घरताज्या घडामोडीजेष्ठ तमाशा सम्राज्ञी कांताबाई सातारकर यांचे कोरोनाने निधन

जेष्ठ तमाशा सम्राज्ञी कांताबाई सातारकर यांचे कोरोनाने निधन

Subscribe

गेली काही दशके संगमनेरच्या सांस्कृतिक वारशाचा मानबिंदू राहिलेल्या ज्येष्ठ तमाशा सम्राज्ञी कांताबाई सातारकर(वय 82) यांचे मंगळवारी सायंकाळी निधन झाले. जन्मापासूनच प्रचंड खडतर आयुष्य वाट्याला आलेल्या कांताबाईंनी आपल्या जिद्दी स्वभावाच्या जोरावर अनेक संकटांवर मात करत आपल्या तमाशा फडाचे नाव राज्यभर गाजविले. राज्य शासनाच्या विठाबाई नारायणगावकर जीवन गौरव पुरस्कारासह इतरही अनेक नामवंत पुरस्कार त्यांना मिळाले होते. 1939 साली जन्मलेल्या कांताबाई सातारकर यांनी वयाच्या 9 व्या वर्षी सातारा येथील नवझंकार मेळ्यातून रंगमंचावर पाऊल ठेवले होते. कौटुंबिक परिस्थिती बेतास बेत असताना स्वतः कष्ट करण्याशिवाय पर्याय नाही, हे ओळखून तमाशा हाच आपले ध्येय मानत त्यानंतर राज्यभरातल्या छोट्या-मोठ्या तमाशा मंडळात त्यांनी आपल्या तमाशा कारकिर्दीचा प्रारंभ केला.

त्यावेळी महाराष्ट्रात तुकाराम खेडकर तमाशा मंडळाचे नाव गाजत होते. सहाजिकच 1953 मध्ये कांताबाई तुकाराम खेडकर यांच्या तमाशा फडात दाखल झाल्या. पुढच्याच वर्षी म्हणजे 1954 साली त्यांनी तुकाराम खेडकर यांच्याशी विवाह देखील केला. तुकाराम खेडकर यांच्या तमाशा फडात त्यांनी 50 हून अधिक सामाजिक, राजकीय, धार्मिक, ऐतिहासिक वगामधून त्यांनी प्रमुख भूमिका साकारली.

- Advertisement -

खेडकर यांच्या निधनानंतर कांताबाईवर पुन्हा उपासमारीची वेळ येऊन ठेपली. त्यावरही मात करत न डगमगता आपला तरुण मुलगा रघुवीर खेडकर याला साथीला घेत त्यांनी ‘कांताबाई सातारकर सह रघुवीर खेडकर लोकनाट्य तमाशा मंडळ’ हा तमाशा फड उभा केला. गेली अनेक दशकं महाराष्ट्राच्या गावागावात हा तमाशा फड राज्यातील एक लोकप्रिय तमाशा म्हणून लौकिकास आला. रायगडची राणी या वगनाट्यतील ‘सोयराबाई’ आणि डोम्या नाग या वगनाट्यतील ‘बायजा’ या त्यांच्या भूमिका उभ्या महाराष्ट्राने डोक्यावर घेतल्या. वृद्धापकाळामुळे गेल्या काही वर्षांपासून त्यांनी अभिनय करणे बंद केले होते. परंतु राज्याच्या दौर्‍यावर फड जात असताना त्या स्वतः दौऱ्यात सहभागी होत असत. संपूर्ण फडात त्यांचा आदरयुक्त दरारा असे. गेल्या काही दिवसांपासून त्या आजारी होत्या, त्यातच त्यांना कोरोनाची ही लागण झाली होती. त्यांच्या पश्चात तमाशा सम्राट रघुवीर खेडकर, अलका, अनिता आणि मंदा यांच्यासह जावई , नातवंडे असा मोठा परिवार आहे.


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -