घरमहाराष्ट्रबोरिवली केंद्रावर सीईटीदरम्यान सर्व्हर डाऊन

बोरिवली केंद्रावर सीईटीदरम्यान सर्व्हर डाऊन

Subscribe

१०३ विद्यार्थ्यांची पुन्हा होणार परीक्षा

अभियांत्रिकी प्रवेशासाठी महत्त्वपूर्ण असलेली एमएचटी सीईटीच्या पीसीएम ग्रुपची परीक्षा सध्या राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षाकडून (सीईटी सेल) घेण्यात येत आहे. गुरुवारी परीक्षा सुरू असताना बोरिवलीच्या केंद्रावर अचानक सर्व्हर डाऊन झाले. त्यामुळे परीक्षेला उपस्थित असलेल्या १०३ विद्यार्थ्यांना परीक्षा देण्यात अडचणी निर्माण झाल्या, मात्र विद्यार्थ्यांची अडचण लक्षात घेऊन त्यांची परीक्षा पुन्हा घेण्यात येईल, असे आश्वासन सीईटी सेलकडून देण्यात आल्याने विद्यार्थ्यांना दिलासा मिळाला आहे.

५ ऑगस्टपासून राज्यात विविध केंद्रांवर दोन सत्रांमध्ये एमएचटी सीईटीची परीक्षा घेण्यात येत आहे. प्रत्येक सत्रामध्ये २५ हजार असे दोन सत्रांमध्ये ५० हजार विद्यार्थ्यांची परीक्षा घेण्यात येत आहे. त्यानुसार ५ ऑगस्टपासून दररोज एमएचटी सीईटीची परीक्षा सुरळीत घेण्यात येत होती, मात्र गुरुवारी रक्षाबंधनाच्या दिवशी सकाळी ९ ते ११ वाजेच्या सत्रामध्ये परीक्षा सुरू झाल्यानंतर बोरिवलीतील चोगले हायस्कूलमधील केंद्रावर अचानक तांत्रिक बिघाड होऊन सर्व्हर डाऊन झाला.

- Advertisement -

बोरिवलीतील या केंद्रावर १०३ विद्यार्थी उपस्थित होते. सर्व्हर डाऊन झाल्यानंतर सीईटी सेलकडून तातडीने उपाययोजना करण्यात आली, मात्र वेळेत बिघाड दुरूस्त न झाल्याने या सर्व विद्यार्थ्यांची परीक्षा पुन्हा घेण्यात येईल, असे आश्वासन त्यांना सीईटी सेलचे आयुक्त रवींद्र जगताप यांनी देत दिलासा दिला. दरम्यान, पहिल्या सत्रात झालेला तांत्रिक बिघाड दुरूस्त झाल्याने दुसर्‍या सत्रातील परीक्षा सुरळीत पार पडल्याचेही जगताप यांनी सांगितले.

सर्व्हर डाऊनमुळे ज्या विद्यार्थ्यांना परीक्षा देणे शक्य झाले नाही, अशा विद्यार्थ्यांची पुन्हा परीक्षा घेण्यात येईल. विद्यार्थ्यांनी कोणतीही चिंता करू नये. त्यांचे नुकसान होणार नाही याची काळजी सीईटी सेलकडून घेण्यात येईल. पनर्परीक्षेबाबत विद्यार्थ्यांना ई-मेल आणि एसएमएसद्वारे कळवण्यात येईल, अशी माहिती सीईटी सेलचे आयुक्त रवींद्र जगताप यांनी दिली.

- Advertisement -

पूरग्रस्त विद्यार्थ्यांनाही संधी
१० ऑगस्ट रोजी चंद्रपूर आणि गोंदिया या जिल्ह्यांमध्ये झालेल्या जोरदार पावसामुळे वाहतूक व्यवस्था पूर्णत: ठप्प झाली. त्यामुळे अनेक विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्रावर जाणे शक्य झाले नाही. परिणामी १०० पेक्षा अधिक विद्यार्थ्यांना परीक्षेला मुकावे लागले होते. या विद्यार्थ्यांचे नुकसान होऊ नये यासाठी पूरग्रस्त भागातील परीक्षेला मुकलेल्या विद्यार्थ्यांचीही पुन्हा परीक्षा घेण्यात येईल, असेही आयुक्त रवींद्र जगताप यांनी सांगितले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -