पुणे हादरलं! भीमा नदीत एकाच कुटुंबातील सात जणांची आत्महत्या

पुण्यातील दौंड तालुक्यातील पारगावमधील भीमा नदीत एकाच कुटुंबातील सात जणांचे मृतदेह आढळून आल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. या घटनेने संपूर्ण पुणे जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे. नदी पात्रात मिळालेले सर्व मृतदेह हे एकाच कुटुंबातील असून यामध्ये दोन पुरुष, दोन महिला आणि तीन लहान मुलांचा समावेश आहे. त्यामुळे ही आत्महत्या आहे की घातपात?, याचा तपास येथील पोलिसांकडून केला जात होता. मात्र, पोलीस चौकशीत मृत व्यक्तींनी आत्महत्या केल्याचे स्पष्ट झाले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, मोहन उत्तर पवार (वय, ५०) आणि संगीता मोहन पवार (वय, ४५) त्यांची मुलगी राणी शामराव फुलवरे (वय, २७ वर्ष) जावई शामराव पंडित फुलवरे आणि नातू मुले रितेश फुलवरे (वय,७ वर्ष), छोटू फुलवरे (वय, ५ वर्ष) आणि कृष्णा फुलवरे (वय, ३ वर्ष) यांचे मृतदेह भीमा नदीपात्रात आढळून आले आहेत. या सर्व मृतदेहांची ओळख पटवण्यास पोलिसांना यश आले आहे. दरम्यान, मुलाने मुलीला पळवून नेल्यामुळे या सात जणांनी आत्महत्या केल्याचं चौकशीतून समोर आलं आहे.

मृत कुटुंब बीड आणि उस्मानाबाद जिल्ह्यातील रहिवासी आहेत. मोहन पवार हे आपली पत्नी, मुलगी, जावई आणि तीन नातवंडांसोबत नगर जिल्ह्यातील पारनेर तालुक्यातील निघोज गावात राहत होते. येथे मोलमजुरी करुन कुटुंब आपला उदरनिर्वाह चालवत होते.

भीमा नदीच्या पात्रात १८ जानेवारी रोजी एका महिलेचा, २० जानेवारी रोजी पुरुषाचा, २१ जानेवारी रोजी महिलेचा, २२ जानेवारी रोजी पुन्हा एक महिलेचा आणि आज २४ जानेवारी रोजी तीन लहान मुलांचे असे गेल्या ४ दिवसांमध्ये टप्प्याटप्प्याने सात मृतदेह आढळले. या घटनेमुळे हळहळ व्यक्त होत आहे.


हेही वाचा : ज्ञानार्जन, अर्थार्जन योजनांद्वारे दिव्यांगांचा मुंबई पालिका करणार सर्वांगिण विकास