घरमहाराष्ट्रविठूनामाच्या गजराने आणि दिंड्यांनी दुमदुमले रायगड

विठूनामाच्या गजराने आणि दिंड्यांनी दुमदुमले रायगड

Subscribe

वारकरी संप्रदायात अनन्यसाधारण महत्त्व असलेली आषाढी एकादशी जिल्ह्यात उत्साहात व भक्तिमय वातावरणात पार पडली. यानिमित्ताने ठिकठिकाणी अभिषेक महापूजा, भजन, प्रवचन, तसेच विद्यार्थी दिंड्या असे अनेक कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते. स्वाभाविक त्यामुळे शुक्रवारी जिल्ह्याचे एकूणच वातावरण विठ्ठलमय झाले होते.

धाकटी पंढरी म्हणून ओळखल्या जाणार्‍या साजगाव येथील श्री विठ्ठल मंदिरात पहाटेपासूनच दर्शनासाठी गर्दी झाली होती. पावसाची पर्वा न करता हजारो भक्त आपल्या लाडक्या विठूरायाचे दर्शन घेण्यासाठी रांगेत उभे होते. अलिबागनजिक वरसोली येथील श्री विठ्ठल मंदिरातही सकाळपासून भाविकांची प्रचंड गर्दी झाली होती. आंग्रेकालीन श्री विठ्ठल मंदिरात दिवसभर भजनाचे आयोजन करण्यात आले होते. नागोठणे येथे भजन व अन्य धार्मिक कार्यक्रम पार पडले. मुरुडमध्ये प्रती पंढरपूर म्हणून ओळखल्या जाणार्‍या श्री भैरव विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात उत्साही वातावरणात दीपक राजपूरकर यांनी सपत्नीक विठ्ठलाची पूजा केली. देवस्थानचे अध्यक्ष डॉ. विश्वास चव्हाण व त्यांच्या सहकार्‍यांनी यावेळी चोख व्यवस्था ठेवली होती. जिल्ह्यातील ठिकठिकाणच्या विठ्ठल मंदिरातून आषाढी एकादशी उत्साहात साजरी झाल्याचे वृत्त आहे.

- Advertisement -

अलिकडे शाळांतील चिमुरड्या विद्यार्थ्यांच्या दिंड्या निघू लागल्या आहेत. यावर्षीची आषाढी एकादशीही त्याला अपवाद ठरली नाही. विठ्ठलनामाच्या गजरात सकाळी या दिंड्या निघाल्याने वातावरण अधिकच विठ्ठलमय होत गेले. विठ्ठल-रुक्मिणीसह वारकर्‍यांच्या वेशात निघालेले हे चिमुरडे विद्यार्थी सर्वांचेच लक्ष वेधून घेत होते. डोक्यावर तुळशी वृंदावन घेऊन घेतलेल्या छोट्या विद्यार्थिनींचेही कौतूक होत होते. कर्जतमध्ये शिशु मंदिर व शारदा मंदिर शाळेतील विद्यार्थी, शिक्षकांनी उत्साहात दिंडी काढत शहरातील वातावरण भारावून टाकले. नागोठण्यात होली एंजल्स, एस. डी. परमार इंग्लिश स्कूल, तोरणा इंग्लिश स्कूलच्यावतीने दिंडीचे आयोजन करण्यात आले होते. खालापूर तालुक्यातील रिस प्राथमिक शाळेच्या विद्यार्थ्यांची निघालेली दिंडी सर्वांचेच लक्ष वेधून घेत होती.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -