्थ्यांमध्ये संभ्रमाचे वातावरण पसरले होते, मात्र शिक्षण उपसंचालक कार्यालयाकडून शुक्रवारी प्रवेशाची दुसरी यादी जाहीर करण्यात आली. या यादीमध्ये पहिल्या यादीत प्रवेश मिळूनही न घेतलेले, नव्याने प्रवेश घेतलेले अशा १ लाख ६२ हजार ५०७ विद्यार्थ्यांचा समावेश करण्यात आला होता. त्यापैकी ६९ हजार ६९१ विद्यार्थ्यांची प्रवेशासाठी निवड झाली. प्रत्येक फेरीसाठी नव्याने पसंतीक्रम देण्याची मुभा विद्यार्थ्यांना असल्याने विद्यार्थ्यांनी फारसे पसंतीक्रम बदलले नाहीत.

- Advertisement -

त्यामुळे नामवंत महाविद्यालयांची निवड केल्याने अनेक विद्यार्थी या यादीतही प्रवेशापासून लांब राहिले आहेत. महाविद्यालयांच्या कटऑफमध्ये मोठा फरक पडलेला नसून काही महाविद्यालयाचे कटऑफ पहिल्या यादीपेक्षा घसरले आहेत. दुसर्‍या यादीमध्ये वाणिज्य शाखेसाठी ४२ हजार ६८९ विद्यार्थ्यांची निवड झाली आहे, तर त्याखालोखाल विज्ञान २१ हजार २७८ आणि कला शाखेसाठी ५४६९ विद्यार्थ्यांची निवड झाली आहे. दुसर्‍या यादीमध्ये १५ हजार १२१ विद्यार्थ्यांना पहिल्या क्रमाचे पसंतीचे महाविद्यालय मिळाले आहे.

विद्यार्थ्यांनी कोणत्याही कोट्यातून (इन-हाऊस, अल्पसंख्याक, व्यवस्थापन व केंद्रीय प्रवेश प्रक्रियेतून) प्रवेश निश्चित केल्यास प्रवेशित झालेले सर्व विद्यार्थी यापुढील होणार्‍या तिसर्‍या फेरीसाठी (विशेष फेरीपर्यंत) प्रतिबंधित केले जातील. विद्यार्थ्यांच्या पहिल्या पसंतीक्रमाचे कनिष्ठ महाविद्यालय अलॉट झाल्यास विद्यार्थ्याला संबंधित कनिष्ठ महाविद्यालयात विहित कालावधीत आपला प्रवेश निश्चित करून घेणे बंधनकारक आहे. जर पहिला पसंतीक्रम मिळालेल्या विद्यार्थ्याने प्रवेश न घेतल्यास असे विद्यार्थी यापुढील होणार्‍या तिसर्‍या प्रवेश फेरीसाठी (विशेष फेरीपर्यंत) प्रतिबंधित केले जातील. त्यांना विशेष फेरीमध्ये सहभागी करण्यात येईल.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -