घरताज्या घडामोडीज्येष्ठ पत्रकार जगतराव सोनवणे यांचे निधन

ज्येष्ठ पत्रकार जगतराव सोनवणे यांचे निधन

Subscribe

सोनवणे यांनी धुळे जिल्हा परिषदेतील कोट्यवधी रुपयांचा भास्कर वाघ अपहार घोटाळा खणून काढला होता.

धुळ्यातील दैनिक ‘मतदार’चे संस्थापक-संपादक जगतराव सोनवणे यांचे गुरुवारी अल्पशा आजाराने धुळ्यातील निवासस्थानी निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, दोन मुली, सून आणि नातवंडे असा परिवार आहे. सोनवणे यांनी धुळे जिल्हा परिषदेतील कोट्यवधी रुपयांचा भास्कर वाघ अपहार घोटाळा खणून काढला होता. त्यासाठी त्यांना पा. वा. गाडगीळ पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले होते. व्यासंगी, साक्षेपी पत्रकार, अधिकारी आणि कर्मचारी मार्गदर्शक, सेवा शर्तीविषयी गाजलेली पुस्तके लिहिणारे, सोनदिपा पब्लिशर्सचे सर्वेसर्वा, कायद्याचे अभ्यासक अशी सोनवणे यांची ओळख होती.

जिल्हा परिषदेतील नोकरी सोडून जगतराव सोनवणे यांनी ‘मतदार’ हे सर्वसामान्य जनता, शेतकरी आणि वंचित समाजासाठी वाहिलेले वृत्तपत्र सुरू केले. जिल्हा परिषद कर्मचारी संघटनेचे राज्य अध्यक्ष म्हणून काम पाहताना प्रशासकीय पातळीवर अधिकारी आणि कर्मचारी यांना येणाऱ्या दैनंदिन अडचणी लक्षात घेऊन त्यांनी सोनादिपा प्रकाशनाची स्थापना केली. या माध्यमातून त्यांनी कर्मचारी आणि अधिकारी मार्गदर्शक ही अत्यंत गाजलेली पुस्तके निर्मित केली. राज्यातील प्रत्येक अधिकारी, कर्मचारी, आस्थापना व न्याय संस्थेत ही पुस्तके संदर्भासाठी आजही वापरली जातात.

- Advertisement -

भास्कर वाघ प्रकरणात त्यांना गुंड आणि राजकीय नेत्यांनी अतोनात त्रास दिला. मात्र, त्यांनी घोटाळा खणून काढण्याचे काम सुरुच ठेवले. अखेर त्यांना आणि कुटुंबाला झेड दर्जाची सुरक्षा व्यवस्था पुरविण्यात आली. त्यांनी खणून काढलेल्या या अपहार घोटाळ्याने तेव्हा सर्व देशाचे लक्ष वेधून घेतले होते. महाराष्ट्रातील हा पहिला कोट्यवधीचा घोटाळा होता. हे प्रकरण उघडकीस आल्यावर जिल्हा परिषदेच्या कारभारात अनेक बदल करण्यात आले.

गेले काही दिवस देशातील परिस्थिती आणि शेतकरी आंदोलन चिरडण्याच्या सरकारी प्रयत्नांनी सोनवणे अस्वस्थ होते. प्रकृती साथ देत नसतानाही ते कापडणे येथे शेतकरी आंदोलनात सहभागी झाले होते. पुरोगामी विचारांची बैठक पक्की असलेल्या सोनवणे यांनी आयुष्यभर व्रतस्थ पत्रकारिता केली. सेवा शर्ती, तसेच कायदेशीर बाबींबाबत ते शेवटपर्यंत सर्वसामान्यांना मोफत मार्गदर्शन करत होते. धुळे जिल्ह्यातील काटवन परिसर विकासासह अनेक महत्त्वाच्या सामाजिक विषयात त्यांनी सक्रिय योगदान दिले होते.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -