घरताज्या घडामोडीएनसीबीने कोर्‍या कागदावर माझ्या सह्या घेतल्या, एनसीबीच्या पंचाचा गंभीर आरोप

एनसीबीने कोर्‍या कागदावर माझ्या सह्या घेतल्या, एनसीबीच्या पंचाचा गंभीर आरोप

Subscribe

क्रूझ रेव्ह पार्टी प्रकरणात कोर्‍या कागदावर एनसीबीने माझ्या सह्या घेतल्याचा गंभीर आरोप क्रूझ रेव्ह पार्टी प्रकरणातील एका पंचाने केला आहे. तसेच आर्यन खानला या प्रकरणातून बाहेर काढण्यासाठी २५ कोटी रुपयांची डील होणार होती. त्यापैकी ८ कोटी एनसीबीचे मुंबई संचालक समीर वानखेडे यांना देण्यात येणार होते, असा गौप्यस्फोट प्रभाकर साईल या पंचाने केला आहे. मात्र, समीर वानखेडे यांनी हे सर्व आरोप फेटाळून लावले असून पंचाला जे काय सांगायचे असेल ते सोशल मीडियावर न सांगता कोर्टात सांगावे, असे एनसीबीचे डीआयजी मुठा जैन यांनी म्हटले आहे.

एनसीबीने क्रूझ रेव्ह पार्टी प्रकरणी गुन्हा दाखल करून बॉलिवूड सुपरस्टार शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानसह ८ जणांना अटक केली आहे. दरम्यान, या गुन्ह्यात एनसीबीने ९ पंच, स्वतंत्र साक्षीदार यांची साक्ष नोंदवून पंचनामा पूर्ण केला होता. या ९ पंचांपैकी एक पंच हा किरण गोसावी याचा अंगरक्षक प्रभाकर साईल हा आहे. प्रभाकर साईल याचा एक व्हिडिओ आणि त्याने तयार केलेले प्रतिज्ञापत्राची प्रत सोशल मीडियावर व्हायरल झाली.

- Advertisement -

व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये प्रभाकर साईल या पंचाने एनसीबीच्या विरोधात गौप्यस्फोट केला. एनसीबीने आमची साक्ष नोंदवून घेण्यापूर्वी कोर्‍या कागदावर माझ्या सह्या घेतल्या होत्या, असा आरोप करून त्याने घटनेच्या दिवसापासून काय घडले हे सर्व व्हिडिओच्या माध्यमातून उघड केले आहे. तसेच आर्यन खान याला ताब्यात घेतल्यानंतर त्याला बाहेर काढण्यासाठी किरण गोसावी याने २५ कोटी रुपयांची डील करायची ठरवली होती. त्यानंतर ही डील १८ कोटींवर करण्यात आली. त्यापैकी ८ कोटी एनसीबीचे संचालक समीर वानखेडे यांना देण्याचे ठरले होते. उर्वरित रक्कम किरण गोसावी आणि इतरांमध्ये वाटली जाणार होती, असा आरोप प्रभाकर साईल याने केला आहे.

या प्रकरणी शाहरुख खान याची मॅनेजर हिची देखील किरण गोसावी याने मर्सिडीझ गाडीत भेट घेतली होती,असे त्याने व्हिडिओ मध्ये म्हटले आहे. किरण गोसावी हा मागील काही दिवसांपासून बेपत्ता असून त्याचे काही बरेवाईट झाले का? असा संशय येत आहे. माझ्या आणि कुटुंबाच्या जीवाला धोका असल्याचे प्रभाकर साईल याने म्हटले आहे. प्रभाकर साईल याने एक प्रतिज्ञापत्र तयार केले असून त्यात देखील सर्व घटना नमूद केली आहे. व्हिडिओमध्ये केलेला आरोप प्रतिज्ञापत्रामध्ये लेखी स्वरूपात मांडला आहे.

- Advertisement -

प्रभाकर साईल या पंचाच्या आरोपामुळे एकच खळबळ उडाली आहे. एनसीबीचे मुंबई विभागाचे संचालक समीर वानखेडे यांनी हे आरोप फेटाळून लावले आहेत. तसेच एनसीबीचे डीआयजी मुठा आनंद जैन यांच्याकडून या संदर्भात स्पष्टीकरण आले आहे. हे प्रकरण न्यायप्रविष्ट आहे. पंच असलेल्या प्रभाकर साईल यांना जे काही सांगायचे आहे ते कोर्टासमोर येऊन सांगावे, सोशल मीडियातून आपले म्हणणे मांडू नये, असे मुठा जैन यांनी म्हटले आहे. प्रभाकर साईल यांचे प्रतिज्ञापत्र एनसीबीच्या डिजीना (महासंचालक)देण्यात आले आहे. यावर योग्य ती कारवाई करण्याची विनंती करण्यात आली असल्याचे जैन यांनी म्हटले आहे.

दरम्यान, या व्हिडिओमुळे राज्यातील राजकारण पुन्हा एकदा ढवळून निघाले असून राजकीय पक्षांनी यांच्यावर आपापली प्रतिक्रिया देण्यास सुरुवात केली आहे. शिवसेनेचे नेते यांनी हा गंभीर प्रकार असून मुंबई पोलिसांनी याप्रकरणी तपास करावा असे म्हटले आहे. तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते नवाब मलिक यांनी या प्रकरणी राज्य सरकारने एसआयटी नेमून तपास करावा, अशी मागणी केली आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -