घरमहाराष्ट्रजूनपासून प्रत्येक महिन्याला कोविशिल्डच्या दीड कोटी मात्रा

जूनपासून प्रत्येक महिन्याला कोविशिल्डच्या दीड कोटी मात्रा

Subscribe

राज्य मंत्रिमंडळ बैठकीत माहिती,स्पुटनिकचा दर केंद्र ठरवणार

राज्यात मोठ्या प्रमाणात कोरोनाचा संसर्ग होत असताना एक दिलासादायक बातमी पुढे आली आहे. पुण्यातील सीरम इन्स्टिट्यूटने महाराष्ट्राला प्रत्येक महिन्याला कोविशिल्ड लसीच्या दीड कोटी मात्रा देण्याचे मान्य केले आहे. त्यानुसार येत्या जून महिन्यापासून कोविशिल्डचा पुरवठा सुरू होणार असल्याची माहिती बुधवारी राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत देण्यात आली.सार्वजनिक आरोग्य विभागाच्यावतीने बुधवारी मंत्रिमंडळाला कोरोनाची सद्यस्थिती, रुग्णसंख्या आणि लसीकरण यासंदर्भात सादरीकरण करण्यात आले. त्यावेळी सीरमकडून पुढील महिन्यापासून कोविशिल्डच्या दीड कोटी मात्रा मिळणार असल्याची माहिती देण्यात आली.

रशियाने विकसित केलेली स्पुटनिक ही कोरोना प्रतिबंधित लस विकत घेण्याची तयारी राज्य सरकारने ठेवली असली तरीही या लसीच्या दराबाबत केंद्र सरकार चर्चा करून निर्णय घेणार आहे. दर निश्चितीचा अधिकार राज्य सरकारला नाही. त्यामुळे स्पुटनिकचा दर ठरत नाही तोपर्यंत राज्याला ती लस खरेदी करता येणार नाही, असे सादरीकरणावेळी स्पष्ट करण्यात आले.

- Advertisement -

राज्यात लसींचा तुटवडा आहे. लसींचा पुरवठा होत नसल्याने अनेक ठिकाणी लसीकरण केंद्र बंद आहेत. या पार्श्वभूमीवर सादरीकरण दरम्यान चर्चा झाली. त्यावेळी महिनाभरात लसींचा तुटवडा दूर होणार असल्याचे आरोग्य विभागाकडून सांगण्यात आले. तर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या प्रयत्नांमुळे महाराष्ट्राला कोविशिल्डच्या मात्रा मिळणार आहेत. प्रत्येक महिन्यात दीड कोटी मात्रा मिळाल्या तर पुढील सहा ते आठ महिन्यात राज्यातील लसीकरण पूर्ण होईल, असा विश्वास राष्ट्रवादीच्या एका ज्येष्ठ मंत्र्याने व्यक्त केला.

पत्रकारांना फ्रंटलाईन वर्कर म्हणून घोषित करा
अन्य राज्यांप्रमाणे माध्यमांमध्ये काम करणार्‍या पत्रकारांना फ्रंटलाईन वर्कर म्हणून घोषित करण्यात यावे, अशी मागणी महसूलमंत्री बाळासाहेब थोरात आणि ऊर्जा मंत्री नितीन राऊत यांनी मंत्रिमंडळ बैठकीत केल्याचे समजते.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -