प्रसिद्धीकरता सनसनाटी आरोप करणे सुरू आहे, ठाकरे गटाचा देशपांडेंवर पलटवार

Thackeray Group Reaction on Deshpande Attack | ठाकरे गटाकडूनही आता त्यांच्यावर पलटवार करण्यात आलाय. प्रसिद्धी मिळवण्याकरता अशी सनसनाटी वाक्य केली जात असल्याचं प्रत्युत्तर शिवसेनेकडून देण्यात आलंय.

varun sardesai and sachir

Thackeray Group Reaction on Deshpande Attack | मुंबई – महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सरचिटणीस संदीप देशपांडे यांच्यावर शुक्रवारी सकाळी प्राणघातक हल्ला झाला. याप्रकरणी त्यांनी ठाकरे गटाकडे अंगुलनिर्देश केले आहे. जबाबात त्यांनी वरुण सरदेसाई आणि आदित्य ठाकरे यांची नावे घेतली आहे. यावरून ठाकरे गटाकडूनही आता त्यांच्यावर पलटवार करण्यात आलाय. प्रसिद्धी मिळवण्याकरता अशी सनसनाटी वाक्य केली जात असल्याचं प्रत्युत्तर शिवसेनेकडून देण्यात आलंय.

एका मराठी वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत ठाकरे गटाचे उपनेते सचिन अहिर यांनी संदीप देशपांडे यांच्यावर टीकास्त्र डागलं. ते म्हणाले की, पोलिसांनी याप्रकरणी लवकरात लवकर तपास करून दूध का दूध, पाणी का पाणी करावं. पण काही व्यक्तींची नाव घेऊन आरोप करणं, सनसनाटी निर्माण करणं उचित नाह. संशयित आरोपी भांडूपमधील आहेत म्हणून भांडुप कनेक्शन जोडणं योग्य नाही. आरोपी जर नागपुरात सापडला तर तुम्ही नागपूर कनेक्शन जोडणार आहात का? देशपांडेंवर झालेल्या हल्ल्यामुळे राज्यात कायदा-सुव्यवस्था आहे की नाही, असा सवालही त्यांनी यावेळी उपस्थित केला.

हेही वाचा – बाळा कदमांच्या अटकेनंतर ४८ तासांत माझ्यावर हल्ला, संदीप देशपांडेंनी सांगितली क्रोनोलॉजी

तर, वरुण सरदेसाई यांनीही निव्वळ प्रसिद्धीसाठी आरोप केले जात असल्याचं म्हटलं आहे. आपल्या देशात बोलण्याचं स्वातंत्र्य आहे. कोण काय बोलतं, याकडे एवढं गांभीर्याने बघायला कोणी एवढं मोठं नाही. त्यामुळे आम्ही अशा चिल्लर लोकांना महत्त्व देत नाही, संही वरुण सरदेसाई म्हणाले.

संदीप देशपांडेंनी काय केले आरोप?

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सरचिटणीस संदीप देशपांडे यांच्यावर काल, शुक्रवारी सकाळी शिवाजी पार्कात हल्ला झाला. याप्रकरणी तक्रार दाखल करताना संदीप देशपांडे यांनी वरुण सरदेसाई आणि आदित्य ठाकरे यांचं नाव जबाबात नोंदवलं आहे. आज पत्रकार परिषद घेऊन त्यांनी मोठा घोटाळा उघडकीस आणला आहे. हा घोटाळा बाहेर येऊ नये म्हणूनच माझ्यावर हल्ला झाला असावा, असा संशय संदीप देशपांडे यांनी व्यक्त केला आहे.

हेही वाचा  ताब्यात घेतलेल्या संशयितांकडून गुन्ह्याची कबुली, हल्ल्यामागचं कारणही सांगितलं!

कोविड काळात मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाला असल्याचं सांगत फर्निचर घोटाळा झाला असल्याचंही संदीप देशपांडे यांनी आज सांगितलं. याबाबत आपण मुंबई महापालिका आयुक्त इक्बाल सिंग चहल यांचीही भेट घेतली होती. याप्रकरणाचा सुगावा लागला असेल म्हणून माझ्यावर हल्ला झाला असेल, असं संदीप देशपांडे म्हणाले. तसंच, कोविड काळातील भ्रष्टाचारप्रकरणी इकोनॉमिक्स अफेअर्स विंगने बाळा कदम यांना अटक केली, त्यानंतर ४८ तासांनी माझ्यावर हल्ला झाला, असंही संदीप देशपांडे म्हणाले.