मुंबई : कुर्ला येथील नेहरूनगर एसटी डेपो परिसरात खोदण्यात आलेल्या खोल खड्ड्यातील साचलेल्या पाण्यात पडून सात वर्षीय मुलाचा मृत्यू झाल्याची घटना आज, शनिवारी (30 नोव्हेंबर) सायंकाळी घडली. या घटनेमुळे सदर परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. (Seven-year-old boy dies after falling into a pit dug for development work in Kurla)
प्राप्त माहितीनुसार, कुर्ला, नेहरूनगर एसटी डेपोच्या परिसरात आर.टी.ओ. कामाच्या अंतर्गत एक खोल खड्डा खोदण्यात आला होता. मात्र या खड्ड्याला सुरक्षित करण्यात आलेले नव्हते. उज्ज्वल रवी सिंह (7) हा मुलगा खेळताना खड्ड्याच्या बाजूला गेला आणि तो त्यात पडला. उज्ज्वल खेळायला बाहेर गेल्यानंतर बराच वेळ होऊनही घरी परतला नाही, त्यामुळे त्याच्या नातेवाईकांनी त्याची शोधाशोध सुरू केली. यावेळी परिसरातील एका व्यक्तीने उज्जव त्या खड्ड्याच्या दिशेने गेल्याचे सांगितले. त्यामुळे खड्ड्याच्या आसपास शोध घेतला असता उज्ज्व खड्ड्यात पडल्याचे निदर्शनास आले. त्याला तत्काळ बाहेर काढून राजावाडी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. या दुर्दैवी घटनेमुळे सदर परिसरात तीव्र संताप व्यक्त करण्यात येत आहे.
हेही वाचा – Mumbai News : मुंबईसह ठाणे, भिवंडीमध्ये पुढील पाच दिवस पाणीकपात; कारण काय?
खड्ड्याचा प्रश्न उपस्थित करूनही घडली दुर्घटना
दरम्यान, नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीत ठाकरे गटाच्या उमेदवार आणि माजी नगरसेविका प्रवीणा मोरजकर व माजी नगरसेवक मनीष मोरजकर यांनी प्रचारा दरम्यान नेहरूनगर एसटी डेपो परिसरात खोदण्यात आलेल्या आणि उघड्या अवस्थेतील खड्डायाबाबत गांभीर्याने चौकशी केली होती. तसेच, सदर काम कोण कंत्राटदार करीत आहे? त्याची माहिती का देण्यात आलेली नाही? खड्ड्यात पाणी साचले असून तो खड्डा चारही बाजूला सुरक्षित का करण्यात आलेला नाही? याबाबत विचारणा केली होती. मात्र त्यावेळी तेथे काम करणारे अमराठी कामगार काहीच उत्तर देऊ शकले नाहीत. तसेच, कंत्राटदाराने देखील सदर खड्ड्याभोवती काही सुरक्षितता ठेवली नसल्याने सदर मुलगा त्या खड्ड्यात पडला आणि त्यातच त्याचा दुर्दैवी अंत झाला. त्यामुळे माजी नगरसेविका प्रवीणा मोरजकर आणि माजी नगरसेवक मनीष मोरजकर यांनी सदर घटनेची सखोल चौकशी करून संबंधित कंत्राटदारावर कडक कारवाई करण्याची मागणी केली आहे. तसेच, मृत मुलाच्या कुटुंबीयांना आर्थिक मदत देण्याची मागणी केली आहे.
हेही वाचा – Livestock Census : मोबाईल ॲप्लीकेशनच्या मदतीने पशुगणना; पाळीव, भटक्या प्राण्यांची होणार नोंदणी