घरमहाराष्ट्रपुणेकोयता गँगची शिताफी तर पाहा! बालसुधार गृहाच्या संरक्षण भिंतीला शिडी लावून झाले...

कोयता गँगची शिताफी तर पाहा! बालसुधार गृहाच्या संरक्षण भिंतीला शिडी लावून झाले फरार

Subscribe

पुण्यात मागील काही दिवसांपासून कोयता गँगने दहशत निर्माण केली आहे. पुण्यात या गँगमधील आरोपींकडून दुकानदारांना, व्यावसायिकांना कोयत्याचा धाक दाखवत लुटले जाते. रस्त्यावरील कार चालकांना, नागरिकांमध्ये कोयता दाखवून दहशत निर्माण केली जाते. त्यामुळे या घटना रोखणं आता पुणे पोलिसांसमोर मोठं आव्हान आहे. अशात पुणे पोलिसांनी या घटना रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक कारवाईला सुरुवात केली आहे. अशाच एका कारवाईदरम्यान कोयता गँगमधील सात आरोपींना अटक करण्यात आली होती. मात्र सर्व आरोपी अल्पवयीन असल्याने त्यांना येरवडा येथील पुण्यातील पंडित जवाहरलाल नेहरू उद्योग केंद्र या सुधारगृहात पाठवण्यात आले होते. मात्र कोयता गँगमधील या सर्व आरोपींनी शिताफीने सुधारगृहातून पळ काढला. ही घटना CCTV कॅमेरात कैद झाली आहे.

याप्रकरणी सौरभ शिवाजी वायदंडे (वय१८) भोसले व्हिलेज, भेकराईनगर, हडपसर) विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी संतोष किसन कुंभार यांनी तक्रार दाखल केली होती. त्यानुसार गुन्हा दाखल करत आरोपींचा शोध घेण्यासाठी पोलीस पथकं रवाना झाली आहेत. पोलिसांच्या माहितीनुसार, हडपसरमध्ये कोयत्याचा धाक दाखवत दहशत निर्माण करणाऱ्या सात अल्पवयीन मुलांविरोधात कारवाई करण्यात आली. यानंतर बाल न्याय मंडळाने आदेश देताच या अल्पवयीन मुलांची रवानगी पंडित जवाहरलाल नेहरू केंद्रातील सुधारगृहात करण्यात आली.

- Advertisement -

सुधारगृहात रोज होणाऱ्या सत्रांसाठी त्यांना कारागृहातून बाहेर काढण्यात आले, यावेळी एका अल्पवयीन आरोपीने इतर सहा आरोपींना फूस लावत सुधारगृहातून पळून जाण्यासाठी उद्युक्त केले, यावेळी सोमवारी रात्री 12 च्या सुमारास हे आरोपी सुधारगृहातील संरक्षण भिंतीला शिडी लावून दर्गाच्या कोपऱ्यातून पळून गेले. याप्रकरणी आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी याप्रकरणी पथकांची स्थापना करत आरोपींचा शोध घेण्यास सुरुवात केली आहे.

मागील काही महिन्यांपासून पुण्यात कोयता गँगने धुमाकूळ घातला आहे. रोज या गँगसंदर्भात विविध घटना समोर येतात. अशात सुधारगृहातून सात आरोपी फरार झाल्याने पोलिसांसमोर असे गुन्हे रोखणं आता मोठं आव्हान आहे. हे आरोपी आणखी काही गुन्हे करण्याची शक्यता आहे. या आरोपींना तातडीने अटक करण्याची मागणी नागरिकांकडून केली जात आहे.


देशातील अर्थव्यवस्थेची सकारात्मकतेच्या दिशेने वाटचाल – पंतप्रधान नरेंद्र मोदी

sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -