सेनेचा द्रौपदी मुर्मू यांना राष्ट्रपतीपदासाठी पाठिंबा

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची घोषणा

एक आदिवासी महिला देशाच्या सर्वोच्चपदी विराजमान होणार असल्याने राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत द्रौपदी मुर्मू यांना पाठिंबा देण्यात येत असल्याची घोषणा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मंगळवारी येथे केली. भाजपच्या उमेदवार म्हणून आम्ही मुर्मू यांना पाठिंबा दिलेला नाही, असा खुलासाही त्यांनी केला. शिवसेनेच्या पाठिंब्यामुळे राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत भाजपचे पारडे जड झाले आहे.

येत्या १८ जुलै रोजी राष्ट्रपतीपदासाठी निवडणूक होत आहे. भाजपने या निवडणुकीत माजी राज्यपाल द्रौपदी मुर्मू यांना उमेदवारी दिली आहे. भाजपच्या पाठबळामुळे शिवसेनेत मोठी फूट पडलेली असताना शिवसेनेच्या खासदारांकडून मुर्मू यांना पाठिंबा देण्यासाठी ठाकरे यांच्यावर दबाव वाढला होता. मुंबईचे खासदार राहुल शेवाळे यांच्या पाठोपाठ पालघरचे खासदार राजेंद्र गावित यांनी मुर्मू यांना समर्थन देण्याची मागणी केली होती. कालच्या शिवसेना खासदारांच्या बैठकीत राष्ट्रपती निवडणुकीतील पाठिंब्यावरून शिवसेनेत दोन गट पडले होते. शिवाय भाजप उमेदवारासाठी खासदारांचा ठाकरे यांच्यावर दबाव वाढला होता.

या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत मुर्मू यांना पाठिंबा देण्याची घोषणा केली. राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत शिवसेना महाविकास आघाडीला बाजूला ठेवून भाजपप्रणित एनडीएच्या उमेदवाराला पाठिंबा देत आहे. आदिवासी समाजातील शिवसैनिकांनी विनंती केल्यानंतर आपण द्रौपदी मुर्मू यांना आपण पाठिंबा जाहीर करत असल्याचे उद्धव ठाकरे यांनी सांगितले. पक्षाच्या खासदारांच्या बैठकीत माझ्यावर कोणीही दबाव आणला नाही, मात्र कुणाला पाठिंबा द्यायचा हा निर्णय माझ्यावर सोपवला होता, असेही ठाकरे यांनी स्पष्ट केले.

आदिवासी समाजात काम करणार्‍या शिवसैनिकांनी विनंती केली की पहिल्यांदा आदिवासी समाजातील व्यक्तीला राष्ट्रपती बनण्याची संधी मिळत आहे. त्यामुळे आपण पाठिंबा दिला तर आम्हाला आनंद होईल. या सगळ्यांचा मान ठेवून शिवसेना द्रौपदी मुर्मू यांना पाठिंबा देत आहे, असे उद्धव ठाकरे यांनी सांगितले. खरेतर सध्याच्या राजकीय परिस्थितीत मी विरोध करायला हवा होता, पण शिवसेनेने राष्ट्रपतीपदासाठी कधीच कोत्या मनाने विचार केला नाही. प्रतिभाताई पाटील यांना देखील शिवसेनाप्रमुखांनी पक्षाच्या पलीकडे जाऊन पाठिंबा दिला होता. प्रणव मुखर्जींनाही पाठिंबा दिला होता. त्यालाच अनुसरून मी हा निर्णय घेत आहे, असे ठाकरे म्हणाले.

दरम्यान , शिवसेनेकडून मुर्मू याना देण्यात आलेला पाठिंबा पाहता शिंदे गट आणि शिवसेनेत निर्माण झालेली दरी दूर करण्याचे हे पहिले पाऊल मानले जात आहे. उद्या, गुरुवारी मुर्मू मुंबईत येत आहेत. त्यावेळी त्या उध्दव ठाकरे यांची भेट घेण्याची शक्यता आहे.

शिवसेनेची भूमिका अनाकलनीय- बाळासाहेब थोरात
राष्ट्रपती पदाची निवडणूक ही वैचारिक लढाई आहे. स्त्री, पुरुष किंवा आदिवासी, बिगर आदिवासी अशी ही लढाई नाही. या वैचारिक लढाईत गैर लोकशाही मार्गाचा अवलंब करून राज्यातील सरकार पाडले गेले, शिवसेनेच्या अस्तित्वाला आव्हान दिले गेले, अशा परिस्थितीत शिवसेनेने घेतलेली भूमिका अनाकलनीय आहे.शिवसेना मविआत आहे, पण हा निर्णय घेताना त्यांनी आमच्याशी काहीही चर्चा केलेली नाही.