घरमहाराष्ट्रSudhir Joshi Death : शिवसेनेचे ज्येष्ठ नेते सुधीर जोशींचं निधन

Sudhir Joshi Death : शिवसेनेचे ज्येष्ठ नेते सुधीर जोशींचं निधन

Subscribe

कोरोनातून बरे होऊन सुधीर जोशी परत घरी परतले होते. अखेर आज त्यांची प्राणज्योत मालवलीय. त्यांनी मुंबईचे महापौरपद आणि महाराष्ट्राचे कॅबिनेटपदही भूषवलं होतं. 1999 साली त्यांनी आजारपणामुळे सक्रिय राजकारणातून निवृत्ती घेतली होती. त्यांचा जन्म 25 मे 1950 रोजी मुंबईमध्ये झाला, त्यांचे संपूर्ण जीवन हे मुंबईमध्येच गेले. 

मुंबईः शिवसेनेचे ज्येष्ठ नेते सुधीर जोशी यांचं निधन झालंय. वयाच्या 81 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतलाय. विशेष म्हणजे गेल्या काही दिवसांपासून त्यांची प्रकृती ठीक नव्हती. त्यांना कोरोनाची लागण झाली होती, त्यानंतर मुंबईतल्या जसलोक रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते. कोरोनातून बरे होऊन सुधीर जोशी परत घरी परतले होते. अखेर आज त्यांची प्राणज्योत मालवलीय. मुंबईतील पारिजात या त्यांच्या निवासस्थानी त्यांचं पार्थिव अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात येणार असून, शिवाजी पार्क स्मशानभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार होणार आहेत.

शिवसेनेच्या स्थापनेपासून बाळासाहेबांसोबत शिवसेना नेते म्हणून त्यांनी काम पाहिलं होतं. 1972 मध्ये ते मुंबईचे महापौर झाले होते. पुढे पदवीधर मतदारसंघाचे पहिले आमदार, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते आणि युतीच्या काळात शिक्षणमंत्री म्हणून त्यांनी काम पाहिले आहे. खरं तर सुधीर जोशी हे शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे अत्यंत जवळचे आणि विश्वासू सहकारी होते. शिवसेना पक्ष संघटनेत त्यांची महत्त्वाची भूमिका राहिलीय.

- Advertisement -


शिवसेनाप्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांच्याकडून शिवसेनेच्या स्थापनेनंतर माधव देशपांडे, शाम देशमुख, बळवंत मंत्री हे प्रमुख नेते शिवसेनेत आले. त्यानंतरच्या काळात मनोहर जोशी आणि सुधीर जोशी या दोघांनी शिवसेना वाढवण्यासाठी बाळासाहेबांसोबत मोठं काम केलंय. त्यांनी मुंबईचे महापौरपद आणि महाराष्ट्राचे कॅबिनेटपदही भूषवलं होतं. 1999 साली त्यांनी आजारपणामुळे सक्रिय राजकारणातून निवृत्ती घेतली होती. त्यांचा जन्म 25 मे 1950 रोजी मुंबईमध्ये झाला, त्यांचे संपूर्ण जीवन हे मुंबईमध्येच गेले.

- Advertisement -

‘संस्कृत आणि सुशिक्षित कार्यकर्त्यांचे मोहोळ लाभलेला’ आणि लोभस व्यक्तिमत्त्व असलेला एकमेव शिवसेना नेता म्हणजे सुधीरभाऊ जोशी आहेत. मुंबईचे माजी महापौर तरुण आणि तडफदार सुधीर जोशी यांच्याकडे सुशिक्षित कार्यकर्त्यांची फौज असलेल्या स्थानीय लोकाधिकार समितीची धुरा बाळासाहेब ठाकरेंनी सोपविली, ती त्यांनी समर्थपणे सांभाळली आणि बाळासाहेबांनी त्यांच्यावर टाकलेला विश्वास त्यांनी सार्थ ठरविला. बाळासाहेबांच्या सहकारी नेत्यांतील एक विश्वासू सहकारी नेता म्हणून ते बाळासाहेबांचे जवळचे सहकारी राहिलेत. सुधीर जोशी हे 1968 साली प्रथम नगरसेवक झाले. मुंबई महानगरपालिका गटनेता, विरोधी पक्षनेता म्हणून ते राहिले. 1973 मध्ये मुंबई महानगरपालिकेचे महापौर झाले तेव्हा ते सर्वांत तरुण महापौर होते. 1968 पासून ते विधान परिषद सदस्य होते. 1992-93 या दरम्यान ते विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते होते. तेव्हा त्यांनी राज्यातील रखडलेल्या सिंचन प्रकल्पाची पाहणी करून त्यासंदर्भात अहवाल निष्कर्ष पुस्तिकेद्वारे शासनाकडे सादर केला. शिवशाही सरकारात ते जून 1995 ते मे 1996 या कालखंडात प्रथम महसूलमंत्री होते. नंतर 1996 ते 1999 पर्यंत शिक्षणमंत्री म्हणून कार्यरत होते. मंत्री म्हणून त्यांनी घेतलेले निर्णय लोकाभिमुख ठरले आहेत.

स्वतःच्या नेतृत्वाचे उसने अवसान न आणता त्यांनी लोकाधिकार चळवळीला बळ दिले आणि या चळवळीने जे बळ धरले आणि यश प्राप्त केले, त्यात सुधीर जोशींचा सिंहाचा वाटा आहे. संगीत, क्रिकेट आणि समाजसेवा यांचा त्रिवेणी संगम सुधीरभाऊंच्या जीवनात पाहायला मिळतो. ते त्यांच्या ‘आपुलकी’ या मोठ्या गुणामुळे गुणिजनांत आणि समाजात अतिशय आपलेसे झालेत. त्यामुळेच स्थानीय लोकाधिकार समिती म्हणजेच सुधीर जोशी हे समीकरण पक्के आणि वृद्धिंगत झाले. सुधीर जोशींनी जे सामाजिक आणि राजकीय पद भूषविले, त्याला न्याय दिला आहे. त्यांनी अनेक पदे भूषवली आहेत.

>> अध्यक्ष- शिवसेना ग्राहक संरक्षण कक्ष, अध्यक्ष / विश्वस्त – साने गुरुजी विद्यालय, दादर सार्वजनिक वाचनालय, कार्यकारी समिती सदस्य – गरवारे क्लब, सल्लागार-जसलोक रुग्णालय कर्मचारी संघटना, विश्वस्त-जाणीव प्रतिष्ठान, विश्वस्त-शिवाई सेवा ट्रस्ट, अध्यक्ष-बँक ऑफ महाराष्ट्र कर्मचारी सेना, अध्यक्ष – इंडियन ओव्हरसीज बँक कर्मचारी सेना, अध्यक्ष-कॅनरा बँक कर्मचारी सेना, अध्यक्ष-महाराष्ट्र दूध वितरक सेना, अध्यक्ष-विमा कर्मचारी सेना.


हेही वाचाः हिंदुस्थानी भाऊला मुंबई सत्र न्यायालयाकडून जामीन मंजूर

Vaibhav Desai
Vaibhav Desaihttps://www.mymahanagar.com/author/vaibhavr/
गेल्या 14 वर्षांपासून पत्रकारितेत कार्यरत; प्रिंट मीडिया चार वर्षे अनुभव, डिजिटल माध्यमाचा साडेनऊ वर्षांचा अनुभव आहे. तसेच अर्थकारण विषयावर लिखाणाची आवड
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -